सावळाई (Short Story: Savalaee)

सावळाई (Short Story: Savalaee)

मानस रोजच संध्याकाळी रश्मिकाला घरी सोडू लागला. रश्मिका आणि मानसमधील जवळीक वाढत होती. रोज रात्री दोन-दोन वाजेपर्यंत
ते एकमेकांसोबत व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग करत. मात्र एके दिवशी असं काही घडलं की, रश्मिका मानसपासून दूर होऊ लागली.

“काही टेन्शन आहे का, रश्मिका मॅडम?”
“नाही हो कोतकर सर. तुम्हाला असं
का वाटलं?”
“आप जो इतना मुस्कुरा रहे हो, हमे लगा कोई गम छिपा रहे हो.”
“नाही हो सर, असतं कधी कधी घरचं टेन्शन; पण मी माझा स्ट्रेस चेहर्‍यावर घेऊन
फिरत नाही.”
“चांगली गोष्ट आहे. कधी काही अडचण आली तर सांगा, मी आहेच केबिनमध्ये.”
“हो… हो,” रश्मिकाने उत्तर दिलं; पण कोणीतरी स्वतःहून ऑफिसमध्ये आपली विचारपूस केली, याचा तिला मनातल्या मनात खूप
आनंद झाला.
संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर कोतकर सर रश्मिकाच्या समोरच फोर व्हीलर घेऊन उभे राहिले.
“चला मॅडम, सोडतो मी तुम्हाला.”
“नाही, नको सर. मी जाईन ऑटोने.”
“बसा हो.”
रश्मिका गाडीचा मागचा दरवाजा उघडू लागली.
“अगं ए, मागे काय बसतेस. मी काय ड्रायव्हर आहे का तुझा?”
“नाही पण, मी तुमच्यासोबत पुढे कसं बसू शकते सर? कोणी पाहिलं तर नावं ठेवतील.”
“पुढे बस सांगितलं ना!… आणि कोतकर सर म्हणून नको बोलवू मला. मानस नाव ठेवलंय आईवडिलांनी माझं. सोपं आहे ना बोलायला?”
“पुढच्या सीटवर किंवा शेजारी जनरली बायकोच बसते…”
“हो का, माझा विवाहविधी बाकी आहे अजून, म्हणून माझं शेजारचं सीट रिकामी आहे अजून मुलींसाठी. अजून काही शंकाकुशंका असतील, तर विचारून टाक पटापट.”
वीस मिनिटांतच रश्मिका घरी पोहोचली. एवढा
हँडसम मुलगा स्वतःहून आपल्याशी जवळीक करतो आहे,
हे रश्मिकाच्या मनाला खूपच सुखावत होतं.
मानस रोजच संध्याकाळी रश्मिकाला घरी सोडू लागला. हळूहळू तो, ‘आजचा ड्रेस छान आहे’, ‘हे सिल्व्हर कानातले बदल तू, तुझ्या रंगाला सूट होत नाहीत’,
‘जास्त बाहेर नको फिरत जाऊ तू, अजून काळी होशील,’ अशी वाक्यं सहज बोलू लागला. रश्मिका आणि मानसमधील जवळीक वाढत होती. रोज रात्री दोन-दोन वाजेपर्यंत ते एकमेकांसोबत व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग करत. मात्र साधारण तीन-चार महिन्यांनंतर एके दिवशी असं काही घडलं की, रश्मिका मानसपासून दूर होऊ लागली.
ऑफिसमध्ये एक नवीन मुलगी जॉईन झाली. रंगाने गोरीपान, कुरळे केस, फॅशनेबल कपडे… सगळचं छान होतं तिचं. बोलणंही मंजूळ. संध्याकाळी ऑफिस सुटलं. सगळे जण घरी जात होते. मानस फोर व्हीलरमध्ये बसताच ती मुलगी मानसच्या मागे धावत आली.
“हाय, मी भाविका. तुम्ही गजानन स्टॉपवरून पुढे जाता ना? मला सोडाल का गजानन स्टॉपवर? प्लीज…”


“हो नक्कीच. अशीही गाडी रिकामीच आहे. या बसा.”
भाविका मानसच्या शेजारीच बसली. रश्मिका ऑफिसच्या गेटबाहेर उभी होती. मानसने रश्मिकासाठी गाडी थांबवली. भाविकाला पुढच्या सीटवर पाहून रश्मिका चिडचिड करू लागली. भाविका स्टॉपवर उतरेपर्यंत सारखी बडबड करत होती.
“भाविका… सॉरी… रश्मिका, नावं सेम आहेत ना तुमची दोघींची, म्हणून गोंधळ होतो आहे माझा. रश्मिका तू कुठे उतरते आहेस?”
“मी माझ्याच स्टॉपवर उतरणार आहे. तुम्ही दोघं जा पुढे. तेवढाच तुम्हाला एकांत मिळेल.”
“शी… असं काय बोलतेस तू रश्मिका यार. किती बोगस मानसिकता आहे तुझी! एखादी मुलगी एका मुलाशी जरा जास्त बोलायला लागली की, लगेच काहीही बोलायचं का? मिडल क्लास लोक कधीच सुधारणार नाहीत.”
रश्मिका काहीही न बोलता गाडीचा दरवाजा दणकन आपटून निघून गेली. मानस, त्याला जे समजायचं होतं, ते समजून चुकला. त्या दिवसापासून रश्मिकाने मानसची गाडीच बंद केली. भाविका आणि मानस दोघं सोबत फिरू लागले. मानस रोज भाविकाला फोर व्हीलरमध्ये आणत होता आणि घरीही सोडत होता. मानस व्हॉट्सअ‍ॅपवर वेगवेगळ्या शायरी पाठवून रश्मिकाचं मन वळवण्याचा प्रयत्न करत होता; पण रश्मिका त्याला काहीही रिप्लाय देत नव्हती. एकदम घनिष्ठ असलेली मैत्री अशी अचानक कशी तुटली? रात्री दोन-तीन वाजेपर्यंत एकमेकांशी चॅटिंग करणारे दोन जीव, आता त्यांच्यात कधी काही नव्हतंच असं वागू लागले. ऑफिसमध्ये दोघंही एकमेकांसमोर येत होते; पण बोलत नव्हते.
रश्मिकाला मानस खूप आवडत होता. मानसमध्ये ती तिचा भावी जोडीदार शोधत होती. पण मानसला आपल्यापेक्षा सुंदर मुलगी भेटत असेल, तर आपण का म्हणून आपलं प्रेम त्याच्यावर लादायचं, असं तिला वाटत होतं. भाविकाला नक्कीच मानस आवडत होता, म्हणून ती स्वतःहून त्याच्याशी जवळीक साधण्याची एकही संधी सोडत नव्हती. रश्मिका मानसच्या प्रेमात पडली होती, म्हणून हा अबोला तिला सहन होत नव्हता. नकळतच ती ऑफिसमध्ये मानसला एकटक पाहत असे. त्याच्या ऑफिसमध्ये येण्याची वाट पाहत असे. मानसला रश्मिकाच्या हालचाली समजत होत्या. तोही तिचं मन दुखावू नये, तिला त्रास होऊ नये, याची सतत काळजी घेत होता. पण आता हे थांबायला हवं म्हणून रश्मिकाने नोकरीच सोडण्याचा विचार केला. दुसर्‍याच दिवशी तिने राजीनामा दिला.
मानसला काहीच समजत नव्हतं. रश्मिकाच्या घरी जाणं शक्य नव्हतं आणि फोन ती उचलत नव्हती. पण तिच्या असं हळूहळू आयुष्यातून निघून जाण्यानं मानसही खचत होता. रश्मिका घरी तर थांबली; पण आता आपल्याला मानस कधीच दिसणार नाही, या विचारानं ती रडून रडून वेडी होत होती.
आईबाबा गावी गेले होते. सोबत म्हणून रश्मिकाची कॉलेजमधील मैत्रीण, मनवा रात्री घरी आली होती. रश्मिकाच्या डोळ्यातलं पाणी थांबतच नव्हतं.
“अगं ए बये, काय झालंय तुला? बरं वाटत नाहीये का? जेवलीस की उपाशीच आहेस? हे काय, बटाट्याची भाजी आणि पोळ्या तर तशाच दिसताहेत. काय झालं आहे? डोळे किती लाल झालेत तुझे. रडली आहेस का? अगं काही तरी बोल. इथे माझा जीव चालला आहे तुझ्या काळजीने. काका-काकूंना फोन करू का?”


“चूप गं… किती बोलतेस तू. झोपायला आली आहे ना, मग झोप तू. मीही झोपते. लाइट बंद कर.”
“हा… म्हणे लाइट बंद कर. रश्मे… काही प्रेमप्रकरण आहे का गं. मोकळेपणाने सांगून टाक. मी तुझी बालमैत्रीण आहे ना. सांग यार काय झालं ते.”
“आहे तसंच काहीतरी. पण आता काही उपयोग नाही.”
“पण का…?”
“कारण आजच्या काळात मुलांना फक्त गोर्‍यागोमट्याच मुली आवडतात. तो स्वतःही दिसायला हँडसम आहे. मग तो का म्हणून माझ्याशी लग्न करेल?”
“त्यानं तसं सांगितलं का तुला, की त्याला तू आवडत नाहीस?”
“नाही… पण त्याला माझ्यापेक्षा सुंदर मुलगी सहज मिळणार आहे, मग मी का म्हणून त्याचं नुकसान करू? पण मला तो खूप आवडतो. मी त्याच्याशिवाय नाही राहू शकणार. मला सारखी त्याचीच आठवण येते आहे. मी काय करू?”
“धन्य आहेस तू. कोण आहे हा?”
“मानस, ऑफिसमध्ये होता माझ्यासोबत.”
“बरं, सकाळी पाहू काय ते. झोप आता.”
रात्रभर मनवाने रश्मिकाच्या व्हॉट्सअ‍ॅपवरचे मानसने केलेले सर्व मॅसेजेस वाचले. त्यावरून मानसही रश्मिकावर प्रेम करतो, हे मनवाच्या लक्षात आलं. पण रश्मिका स्वतःच्या सावळ्या रंगामुळे त्याच्यापासून दूर पळत होती. मनवाने रात्रीच मानसला रश्मिकाच्या फोनवरून कॉल केला. त्याला सगळी हकिकत सांगितली. दुसर्‍या दिवशी सकाळी सात वाजताच मानस रश्मिकाच्या घरी हजर झाला. मानस आला आणि मनवा आपल्या घरी निघून गेली.
“काय गं, तुला कोणी सांगितलं मला गोर्‍या रंगाच्या मुली आवडतात?”
“मग का बरं, त्या भाविकाच्या मागेपुढे फिरतोस? आणि असंही सावळ्या रंगाच्या मुलींना कोणी पसंत करत नाही. मग तू का म्हणून करशील?”
“परत तेच, तू मला माणूस म्हणून आवडलीस म्हणून मी तुझ्या इतक्या जवळ आलो आहे. तू छान दिसावीस म्हणून मी तुला सहज काही वाक्यं बोललो. मी तुझ्या मनावर प्रेम केलं, रंगावर नाही. रंग हे ईश्‍वरानं दिलेलं रूप आहे; पण मन हेच माणसाचं खरं रूप आहे. सावळाई गं माझी तू. मूर्ख आहेस तू. जीव घेतलास इतके दिवस माझा. मी बिचारा विचार करून करून वेडा झालो की,
असं काय घडलंय की रश्मिका माझ्यापासून दूर जाते आहे.”
“आणि तुझ्यासाठी रडून रडून माझे डोळे सुजलेत,
त्याचं काय…?”
मानसने रश्मिकाला आपल्या मिठीत ओढून घेतलं.
“आईबाबा कधी येताहेत गावाहून?”
“उद्या… का?”
“उद्या संध्याकाळी येतो मी मागणी घालायला. तयारीत राहा भाविका मॅडम… ओ सॉरी सॉरी…
रश्मिका बाई. नाव सेम आहे गं तुमचं, म्हणून गोंधळ होतो.”

  • चित्रा नानिवडेकर