श्रद्धा कपूर सुरुवातीच्या काळात कॉफी शॉपमध्ये क...

श्रद्धा कपूर सुरुवातीच्या काळात कॉफी शॉपमध्ये करायची काम, अभिनयासाठी अर्धवट सोडले शिक्षण (Shraddha Kapoor Used to Work in Coffee Shop, She Left Her Studies for becoming an Actress)

हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक शक्ती कपूरची मुलगी श्रद्धा कपूरने आपल्या दमदार अभिनयामुळे आणि मनमोहक आवाजामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अभिनयासोबतच श्रद्धाचा आवाज देखील खूप सुरेल आहे. मात्र, सर्वसामान्य घरातील मुलांप्रमाणे तिलाही करीअरच्या सुरुवातीच्या काळात पैशासाठी छोटी-मोठी कामे करावी लागली होती. तिने पैशासाठी कॉफी शॉपमध्ये कामही केले आहे, परंतु अभिनयातील आवड इतकी होती की, त्यातच करिअर करण्यासाठी तिने आपले शिक्षण मध्येच सोडले.

3 मार्च 1987 रोजी मुंबईत जन्मलेल्या श्रद्धा कपूरने आपले सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील जमनाबाई नरसी स्कूलमधून केले, टायगर श्रॉफनेही तिच्यासोबत शिक्षण घेतले आहे. यामुळेच दोघांमध्ये लहानपणापासूनची चांगली मैत्री आहे, जी आजही कायम आहे. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर श्रद्धा अमेरिकेत गेली आणि पदवीसाठी बोस्टन विद्यापीठात प्रवेश घेतला.

अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये काही काळ शिक्षण घेतल्यानंतर, अभिनय क्षेत्रात करीअर करण्यासाठी तिने आपले शिक्षण अर्धवट सोडले. मात्र, ती शिकत असताना पैशासाठी कॉफी शॉपमध्ये काम करायची. खुद्द अभिनेत्रीने एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. श्रद्धाने सांगितले होते की, जेव्हा ती बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होती, तेव्हा पॉकेटमनी मिळवण्यासाठी ती एका कॉफी शॉपमध्ये काम करायची.

श्रद्धा फक्त 16 वर्षांची होती, तेव्हापासून तिला चित्रपटांमध्ये काम करण्याच्या ऑफर येऊ लागल्या होत्या. आधी तिला सलमान खानच्या चित्रपटात काम करण्याची ऑफर आली, पण श्रद्धाने सलमान खानच्या चित्रपटाची ऑफर नाकारली. त्यानंतर लगेचच ‘तीन पत्ती’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, त्यानंतर ‘लव का द एंड’मध्ये तिने महत्त्वाची भूमिका साकारली, पण हे दोन्ही चित्रपट काही खास कमाल दाखवू शकले नाहीत.

श्रद्धाचे लागोपाठ दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले, त्यामुळे तिचे करीअर संकटात आले. दोन फ्लॉप चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर, श्रद्धाला महेश भट्टच्या ‘आशिकी 2’मध्ये काम करण्याची ऑफर आली आणि हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटामुळे श्रद्धा रातोरात स्टार झाली. यानंतर त्याने ‘एक व्हिलन’, ‘ABCD 2’, ‘हैदर’, ‘बागी’, ‘स्त्री’ आणि ‘छिछोरे’ सारख्या अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले.

श्रद्धाचा ‘तू झुठी मैं मक्कर’  हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. याचित्रपटात तिच्यासोबत रणबीर कपूर मुख्य भूमिकेत होता. याशिवाय श्रद्धा ‘चालबाज इन लंडन’, ‘लव्हली सिंग’ आणि ‘स्त्री 2’ या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.