बॉलिवूडच्या ११ अभिनेत्रींचे जोडधंदे (Side Busin...

बॉलिवूडच्या ११ अभिनेत्रींचे जोडधंदे (Side Business Of 11 Bollywood Actresses)

आपल्याकडे एक म्हण आहे, पैशामागे पैसा धावतो. तसेच असंही म्हटलं जातं की, गरीबापेक्षा श्रीमंताला पैशांची हाव जास्त असते. बॉलिवूडच्या या ११ अभिनेत्रींच्या बाबतीत हेच म्हणता येईल. कारण अभिनयाच्या जोरावर अमाप प्रसिद्धी व पैसा मिळवून देखील, त्यांनी आपले साईड बिझनेस थाटले आहेत. कोणाकोणाचे कोणकोणते जोडधंदे आहेत, ते पाहूया.

शिल्पा शेट्टी

बॉलिवूडची फिटनेस एक्सपर्ट अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे रेस्टॉरंट, बार आणि स्पा आहेत. ह्या जोडधंद्यातून तिला घसघशीत कमाई होते. याशिवाय तिने मुंबईमध्ये वरळी विभागात बेस्टीयन चेन नावाचे एक अतिशय आलिशान रेस्टॉरंट उघडले. बांदरा येथे रॉयल्टी नाईट बार हा तिच्याच मालकीचा आहे. जागोजाग तिने स्पा उघडले आहेत.

दीपिका पदुकोण

यशस्वी अभिनेत्री असलेली दीपिका पदुकोण तितकीच यशस्वी उद्योगी महिला आहे. तिचा फॅशन सेन्स कमालीचा आहे. त्याच्या जोरावर तिने, काही वर्षांपूर्वी ‘ऑल अबाऊट यू’ नावाने ऑनलाईन फॅशन व लाईफस्टाइल ब्रॅन्ड सुरू केला. तो जास्त करून मैन्त्रा या ऑनलाईन फॅशन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. आपल्या ब्रॅन्डचे कपडे दीपिका जास्त करून घालते.

कतरीना कैफ

बॉलिवूडची ग्लॅमर गर्ल कतरीना कैफ आता बिझनेस वुमन बनली आहे. तिने २०१९ साली नायका या ब्युटी रिटेलरशी हातमिळवणी करून के हा आपला ब्युटी ब्रॅन्ड प्रस्थापित केला आहे. या ब्रॅन्डवर ती २ वर्षे काम करत होती. कतरीनाच्या कंपनीचे प्रॉडक्टस्‌ महिलांच्या पसंतीस उतरतात.

सुश्मिता सेन

सुश्मिताकडे अभिनय गुणांबरोबरच बिझनेस कौशल्य आहे. त्यामुळे बिझनेस वुमन म्हणून ती चांगलीच यशस्वी ठरली आहे. तिची स्वतःची ज्वेलरी लाइन आहे. ती बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे. सुश्मिताचा हा ज्वेलरी व्यवसाय तिची आई सांभाळते. शिवाय तंत्र एंटरटेनमेन्ट अशी तिची प्रॉडक्शन कंपनी आहे. तिने मुंबईत एक रेस्टॉरंट उघडलं आहे. त्यात उत्तमोत्तम बंगाली पदार्थ मिळतात.

अनुष्का शर्मा

अनुष्का शर्मा देखील अभिनय क्षेत्राबरोबरच उद्योगक्षेत्रात आहे. क्लीन स्लेट फिल्मस्‌ नावाची एक चित्रपट निर्मिती व वितरण कंपनी तिने भावासह सुरू केली आहे. ‘एनएच १०’ , ‘फिलोरी’, ‘परी’ असे चित्रपट तिने या कंपनीतून निर्माण केले. गेल्या वर्षी तिने ‘पाताल लोक’ नावाची वेब सिरीज देखील काढली होती. त्याशिवाय तिची क्लोदिंग लाइन आहे. ‘नुष’ असं तिचं नाव आहे.

सोनम कपूर

मिस फॅशनिस्टा असे सोनम कपूरचे नामाभिधान झाले आहे. अभिनय क्षेत्रात तिला मोठी झेप घेता आली नाही. पण तिचा फॅशन व स्टाईल सेन्स मात्र जगभरात ख्याती पावला आहे. सोनमने आपली बहीण रिया कपूरसह ‘रिसोन’ अशा फॅशन व ॲक्सेसरीज्‌ ब्रॅन्ड प्रस्थापित केला आहे. त्यामध्ये या दोन बहिणींनी तयार केलेले स्टायलिश कपडे आपल्याला मिळतील.

सनी लिओनी

पॉर्न स्टार ते बॉलिवूड क्षेत्र असा प्रवास केलेली सनी लिओनी वेगळ्या व्यवसायात उतरली आहे. ती २०१२ पासून एक ऑनलाईन ॲडल्ट स्टोअर (फक्त प्रौढांसाठी) चालवते आहे. त्यामध्ये ॲडल्ट टॉईज्‌, सेक्सी कॉस्च्यूम, पार्टी वेअर, स्विम वेअर, लाईफस्टाईल ॲक्सेसरीज्‌ मिळतात. शिवाय तिने एक परफ्युम आणि कॉस्मेटीक ब्रॅन्ड काढला आहे. त्याचं नाव आहे ‘लस्ट’.

करिश्मा कपूर

नव्वदच्या दशकात आघाडीची अभिनेत्री राहिलेली करिश्मा कपूर आता ऑनलाईन बेबी क्लोदिंग स्टोअर चालवते. त्यामध्ये नवजात अर्भकापासून गर्भवती महिलांच्या गरजेच्या वस्तू मिळतात. बेबी ओये डॉट कॉम या ई-कॉमर्स वेबसाईट मार्फत करिश्माचे ऑनलाईन स्टोअर चालते.

ट्वींकल खन्ना

अक्षयकुमारशी लग्न केल्यावर ट्वींकलने बॉलिवूड मधून संन्यास घेतला. पण ती इतर कामात सक्रीय आहे. ती ब्लॉगर आहे. वर्तमानपत्रे व नियतकालिकांसाठी लिहीते. तिने काही पुस्तकांचे लेखनही केले आहे. मिसेस फनीबोन्स आणि द लिजंड ऑफ लक्ष्मीप्रसाद ही तिची पुस्तके गाजली आहेत. त्याशिवाय आपली मैत्रिण गुरलीन मनचंदा हिच्यासोबत ती इंटिरिअर डिझायनिंगचा व्यवसायपण करते. ‘द व्हाईट विंडो’ या चित्रपट संस्थेची ती संस्थापक असून निर्माती आहे. अक्षयकुमार अभिनित ‘पॅडमॅन’ हा चित्रपट तिने निर्माण केला होता.

आलिया भट्ट

फार कमी वयातच आलियाने अभिनयाबरोबरच उद्योग सुरू केला. ऑनलाईन पोर्टलवर ती आपला फॅशन ब्रॅन्ड चालवते.

लारा दत्ता

मिस युनिव्हर्स हा सौंदर्यस्पर्धेतील मान मिळवल्यानंतर लारा दत्ता चित्रसृष्टीत दाखल झाली. पुढे तिने ‘छाब्रा ५५५ साडी ब्रॅन्ड’शी सहयोग करून स्वतःचा साडी ब्रॅन्ड सुरू केला. त्याचबरोबर स्वतःची परफ्युम लाईन तिने सुरू केली. आणि भिगी बसंती नावाची चित्रपट निर्मिती संस्था देखील ती चालवते.