श्रीकांत मोघे : नटरंगी रंगलेल्या नटाची एक्झिट (...

श्रीकांत मोघे : नटरंगी रंगलेल्या नटाची एक्झिट (Shrikant Moghe Is No More)

अष्टावधानी नट म्हणून ख्याती पावलेल्या श्रीकांत मोघे यांनी वयाच्या ९१व्या वर्षी पुण्याच्या घरातून या जगातून कायमची एक्झिट घेतली. शाळेतील बालकलाकार ते हौशी नाटकातला लक्षवेधी नट, व्यवसायाने आर्किटेक्ट, नाटक अंगी भिनवलेला अभिनेता, मराठी चित्रपटातील नायक, टी.व्ही. मालिकांमधील चरित्र अभिनेता ते अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचा अध्यक्ष अशा विविध क्षेत्रात यशस्वी मुशाफिरी करणारा नटश्रेष्ठ म्हणून श्रीकांतची कारकीर्द गाजली होती.
तुझे आहे तुजपाशी, वाऱ्यावरची वरात, लेकुरे उदंड जाली, गरूडझेप, सीमेवरून परत जा, बिकट वाट वहिवाट, गारंबीचा बापू, अजून यौवनात मी, अश्वमेध, मृत्युंजय, संकेत मीलनाचा अशा अनेक नाटकांमधून त्यांनी भूमिका केल्या. तरी लेकुरे उदंड जाली मधील खेळकर राजा व वाऱ्यावरची वरात मधील धमाल बोरटाके गुरूजी या त्याच्या भूमिका अजरामर झाल्या आहेत. पुलकित आनंदयात्री हा एकपात्री प्रयोग त्याने जगभर नेला.
श्रीकांतने ‘स्वामी’ मालिकेत सादर केलेली राघोबादादांची भूमिका अशीच अविस्मरणीय आहे. अवंतिका व इतर मालिकांमधूनही त्याने भूमिका केल्या.

‘प्रपंच’ या मराठी चित्रपटामधून त्याने चित्रसृष्टीत प्रवेश केला व शेवटचा मालुसरा, मधुचंद्र, आम्ही जातो आमुच्या गावा, नवरी मिळे नवऱ्याला, सिंहासन, उंबरठा अशा अनेक चित्रपटांमधून त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. मनचली व कालचक्र या हिंदी चित्रपटांमधून देखील तो चमकला.
अभिनयक्षेत्रात सहा दशकांचा प्रवास लाभलेल्या या नटश्रेष्ठास झी जीवन गौरव पुरस्कार व इतर मानसन्मान लाभले. ‘नटरंगी रंगलो’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले आहे. त्यामधील एक उतारा, त्याचा जीवनाबद्दलचा दृष्टीकोन सांगतो –
”या जीवनानं मला काय दिलं याचा शोध घेण्यासाठी मागे वळून पाहताना माझ्या असं लक्षात येतं की, जीवनाचं सार्थक करण्यातच इतिकर्तव्यता न मानता ते सुंदर कसं करता येईल, याचा विचार करण्याचं आणि तो विचार प्रत्यक्षात उतरवण्याचं सामर्थ्य मला या जीवनानं दिलं…”

या अष्टावधानी कलावंताला ‘माझी सहेली’ची आदरांजली!