श्वेता तिवारीचे शेजारी तिच्या घराला म्हणतात ‘सी...

श्वेता तिवारीचे शेजारी तिच्या घराला म्हणतात ‘सीतेचे घर’, श्वेताने स्वतःच सांगितलं यामागचं रोचक कारण (Shweta Tiwari’s neighbours call her home ‘Seeta Ka Ghar’, Actress reveals interesting reason behind this)

टेलिव्हिजनची लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी ब्रेकनंतर पुन्हा टीव्हीवर पुनरागमन करत आहे. ‘मेरे डॅड की दुल्हन’नंतर श्वेता टेलिव्हिजनवर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली असून लवकरच ती टीव्ही सीरियल ‘मैं हूं अपराजिता’मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. खऱ्या आयुष्यातही दोन मुलांची सिंगल मदर असलेली श्वेता या मालिकेत तीन मुलींची सिंगल मदर म्हणून दिसणार आहे. त्यामुळे हे पात्र श्वेताच्या खऱ्या आयुष्याशी अगदी मिळतंजुळतं आहे.

अलीकडेच, एका मुलाखतीत श्वेताने या टीव्ही शोबद्दल आणि त्यातील तिच्या पात्राबद्दल सांगितले आणि बोलता बोलता तिने खुलासा केला की तिचे शेजारी तिच्या घराला ‘सीतेचे घर’ म्हणतात आणि याचे एक रोचक कारण देखील तिने दिले.

मालिकेतील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना श्वेता म्हणाली, “मी २५ वर्षांची असताना मी ८० वर्षांच्या महिलेची भूमिका केली होती. मी एक अभिनेत्री आहे आणि मी हरतऱ्हेच्या भूमिका करू इच्छिते. माझी मुलगी २०-२१ वर्षांची आहे. माझा फिटनेस आणि ट्रांसफॉर्मेशन पाहून त्याप्रमाणेच मला भूमिका मिळाव्यात, असे मला अजिबात वाटत नाही. फिटनेस ही माझी च्वाइस आहे आणि अभिनय ही माझी आवड, माझी उपजीविका आहे. मी तीन मुलींच्या आईची भूमिका साकारणार आहे, याचे मला काहीही वाटत नाही. उलट मला असे वाटते की मी या व्यक्तिरेखेने अनेकांना प्रेरणा देऊ शकते.”

श्वेता तिवारीने असेही सांगितले की शेजारी तिच्या घराला ‘सीतेचे घर’ म्हणतात, यामागचं कारण सांगताना ती म्हणते, “माझ्या घरात जास्त महिला राहतात. मी, माझी आई, माझी मुलगी, मेड्‌स अशा सर्व महिला आम्ही एकत्र राहतो आणि आम्ही सर्वजणी अशा आहोत ज्यांनी आपापल्या आयुष्यात काही ना काही समस्यांना तोंड दिले आहे. मग ते पती, कुटुंब, मुलगी किंवा इतर कोणत्याही कारणास्तव असो. माझा भाऊ लंडनमध्ये राहतो. माझ्या घरी माझे वडील आणि मुलगा आहेत. आमच्या घरात दुसरा पुरुष नाही. म्हणूनच लोक माझ्या घराला सीतेचे घर म्हणतात.”

मुलगी पलक तिवारीबद्दल बोलताना श्वेता म्हणाली, “मला तिचा खूप अभिमान आहे. ती तिच्या करिअरमध्ये खूप चांगली कामगिरी करत आहे. ती लहान असताना मी तिला जास्त वेळ देऊ शकले नाही, याची आजही मला खंत वाटते. त्यामुळे दुसऱ्यांदा आई झाल्यावर माझ्या मुलाच्या वेळी हीच चूक पुन्हा होऊ नये म्हणून मी कामातून तीन वर्षांचा ब्रेक घेतला. माझा मुलगा आता शाळेतून माझ्या सेटवर येतो. व्हॅनिटी व्हॅनमध्ये त्याच्यासाठी एक खोली आहे. शाळेतून आल्यानंतर तो माझ्यासोबत राहतो, जेवतो आणि गृहपाठ करतो. मग आम्ही एकत्र घरी जातो.”

श्वेता तिवारी तिच्या करिअरपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. तिच्या फिटनेस आणि ग्लॅमरस लूकमुळे ती वयाच्या या टप्प्यावरही तरुण अभिनेत्रींना टक्कर देताना दिसते. श्वेता लवकरच ‘मैं हूं अपराजिता’ या मालिकेद्वारे टीव्हीवर पुनरागमन करणार असून ही मालिका २७ ऑक्टोबर रोजी झी टीव्हीवर सुरू होणार आहे.