रेशीमगाठी (Short Story: Reshimgathi)

रेशीमगाठी (Short Story: Reshimgathi)


“कार्टे, पुण्याला तुला शिकवायला पाठवली की घराण्याची अब्रू विकायला? आण तो फोन इकडे. दोनच दिवसांत तुझं लग्न लावतो
की नाही ते बघ आता…”
रुचा खूप खूश होती. बर्‍याच दिवसांनी गावी आली होती. तिच्यासाठी खास खोली होती वरच्या मजल्यावर अभ्यास करायला. रुचा इतर ठिकाणी कमी आणि तिच्या खोलीतच जास्त सापडत असे. स्मार्टफोन हातात असल्याने कुणाचीही उणीव तिला खोलीत भासत नव्हती. पण अचानक आबा आले खोलीत.
“कार्टे, पुण्याला तुला शिकवायला पाठवली की घराण्याची अब्रू विकायला? आण तो फोन इकडे. दोनच दिवसांत तुझं लग्न लावतो की नाही ते बघ आता.”
“अहो आबा, काय झालं? ते तर सांगा.”
“कोणत्या मारवाडी मुलासोबत हिंडतेस तू पुण्यात?
तुझा आणि त्याचा काय संबंध आहे?”
“अहो आबा, आम्ही फक्त मित्र आहेत.”
“अगं ए भवाने, बापाला मूर्ख बनवतेस? कॉलेजमध्ये मुली काय कमी पडल्या की मुलांशी मैत्री करू लागली तू? मित्रासोबत लोणावळा-खंडाळा फिरायला जातेस ना?”
आता मात्र रुचाची दातखीळ बसली. आबांना सगळं समजलं आहे, त्यामुळे आपण गप्प बसण्यातच शहाणपण आहे, हे तिला समजून चुकलं.
“खबरदार जर दरवाजा कोणी उघडाल तर. लाथ घालेन एकेकाच्या कमरेत.” आबांनी संतापाने दरवाजा बाहेरून लावून घेतला. रुचाला आता भीती वाटू लागली… आबा काय करतील? परत पुण्याला पाठवतील की नाही? पुढचं शिक्षण? आत्तापर्यंत केलेला एवढा अभ्यास…. सगळं
वाया गेलं…
“पोरीनं नाक कापलं सदा…”
“अजूनही वेळ गेलेली नाही आबा. सुलूला बोलव
आणि तिच्या पोराशी लगीन लावू दे तिचं. म्हणजे सगळेच प्रश्‍न मिटतील.”
“सुलू ऐकेल का पण…”
“का नाही? तिच्या घरचे वारले, तेव्हा आपणच मदत केली की तिला. पाठची बहीण आहे ती आपली. आपला मान ठेवेलच ती. मी बोलतो तिच्याशी. तू नको चिंता करू. तू लग्नाची तयारी कर.”


“महेश, सदा मामाचा फोन होता आज. रुचाला
तुझी सून म्हणून स्वीकार कर, असा हट्ट करत होता.
काय सांगू?”
“छे, काहीतरीच काय? मी पोलीस, ती इंजिनिअर. काही ताळमेळ आहे का? आपल्याला बारावी पास मुलगीच करायची आहे. सांग मामाला.”
“हे बघ, ती रुचा कोण्या मारवाड्याच्या जाळ्यात अडकली आहे. वेळीच तिचं लग्न झालं तर आपोआपच सर्व प्रश्‍न सुटतील, असं त्यांना वाटतंय.”
“पोरीनं लफडं केलं म्हणून माझी आठवण झाली…”
“असं कसं म्हणतोस? तुझे बाबा गेल्यानंतर त्यांनीच तर सावरलं आपल्याला.”
“त्याचीच किंमत वसूल करत आहेत का ते आज?”
“महेश, तुला लग्न करायचं नसेल, तर स्पष्ट सांग.विनाकारण त्यांना उलटसुलट बोलू नकोस. माझ्या माहेरच्या लोकांनी आज प्रथमच माझ्याकडे काहीतरी मागितलं आहे. माझी मान खाली घालू नकोस.”
महेशला रुचा पसंत होती; पण तिचं हे प्रेमप्रकरण त्याच्या डोक्यात जात होतं. पण आईला दुखवणंही शक्य नव्हतं. अखेरीस नाईलाजाने महेश आईसोबत कोल्हापूरला पोहोचला. थाटामाटात लग्न पार पडलं. सुट्टी नाही म्हणून नवरदेव ताबडतोब पुण्यात परतले. रुचाचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून तीही महेशसोबत पुण्यात आली. सुलूआत्या मात्र एक-दोन दिवस माहेरी थांबली. एसटीच्या प्रवासात रुचा अधूनमधून डोळ्यातून पाणी गाळत होती. महेशला हे अपेक्षितच होतं. त्यामुळे तो पाहून न पाहिल्यासारखं करत होता. अखेरीस पुण्याच्या पोलीस क्वार्टरमध्ये नवविवाहित जोडपं पोहोचलं. तीन खोल्यांचं छोटंसं घर. एक स्वयंपाकघर, हॉल आणि मधली बेडरूम. बेडरूम म्हणजे, पलंग टाकलेली छोटीशी खोली. रात्रीचे आठ वाजले होते. महेश हातपाय धुऊन फ्रेश झाला. हॉटेलवर जाऊन सोयाबीन चिलीचं एक पँक घेऊन आला.
“मी जेवण करून आलो आहे बाहेरून. हे खाऊन घे.”
रुचा डोक्याला हात लावून, मान खाली घालून, डोळे बंद करून बसलेली होती. महेश आतमध्ये जाऊन झोपून गेला. रात्रीचे दोन वाजले. घराचा दरवाजा कोणीतरी ठोकू लागलं. महेशची झोप खूप चाणाक्ष. त्याला लगेच चाहूल लागली. रुचाही सोफ्यावर उठून बसली. महेशने दरवाजा उघडला.
“मुझे रुचा से बात करनी है.”
“अरे ए, कोण तू?”
“तुम रुचा को बुलावो. देखीये वो भी मुझसे प्यार करती है. उसकी शादी जबरदस्ती आपके साथ की गयी है.”


“अरे ए, बंद कर तुझं तोंड. तुमचं पहिलं काय होतं मला माहिती नाही; पण आता ती माझी बायको आहे. त्यामुळे तिला विसरायचं. यापुढे परत कधी तिला भेटलास तर पोलीस स्टेशनलाच जमा करेन तुला. तुमचं सगळं संपलं आहे आता. समजलं! निघ आता, का माझा पोलिसी खाक्या दाखवू?”
महेशने खाडकन दरवाजा बंद केला. टीपॉयवरचं सोयाबीन चिलीचं ते पाकीट पाहून तो रुचावरच खेकसला, “हे बघ, तुला शेवटची वॉर्निंग देतो आहे मी. तुझी सर्व नाटकं बंद कर. तुझ्या या नाटकांमुळे जर माझ्या आईला त्रास झाला, तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही. आजची रात्र तू इथेच झोप; पण उद्या आई आल्यावर गुपचूप मधल्या खोलीत माझ्यासोबत पलंगावर झोपायचं आणि तेही दरवाजा बंद करून. एक सून म्हणून माझ्या आईचा अपेक्षाभंग करू नकोस. आधी लफडी करायची आणि पुढे जन्मभर इतरांना त्रास द्यायचा. चांगलं आहे तुमचं.” महेश ताडताड बोलून निघून गेला. रुचा मात्र डोळ्यातील पाणी थांबवू शकत नव्हती. तशीच रडत रडत सोफ्यावरच पडून राहिली.
सकाळी लवकर उठून महेश पोलीस स्टेशनला निघून गेला. थोड्याच वेळात आत्या येणार होती. रुचा साडी नेसूनच आत्याची वाट पाहत होती. महेश आईला घेऊन आला.
“अगं हे काय, तू आणि साडी. तू पंजाबी ड्रेस घातला तरी चालेल मला.”
“चहा ठेवू का तुमच्यासाठी?”
“ठेव, ठेव. असंही स्वयंपाकात तेवढंच येत असेल तुला.” महेश म्हणाला.
“महेश, असं पुन्हा कधी टाकून बोलू नकोस हं माझ्या सुनेला. मला आवडणार नाही.”
महेश चहा पिऊन पुन्हा पोलीस स्टेशनला निघून गेला. दोघी सासू-सुना गप्पा मारत बसल्या. सुलूआत्याने रुचाला दुसर्‍या दिवसापासूनच कॉलेज सुरू करायला सांगितलं. त्यामुळे रुचाला हायसं वाटलं. संध्याकाळी महेश घरी आला. टीव्ही पाहत तिघांनी जेवण केलं. महेश पुन्हा पुन्हा रुचाकडे पाहत होता; पण रुचा मात्र एकदाही त्याच्या नजरेला नजर देत नव्हती. सुलूआत्याला दोघांचा खेळ लगेच लक्षात आला.सुलूआत्या जेवण होताच मंदिराचं नाव करून घराबाहेर निघून गेली. महेश टीव्ही पाहत सोफ्यावर बसला होता. रुचा मात्र मधल्या खोलीत लाइट बंद करून पलंगावर लोळत होती. आई येताच महेशही मधल्या खोलीत शिरला आणि दरवाजा बंद करून घेतला. महेश येताच रुचाने त्याच्याकडे पाठ केली. महेश गालातल्या गालात हसत होता आणि पटकन पांघरूण घेऊन झोपी गेला. रुचा मात्र उद्या कॉलेजमध्ये सारंग भेटल्यावर काय करायचं, हा विचार करत होती. सकाळी लवकर उठून दोघंही तयार झाले.
“महेश, हिला कॉलेजला सोड.”
“पाठव लवकर, मला उशीर होतोय.”
रुचा महेशसोबत कॉलेजला पोहोचली.
रुचाच्या मैत्रिणी महेशकडे तिरस्कारानेच पाहत होत्या. सर्व कॉलेजला सारंग आणि रुचाचंच लग्न होईल, असं वाटत होतं. पण अचानक महेशशी लग्न झाल्याने सगळ्यांना वाईट वाटत होतं. रुचाच्या मैत्रिणींचा अ‍ॅटिट्युड पाहून महेश नाराजच झाला. पटकन गाडीला किकमारून तो निघून गेला. महेश जाताच सारंग रुचासमोर येऊन उभा राहिला. सारंगला पाहून रुचा
पटपट क्लासमध्ये जाण्यासाठी चालू लागली. पण सारंगने हात पकडून तिला एका झाडाखाली थांबवलं.
“तू आधी माझा हात सोड आणि आता सर्व काही संपलं आहे, तेव्हा माझी वाटही सोड.”
“काय संपलं आहे? कोण, कुठला तो पोलीस, त्याच्यासोबत आयुष्य जगणार आहेस तू?”
“तो कोण कुठला नसून आता माझा नवरा आहे आणि माझ्या आईवडिलांनी त्याला माझ्यासाठी निवडलं आहे. तसंही गावाकडे अरेंज मँरेजच केलं जातं. तसंच माझ्याबाबतीतही घडलं.”
“आणि माझं काय?”
“तूही माझा नाद सोड आणि नवीन सुरुवात कर.
जर तू खरंच माझ्यावर प्रेम केलं असशील तर सारंग, यापुढे मला कधीही भेटू नकोस, ही एकच विनंती करते मी तुला,” हे बोलून रडतरडतच रुचा वॉशरूममध्ये निघून गेली.
चार वाजता कॉलेज करून रुचा घरी आली. रोज रात्री दहा-अकरा वाजता येणारा महेश आज पाचलाच येऊन
बसला होता.
“काय मग, स्वारी मजेत दिसते आज?”
“नाही गं आई, तुझं नं काही तरीच…”
“पिक्चरला जा तुम्ही दोघं सहा ते नऊ. मी मस्त वांग्याचं भरीत आणि कळण्याच्या भाकर्‍या करून ठेवते रात्रीच्या जेवणासाठी.”
“तुझ्या सुनेला सांग आधी.”
“नाही, नाही, नको. कशाला उगीच… नंतर कधीतरी जाऊ आम्ही.” रुचा उगाचच आढेवेढे घेऊ लागली.
“जा सांगितलं ना… तर निघ आता.”
महेश आणि रुचा टॉकिजमध्ये बसले होते. महेश पूर्ण आनंद घेऊन चित्रपट पाहत होता. रुचा मात्र मधूनमधून महेशकडे पाहत होती. कधी खाली पाहत होती. तिच्या डोक्यात बरेच विचार येत होते. तो चित्रपट तिला काहीच समजत नव्हता. मधूनच तिला सारंगसोबत पाहिलेल्या चित्रपटाचीही आठवण येत होती. चित्रपट संपल्यावर दोघंही घरी यायला निघाले.
“छान होता ना पिक्चर?”


“हो.”
“काय स्टोरी होती सांग?”
रुचा एकदम शांत झाली. घरी येताच आईची स्तुती करून करून महेश वांग्याचं भरीत खात होता.
“आई, तुझ्या सुनेला आता सर्व स्वयंपाक शिकवून टाक हं. तुला कधी आराम मिळेल?”
“बरं, बरं जेव आता.”
सुलूआत्या जेवण करून मंदिरात निघून गेली. रुचा स्वयंपाकघरात भांडी आवरत होती. महेशने घराचा पुढचा दरवाजा लावला आणि किचनमध्ये रुचाजवळ येऊन बसला.
“कॉलेजमध्ये नसती लफडी केली नसती, तर मामाने माझ्या गळ्यात बांधली असती का तुला?”
“मला तो विषय नको आहे आता.”
महेश रुचाच्या पाठीमागे येऊन उभा राहिला. त्यामुळे रुचाने पटकन फास्ट नळ चालू करून भांडं तसेच गॅसच्या ओट्यावर ठेवून दिलं. रुचाने दरवाजा उघडला आणि बाहेरच्या ओट्यावर येऊन बसली. महेशने टीव्ही चालू केला आणि जुन्या हिंदी चित्रपटांची गीतं ऐकू लागला. ती रोमँटिक गाणी ऐकून रुचाला काय करावं, तेच समजत नव्हतं.
“तू माझ्यापासून लांब लांब का पळतेस? मी काही चुकीचं वागतो आहे का?”
तेवढ्यात सुलुआत्या येऊन उभी राहिली आणि विषय अपुराच राहिला. काही दिवस असेच गेले.
एके दिवशी सकाळी आत्याला ताप होता.
“आईची काळजी घे”, असं रुचाला सांगून महेश घरातून बाहेर पडला. सुलूआत्याने सांगितलं म्हणून रुचा कॉलेजला निघून गेली. दुपारी बारा वाजता अचानक आत्याला चक्कर आली आणि ती खाली पडली. थोड्या वेळाने वाणीकाकू घरी आल्या आणि त्यांनी महेशला ताबडतोब फोन करून बोलवून घेतलं. सुलूआत्याला दवाखान्यात अ‍ॅडमिट केलं. चार वाजता रुचा घरी आली, तेव्हा तिला झाला प्रकार समजला. ती तातडीने दवाखान्यात गेली. तिचा सामना महेशशी झाला.
“आता कशी आहे आत्या?”
“एक दिवस कॉलेजला गेली नसती, तर काय बिघडलं असतं तुझं? आईला जर काही झालं असतं ना, तर तुला कधीच माफ केलं नसतं मी. लग्न झालं आहे आता तुमचं. घरच्या जबाबदार्‍या उचला जरा…” असं खूप काही काही महेश रुचाला बोलून गेला. रुचाच्या डोळ्यात पाणी आलं. डोळ्यातलं पाणी पुसून ती आत्याकडे गेली. सुलूआत्याला घेऊन दोघंही रात्री आठ वाजता घरी आले.
“खिचडी कर पटकन. मला भूक लागली आहे खूप.”
“पण मला येत नाही.”
“मग शिक ना. आई आता महिनाभर काहीच करणार नाही. डॉक्टरांनी तिला आराम करायला सांगितलं आहे. समजलं का तुला? जेवण वाढ मला.”
रुचाने घाबरत घाबरत कसातरी कुकर लावला. तिच्या हातची तिखट-खारट खिचडी महेशने कशी तरी खाल्ली आणि झोपला. रुचा मात्र आता स्वयंपाक येण्यासाठी जातीने प्रयत्न करू लागली. हळूहळू महेशला अपेक्षित असणारी टिपिकल मध्यमवर्गीय गृहिणी बनून ती घर सांभाळू लागली. त्यामुळे महेश तिच्यावर खूपच खूश होता. दोन-तीन महिने असेच गेले. एक दिवस संध्याकाळी साडीच घेऊन आला तो रुचासाठी. रात्री त्याने मधल्या खोलीचे लाइट लावले आणि ती साडी रुचासमोर ठेवली.
“मी तुला खूप काही काही बोललो. पण तू मला कधीही उलट उत्तर दिलं नाहीस. मामांनी तुझं मन समजून घ्यायला हवं होतं; पण ते माझ्या हातात नव्हतं. तरीही तू माझ्या संसारात रमलीस, म्हणून मी तुझा आभारी आहे.”
“महेश, आज मलाही बोलू द्या. आबा आणि आईला
दुःखी करून मी कशी सुखी राहू शकले असते. उलट वादळात गटांगळ्या खाणार्‍या माझ्या जीवननौकेला तुम्ही सावरलं, म्हणून मी तुमचे आभार मानते. तुम्ही मला संसार करायला शिकवलं. यापुढे आपण आपल्या संसारात दोघांनी मिळून सुखाची बरसात करण्याची शपथ घेऊया.”
रुचा स्वतः महेशचा हात पकडून त्याला देवासमोर घेऊन गेली आणि दोघांनी परमेश्‍वराला नमस्कार केला.

  • अर्चना पाटील