सिद्धार्थ मल्होत्राने 18 व्या वर्षापासून सुरु क...

सिद्धार्थ मल्होत्राने 18 व्या वर्षापासून सुरु केली होती मॉडेलिंग, त्यानंतर केले बॉलिवूडमध्ये पदार्पण(Siddharth Malhotra Started His Modeling Career at The Age of 18, Know How He Became ‘Ek Villain’ of Bollywood)

बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा हँडसम अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा काल वाढदिवस होता. सिद्धार्थ मल्होत्राचा जन्म 16 जानेवारी 1985 रोजी दिल्लीत झाला. त्याने शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीत पूर्ण केले. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी सिद्धार्थ मल्होत्राने मॉडेलिंगच्या दुनियेत पाऊल ठेवले, पण नशिबाला कदाचित वेगळंच काही मान्य होते, त्यामुळे यशस्वी मॉडेल असूनही तो बॉलिवूडचा ‘एक व्हिलन’ बनला.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता असण्यासोबतच, सिद्धार्थ मल्होत्रा ​​हा मॉडेलिंग जगतातही एक प्रसिद्ध चेहरा आहे. असे म्हटले जाते की, सुरुवातीला सिद्धार्थने स्वतःचा वैयक्तिक खर्च भागवण्यासाठी मॉडेलिंग सुरू केली, नंतर त्याने बराच काळ मॉडेलिंगच्या दुनियेत काम केले. त्याने देशातच नाही तर परदेशातही मॉडेलिंग करून खूप प्रसिद्धी मिळवली. प्रदीर्घ काळ मॉडेलिंग केल्यानंतर तो फिल्मी दुनियेकडे वळला.

एका मुलाखतीत आपल्या करीअरच्या सुरुवातीच्या दिवसांचा उल्लेख करताना सिद्धार्थने सांगितले की, ‘दोस्ताना’ चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्यापूर्वी मी जाहिरातींमध्ये नशीब आजमावले होते. 2008 मध्ये, मला प्रियंका चोप्राच्या विरूद्ध ‘फॅशन’ या चित्रपटात काम करण्याची ऑफर मिळाली, परंतु मॉडेलिंग मासिकाशी झालेल्या करारामुळे हा चित्रपट माझ्या हातातून निसटला.

बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरने सिद्धार्थ मल्होत्राला ‘माय नेम इज खान’ या चित्रपटात सहदिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी दिली. त्यानंतर 2012 मध्ये करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून त्याने अभिनेता म्हणून करीअरला सुरुवात केली. या चित्रपटातून अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनीही आपल्या फिल्मी करीअरला सुरुवात केली.

2014 मध्ये आलेला ‘एक व्हिलन’ हा चित्रपट सिद्धार्थच्या फिल्मी करीअरमधला सर्वात यशस्वी चित्रपट ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आणि ‘एक व्हिलन’ बनलेल्या सिद्धार्थने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. सलमान खानसुद्धा त्याच्या अभिनयाने खूप प्रभावित झाला आणि त्याने त्याला डिझायनर घड्याळ भेट दिले.

सिद्धार्थसाठी फिल्मी दुनियेत स्वत:चे स्थान निर्माण करणे इतके सोपे नव्हते. अभिनेत्याने एका मुलाखतीत सांगितले की त्याला त्याच्या पहिल्या ऑडिशनमध्ये नकार देण्यात आला होता, त्यानंतर त्याला एका जाहिरातीत काम करण्याची ऑफर मिळाली. यानंतरही त्याला अनेकवेळा नकाराचा सामना करावा लागला, तरीही त्याने हार मानली नाही आणि आज त्याचे नाव बॉलिवूडच्या मोठ्या स्टार्समध्ये आहे.

अर्थात, सिद्धार्थ चांगला अभिनेता आहे, पण तो एक उत्तम रग्बी खेळाडूही आहे. त्याला निसर्गाची विशेष ओढ आहे, त्यामुळे जेव्हा-जेव्हा संधी मिळेल तेव्हा तो निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवतो. सिद्धार्थही त्याच्या फिटनेसची विशेष काळजी घेतो. व्यायाम केला नाही तर अस्वस्थ वाटतं, असं तो सांगतो. व्यायामाव्यतिरिक्त त्याला आठवड्यातून दोनदा धावायला आणि पोहायला आवडते.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या लव्ह लाईफसाठी सतत चर्चेत असतो. त्याचे नाव आधी आलिया भट्टसोबत जोडले गेले, पण काही काळानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. यानंतर सिद्धार्थचे नाव कतरीना कैफसोबत जोडले गेले आणि आता सिद्धार्थ कियारा अडवाणीसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. सिद्धार्थ आणि कियारा अनेक वेळा एकत्र दिसले आहेत.

2012 मध्ये करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून चित्रपट प्रवासाला सुरुवात करणारा सिद्धार्थ मल्होत्रा ​​’एक व्हिलन’, ‘मरजावां’, ‘कपूर अँड सन्स’, ‘हसी तो फसी’,’ बार- ‘बार देखो’, ‘जबरिया जोडी’, ‘ब्रदर’, ‘इत्तेफाक’ आणि ‘अय्यर’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसला आहे.