व्रतवैकल्यांचा श्रावण मास (Shravan : The Holy M...

व्रतवैकल्यांचा श्रावण मास (Shravan : The Holy Month Of Rituals Begins Today)


आषाढात मुसळधार कोसळणारा पाऊस श्रावणात ऊनपावसाचा खेळ खेळताना दिसतो. श्रावण मासात निसर्गसुद्धा नवचैतन्याने बहरलेला असतो. जिवंतिका पूजन, नागपंचमी, मंगळागौर, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, पोळा इत्यादी सणांची रेलचेल असते.
इंद्रधनूचे बांधून तोरण श्रावण आला
हिरवाई उधळीत श्रावण आला
सृष्टीचा प्रेमसखा श्रावण आला
दरवळ शिंपीत श्रावण आला
सजवून सणांना श्रावण आला
गौर पूजण्या श्रावण आला
श्रावण म्हणजे हिरवा ऋतू. निसर्गाला समृद्ध करणारा, चैतन्य आणि उल्हास घेऊन येणारा, आपल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत एक खास स्थान असलेला श्रावण. शहरातल्या वातावरणात जीवनातले सर्व व्यवहार कॅलेंडरबरहुकूम होत असतात. या वर्षी श्रावण मास 29 जुलैपासून श्रावण मासास सुरुवात होत आहे.
आषाढात मुसळधार कोसळणारा पाऊस श्रावणात ऊनपावसाचा खेळ खेळताना दिसतो. या महिन्यात निसर्गसुद्धा रम्य असतो. नवचैतन्याने बहरलेला असतो. जिवंतिका पूजन, नागपंचमी, मंगळागौर, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, पोळा इत्यादी सणांची रेलचेल असते. तसं पाहिलं तर, वर्षभर आपल्याकडे सण साजरे होत असतात. परंतु, श्रावणातील सणांच्या निमित्ताने सासरी गेलेल्या नवर्‍या मुली माहेरी येतात. त्यामुळे त्यांचा उत्साह ओसंडून जात असतो. तर लहान मुलांसाठी श्रावण म्हणजे नुसती खादाडी, खेळ व उत्सव आणि मजाच मजा असते.


देवी पार्वतीने जन्मोजन्मी आपल्याला शंकरच पती मिळावा यासाठी याच महिन्यात कठोर व्रत केले अन् महादेव शंकर यांस जिंकून घेतले. त्यामुळे महादेवास हा महिना अत्यंत प्रिय असल्याचं म्हटलं जातं. आणि म्हणूनच महादेवाच्या पूजेसाठी या महिन्यातील सोमवारी स्त्रिया व्रत करतात. असं म्हणतात की, एखादं पुण्यकर्म चातुर्मासात केलं तर वर्षभरातील इतर दिवशी मिळेल त्यापेक्षा अधिक फळ मिळतं आणि तेच पुण्यकर्म जर श्रावण महिन्यात केलं तर त्याहूनही जास्त पटीने त्याचं फळ मिळतं. आणि म्हणूनच हा महिना व्रतवैकल्यांनी भरलेला असतो.
कवी मनाला असो, चित्रपटसृष्टीला
असो या श्रावणाने आपल्या साजिर्‍या,
हसर्‍या रूपाने भुरळ घातलेली आहे. ‘श्रावणमासी हर्ष मानसी’, ‘श्रावणात घन निळा बरसला’, ‘रिमझिम झरती श्रावणधारा’, ‘सर सुखाची श्रावणी’ अशी मराठी गीतं; तसंच ‘रिमझिम गिरे सावन’, ‘सावन का महिना’, ‘सावन को आने दो’, ‘आया सावन झुम के’ अशी हिंदी गाणी
ऐकू येऊ लागली की, आपणही श्रावणाच्या रंगात समरस होऊन जातो.