श्रेया घोषालच्या घरी चिमुकल्या श्रेयादित्याचं आ...

श्रेया घोषालच्या घरी चिमुकल्या श्रेयादित्याचं आगमन; सोशल मीडियावरून दिली आनंदाची बातमी (Shreya Ghoshal Is Blessed With Baby Boy)

आपल्या सुरेल आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या श्रेया घोषालला शनिवारी मुलगा झाला आहे. ही आनंदाची बातमी श्रेयानेच सोशल मीडियावर दिली असून एक छोटीशी भावूक पोस्ट शेअर केली आहे.

“आज दुपारी देवाने आशिर्वादाच्या रुपात आम्हाला मौल्यवान मुलगा दिला आहे. अशा प्रकारची भावना या आधी कधीच अनुभवली नव्हती. शिलादित्य, मी आणि आमचं कुटुंब आनंदात आहोत. तुम्हा सर्वांच्या आशिर्वादासाठी धन्यवाद.” अशा आशयाची पोस्ट शेअर करत श्रेयाने आई झाल्याचा आनंद व्यक्त केलाय.

श्रेया घोषालच्या या पोस्टवर सेलिब्रिटींपासून ते तिच्या चाहत्यांपर्यंत सर्वांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनेक चाहत्यांनी तिला स्वतःची आणि नवजात बाळाची काळजी घेण्याचाही सल्ला दिला आहे.

मार्चमध्ये सोशल मीडियावरून श्रेया घोषालने तिचे बेबी बम्पसह फोटो पोस्ट करत ती प्रेग्नंट असल्याची बातमी दिली होती. एप्रिलमध्ये तिच्या मैत्रिणींनी तिचे बेबी शॉवर केले होते. त्या कार्यक्रमाचे फोटो देखील श्रेयाने सोशल मीडियावर शेअर केले होते. याचवेळी तिने बाळाचं नाव देखील ठरवलं होतं. ”बेबी श्रेयादित्य” लवकरच येत आहे. शीलादित्या आणि मला ही बातमी तुमच्यासोबत शेअर करताना आनंद होतोय. आम्ही आयुष्यातील नव्या आध्यायाची सुरूवात करत आहोत. तुम्हा सर्वांचे आशिर्वाद आणि प्रेम याची आम्हाला गरज आहे” अशी कॅप्शन देत श्रेयाने तिचा बेबी बम्पसोबतचा फोटो शेअर केला होता. यात तिने बाळाचं नाव श्रेयादित्य ठेवणार असल्याचं म्हंटलं होतं.

अनेक वर्षांच्या अफेअरनंतर २०१५ मध्ये श्रेयाने प्रियकर शिलादित्य मुखोपाध्यायसोबत लग्नगाठ बांधली. श्रेयाचा पती मुंबईतील एका टेक्नॉलोजी कंपनीचा मालक आहे. बंगाली पद्धतीने श्रेया – शिलादित्यचं लग्न झालं. श्रेया अनेकदा तिच्या पतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.