रत्नदुर्ग किल्ल्यातील श्रीदेवी भगवती (Shree Dev...

रत्नदुर्ग किल्ल्यातील श्रीदेवी भगवती (Shree Devi Bhagvati Of Ratnadurg Fort Is From Shivaji Maharaj Era)

भगवती देवीने रत्नासूर नावाच्या असुराचा वध करून रत्नदुर्ग किल्ल्यावर वास्तव्य केले. तेव्हापासून वर्षानुवर्षे देवीचे बारा मानकरी आणि ग्रामस्थ भक्तिभावाने आणि नित्यनेमाने नवरात्रोत्सव साजरा करतात. रत्नागिरी शहराच्या पश्चिमेला २ कि. मी. अंतरावर अरबी समुद्राच्या काठावरील डोंगरावर रत्नदुर्ग किल्ल्यात श्रीदेवी भगवतीचे शिवकालीन मंदिर आहे.

किल्ल्यावरील भगवती देवी ही मूळची रत्नागिरीतील नव्हे तर कोल्हापूरनिवासी आहे. या देवीची आख्यायिका सांगितली जाते ती अशी की, कोल्हासूर, करवीर व रत्नासूर असे तीन राक्षस मातले होते. या राक्षसांचा संहार करण्याचे काम अंबा देवीकडे होते. कोल्हासुराचा नाश अंबाबाईने केला. तेथे कोल्हापूर वसले. करवीराला अंबाबाईने मारले. तेथे करवीरनगरी वसली.

महाबलाढय रत्नासुराचा वध करण्याचे काम बाकी होते. त्यावेळी अंबाबाईने भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले. भगवान शंकराने देवीला आणखी दोन वर्षे तपसाधना करायला सांगितली. दोन वर्षानंतर देवीला भगवान शंकराने डोळे उघडायला सांगितले. त्यावेळी श्री देवी टेंबलाई व देवी भगवती समोर उभ्या होत्या. कालांतराने या तिन्ही (अंबाबाई, टेंबलाई, देवी भगवती) देवींनी जोतिबाच्या वाडीतील खिंडीत रत्नासुराला गाठले. भगवतीने दैत्यावर शस्त्र चालविले व मुंडके उडवले. त्या वाडीचे नाव ‘वाडी रत्नागिरी’ असे पडले. दैत्यांचा नाश झाल्यावर अंबाबाईने वाट दिसेल तिथे जा, अशी सूचना केली. त्यावेळी टेंबलाईने कोल्हापुरात राहण्याचे ठरवले. भगवतीने कोकणची दिशा ठरविली. ती विशाळगडावरून  हातखंबा येथील कदम यांच्याकडे आली. त्यामुळे देवीचे ते मानकरी बनले. त्यानंतर रत्नदुर्गतील बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी सावंत यांच्या घरी देवी बसली. नंतर किल्ल्यात आली व स्वयंभू रूपाने येथे वास करू लागली.

Top thing to do in Shri Devi Bhagwati Mandir (2022) | All about Shri Devi  Bhagwati Mandir, Ratnagiri, Maharashtra

देवीचे स्वयंभू मूर्तिस्थान अडीच फूट उंच आहे. देवीच्या हातात शंख, चक्र, ढाल व तलवार आहे. पूर्वाभिमुख असलेली देवी महिषासुरावर आरूढ झालेली आहे. वर्षातून दोन वेळा देवीचे उत्सव होतात. एक नवरात्रोत्सव आणि दुसरा शिमगोत्सव. या उत्सवांच्या वेळी देवीला संपूर्ण सोन्या-चांदीचे रूपे आणि दागिने घालून सजवले जाते. ही रूपे सावंत खोतांकडे ठेवलेली असतात. नवरात्रातील नऊ दिवस देवीला माळ घातली जाते.