परवड (Short Story: Parwad)

परवड (Short Story: Parwad)

परवड

 • विनायक शिंदे
  लग्न झाल्यापासून नवर्‍याचा हा असा जमदाग्नी अवतार राधा काकूंच्या चांगलाच परिचयाचा झाला होता. त्यांच्या या अशा माणूसघाण्या स्वभावामुळे व तोंडावर स्पष्टोक्ती ओकण्यावर हळूहळू नातेवाईक तर दुरावलेच पण सख्खे भाऊही वैर्‍यासारखे वागले. वडिलोपार्जित इस्टेटीमधली एकही कपर्दिक आम्हाला नको असे म्हणून त्यांनी कधीच गाव सोडले ते कधीच परतले नाहीत.
  ”तुझ्या गण्याला सांग यापुढे तू दुकानात नाही आलास तरी चालेल. मारुती सर्व कामं करतो आणि हा गल्ल्यावर शेठसारखा बसलेला असतो, रुबाबात! इकडची काडी तिकडे करील तर शप्पथ! नुसतं आयतं बसून खायला पाहिजे दोन वेळ. आठवीतनं नववीत जायला दोन वर्षं, नववीत परत दोन वर्षं…“ कुलकर्णी मास्तरानं मला या वेळी सक्त ताकीदच दिलेय. म्हणाला, ”बापू तुमच्या विनंतीवरून मी त्याला शाळेत ठेवलाय. कशाला वरिष्ठांची कुजकट बोलणी ऐकून घ्यायची. यावेळी मी त्याची मुळीच गय करणार नाही. नापास झाला तर सरळ बाहेरचा रस्ता दाखवणार…“
  ”जाऊ द्या वो. आपल्या उतारवयात नवसाने झालेला पोर, त्याला समजून घ्या; आपल्याशिवाय आहे कोण त्याला? मी म्हणते एवढे फडाफडा बोलताय त्याला, काय केलं गणेशनं?“ राधाबाईंच्या टपोर्‍या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायला लागले.
  जरा काही मनाविरुद्ध कोणी बोललं की एखाद्या कसलेल्या नटीनं अभिनय न करता डोळ्यात अश्रू आणावे तसे त्यांचे अलीकडे झाले होते. गावात कोणी अचानक दगावला किंवा विमान भरकटून पायलटचा अचानक ताबा सुटून त्याचा स्फोट झाला, अशी पेपरातली बातमी ऐकून त्यांचं काळीज धडधडून डोळ्यावाटे गंगा-यमुना अवतरायच्या.
  ”तू लाडावून ठेवले आहेस. त्यामुळे तो चढलाय. या गावात त्याचे काय काय उद्योग चालतात, याची बित्तंबातमी आली आहे माझ्या कानावर… आता तर मला संशय आहे, नाही खात्रीच झाली आहे. माझा आणि मारुतीचा डोळा चुकवून हाच गल्ल्यातले पैसे ढापतो. मी गप्प आहे तोवर गप्प, पण एकदा माझ्या डोक्याचा आटा सटकला ना तर घराबाहेर नव्हे तर गावाबाहेर हाकलून देईन.‘’
  ”अहो, काय तोंडाला येईल ते काय बोलता… पोटच्या पोराबद्दल ही असली भयंकर भाषा…?“
  ”तू मलाच दूषणे दे. गाव म्हणेल ब्राह्मणाचा पोर आणि लांडी लबाडीत जगाला घोर… मग बस कपाळ बडवीत लोकांच्या नावाने.“
  लग्न झाल्यापासून नवर्‍याचा हा असा जमदाग्नी अवतार राधा काकूंच्या चांगलाच परिचयाचा झाला होता. त्यांच्या या अशा माणूसघाण्या स्वभावामुळे व तोंडावर स्पष्टोक्ती ओकण्यावर हळूहळू नातेवाईक तर दुरावलेच पण सख्खे भाऊही वैर्‍यासारखे वागले. वडिलोपार्जित इस्टेटीमधली एकही कपर्दिक आम्हाला नको असे म्हणून त्यांनी कधीच गाव सोडले ते कधीच परतले नाहीत. बापूनीही कधी त्यांची साधी चौकशी केली नाही. राधा काकू त्यांच्याबद्दल काही सांगायला गेल्या तर त्यांचे ठरलेले उफराटे बोलणे – ”ते मला मेले, मी त्यांना मेलो, विषय संपला. तुला त्यांचा पुळका आला असेल तर जा त्यांच्याकडे आणि बस त्यांचे जोडे चाटीत.‘’
  आता हातातोंडाशी आलेला लेकही आपल्या हातून जायचा या चिंतेने राधा काकू रात्रंदिवस तळमळत राहायच्या. गल्लीत मुलं खेळत होती. एकाएकी त्यांचा कालवा थांबला. सार्वजनिक नळावर पाणी भरणार्‍या, कपडे धुणार्‍या, मोठमोठ्याने सासर-माहेरच्या त्याच त्याच गोष्टी एकमेकींना सांगणार्‍या बायकांनी आपलं बोलणं मध्येच थांबवीत कान टवकारले. वर्षा दोन वर्षांनी गावात हमखास फेरी घालणारे तेच ते भयंकर दिसणारे साधू त्या गल्लीच्या तोंडाशी अवतरले होते. त्यांनी नेहमीप्रमाणे विटलेला भगवा वेष परिधान केला होता. कमरेला गुंडाळून मानेभोवती बांधलेली भगवी कफनी, छातीवर लोळणारी सफेद दाढी, कित्येक दिवस तेलाचा स्पर्श न झालेले भगभगीत केस, मनगटावर भस्माचे पट्टे, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा. त्यातल्या एकाच्या खांद्यावर एकतारी होती. त्याच्या एका डोळ्यात फुल पडलेले होते. तर दुसरा डोळा बाहेरच्या बाजूला ओथंबलेला होता. तो तोंडाची विचित्र हालचाल करीत कबिराचे दोहे आपल्या चिरक्या आवाजात पुनःपुन्हा आळवीत होता. दुसरा साधू आपल्या भिरभिरत्या नजरेनं इकडे तिकडे पाहात त्याला जमेल तशी साथ देत होता. बाहेर उभ्या होत्या त्या बायका त्यांच्या येण्यानं आलेलं दडपण लपवण्यासाठी घरात पळाल्या.

 • विशा खराटेची जवळजवळ नव्वदीला आलेली म्हातारी बाहेर बेड्यात उभी होती. तिला पाहिल्यावर त्या मोठ्या साधूनं गाणं थांबवलं व ओळखीचं हास्य करीत म्हणाला,
  ”कैसी हो माई…?“
  ”ईश्‍वर की क्रीपा है.“
  ”आपकी तबियत अच्छी है? “
  त्यावर चेहर्‍यावर सुरकुत्या पडलेली ती म्हातारी गालातल्या गालात हसली. त्याला द्यायला आणलेले नाणे तिने अगत्याने त्याच्या पडशीत टाकले.
  ”भगवान आपको सुखी रखे…“ असा पोटभर आशीर्वाद देत ते पुढे गेले. राधा काकू त्या दोघा साधूंची वाट पाहत असल्यासारखी उभी होती. तिला त्यांना काहीतरी विचारायचे होते. नशीब त्यावेळी बापू घरात नव्हते. ते नेहमीप्रमाणे आपल्या किराणा मालाच्या दुकानावर गिर्‍हाइकांची वाट पाहात बसले होते. दुकान त्यांच्या वाड्यापासून बरेचसे लांब अंतरावर असल्यामुळे ते घरी जेवायला येत नसत. दुकानाच्या खालच्या अंगाला बेबीताईची खानावळ होती. तिथे जेवत. दोन तीन वर्षांपूर्वी या वाटेवर भिक्षा मागताना त्यांची नेमकी बापूंशी गाठ पडली होती. तेव्हा ते या दोघांच्या अंगावर आग ओकत म्हणाले होते,
  ”अरे गोसावड्याने, दिसताय तर चांगले धडधाकट, मग असे भीक मागत लोकांना का छळता? परत या गावात दिसलात तर पोलिसांना बोलवीन आणि खडी फोडायला पाठवीन.“ हा त्यांचा झालेला अपमान ते विसरले नव्हते, म्हणून ते राधा काकूंच्या वाड्यासमोर न थांबता पुढे गेले. तेवढ्यात वाटेतल्या झाडावर अचानक कावळ्यांनी कालवा केला. त्या दोघांच्या मनात काय आले कुणास ठाऊक. त्यांनी तोंड फिरवले व राधा काकूच्या घरासमोर येऊन ताठ उभे राहिले. त्यांना कसली तरी अंतःप्रेरणा झाली असावी, त्यातला म्हातारा साधू थांबला.
  ”माई तुला कसलं तरी दुःख आहे. त्याबद्दल तुला आम्हाला काहीतरी विचारायचं आहे… होय ना?“
  राधा काकूना कमालीचं आश्‍चर्य वाटलं. आपल्या मनातलं दुःख या साधूना कसं कळलं. लोकांना ते भणंग वाटतात.
  ”बाबा, मला माझ्या एकुलत्या एक मुलाबद्दल, गणेशबद्दल विचारायचं आहे. अलीकडे तो विचित्र वागतो. तासन्तास बाहेर असतो, तो वाईट मुलांच्या तर नादी लागला नाही ना? त्याला कसला वाईट नाद तर लागला नाही ना? त्याचा बाप त्याला डोळ्यासमोर धरीत नाही. मी काय करू? तो सुधारेल ना?“
  क्षणभर डोळ्यात फुल पडलेल्या साधुनं आकाशात पाहिलं आणि त्याचा चेहरा एकदम भयभीत झाल्यासारखा दिसायला लागला. जणू काही आगामी संकटाची त्याला चाहूल लागली असावी. तो भीत भीत म्हणाला,
  ”आई, या मुलाला वेळीच आवर घाल. नाहीतर तुझ्या हातचा जाईल. त्याला मृत्युयोग आहे.‘’
  तिने भिक्षा देण्यासाठी सुपातून आणलेले तांदूळ त्याने स्वीकारले नाही आणि क्षणात झाडांच्या सावलीत ठेचकाळत पुढे गेले ते दिसलेच नाहीत.
  तो शनिवारचा दिवस होता. गावातल्या मारुती मंदिरात पहाटे पाच वाजल्यापासून भक्तगणांची रीघ लागायची. परगावातले मारुती भक्त दर शनिवारी रुईची माळ व वाटीभर गोडे तेल घेऊन न चुकता त्या मंदिरात यायचे. पंचक्रोशीत हनुमान कडक दैवत म्हणून गेली कित्येक वर्षे ख्याती पावलेले होते. दिवसाआड एखादा नाथपंथी जोगी त्या देवळात मारुतीची सेवा करताना दृष्टीस पडायचा. म्हातारा अंतू गुरव त्या मंदिराचा परंपरागत पुजारी होता. मंदिराच्या पाठीमागे घनदाट आमराई होती. तिथेच ते भग्न तळं होतं. स्फटिकासारख्या स्वच्छ पाण्यानं तिथला अर्धा अधिक परिसर व्यापला होता. गावातले वयोवृद्ध पुरुष त्या तलावाबद्दल माहिती विचारली तर सांगत, आम्ही 80 वर्षांपासून हे तळं पाहतो आहे. हे तळं अगदी असंच आहे. इतकं ते जुनं होतं.
  पूर्व दिशेला लालिमा हळूहळू लुप्त होत गेला आणि सूर्याची सोनेरी किरणं निळ्या अंबरात चोर पावलांनी विराजमान व्हायला लागली. रात्रभर अंधाराची सोबत करीत, घरट्यात आराम करीत ताजेतवाने झालेले पक्षी मग थव्याथव्याने उडायला लागले, तेव्हा त्यांच्या कलकलाटाने मंदिराच्या आसपासचा परिसर नव संजीवनी प्राप्त झाल्यासारखा जागा झाला. अगोदरच उशीर झाला म्हणून घाईघाईने अंतू गुरव चालला होता. रात्री त्याला नीट झोप लागली नव्हती. त्याचा डावा डोळा अचानक लवायला लागला होता. डावा डोळा लवणे हे अशुभतेचे लक्षण आहे हे अगदी बालपणापासून त्याच्या मनावर पक्के बिंबले होते.
  गावात आज काहीतरी अशुभ घडणार नाही ना? अशी अभद्र शंका त्याच्या मनाला चाटून गेली. गेल्या गेल्या त्याने त्या मंदिरातली आतली बाहेरची विजेची बटणं दाबून भरपूर उजेड केला. मंदिरातल्या मारुतीच्या भव्य शेंदरी मूर्तीकडे त्याचं लक्ष गेलं आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली. मारुतीच्या मुर्तीचे चांदीचे डोळेच जाग्यावर नव्हते. रात्री काळोखात कोणी अज्ञात चोरट्याने मोठ्या हिकमतीने ते चांदीचे डोळे काढले होते. हां हां म्हणता ही वार्ता वार्‍यासारखी गावभर पसरली आणि सर्वांचे डोळे फिरले. रामा सुताराचा म्हातारा 80 वर्षांचा होता. तो अगदी बालपणापासून बजरंगबलीची भक्ती करायचा. ही अशुभ वार्ता ऐकून त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. उद्वेगाने तो म्हणाला, ”माझ्या मारुतीरायाला आंधळा करणारा ठार आंधळा व्हयील.“ जमलेल्या गर्दीत कोन आसल चोर? अशी कुजबुज सुरू झाली. आपल्यावर ही बला येऊ नये म्हणून अंतू गुरव मनातल्या मनात मारुतीला साकडे घालीत होता. कारण मंदिराच्या बाहेरच्या गेटची चावी त्याच्याकडेच होती. नेहमी तोच मंदिर उघडायचा आणि तोच रात्री उशिरा मंदिर बंद करायचा. मग चोरी झालीच कशी? जो तो एकमेकांना हाच प्रश्‍न विचारीत होता.
  एवढ्यात कोणीतरी प्रश्‍न उपस्थित केला, काल गावात दिसलेले ते साधू रातोरात गायब झाले होते आणि आश्‍चर्याची दुसरी गोष्ट, सखाराम बापूंचा मुलगा गणेशही घरी परतला नव्हता. राधा काकू दरवाजात उभी राहून त्याची आतुरतेने उपाशी पोटी वाट पाहत होती. शेवटी पहाटे कोंबड्याने बांग दिल्यावर तिला झोप अनावर झाली अन् ती तिथल्या तिथे जमिनीवर झोपली. सखाराम बापूना अजिबात झोप येत नव्हती. तेवढ्यात दोन-चार माणसे विचारूनही गेली, गणेश आला का? सकाळी राधा काकू उठल्यावर बापूंनी राधा काकूंच्या अंगावर जणू काय बॉम्ब टाकला.
  ”राधे, मला वाटतं हे काम आपल्या गण्याचंच असलं पायजे. लोक उगीचच त्या साधूवर आळ घेताहेत. बिचारे गावोगाव देवाचे नाव घेत पोटासाठी भटकतात.‘’ क्षणभर राधा काकू बापूंकडे पाहातच राहिल्या. त्यांचा आपल्या कानावर विश्‍वास बसेना. प्रत्यक्ष जन्मदाता बाप आपल्या मुलाबद्दल असे वाईट विचार करतोच कसा? त्यांच्या डोळ्यापुढे अंधार झगमगला.
  ”तुमच्या जिभेला काही हाड… गणेशबद्दल असले वाईट-वंगाळ शब्द काढताना तुमची जीभ -“
  ”उद्या पोलीस त्याला असेल तिथून हुडकून काढतील आणि बेदम मारझोड करून तुझ्यापुढे आणतील तेव्हा काय करशील? त्यांना ओरडून सांगशील माझा मुलगा अपराधी नाही म्हणून.“
  दुसर्‍या दिवशी पोलिसांची जीप येऊन मंदिरापुढे थडकली. जिल्ह्यातल्या आमदार सुरनळेनी त्यांना दम देऊन पाठवले होते. सावळे इन्स्पेक्टरने प्रथम मंदिराच्या पुजारी अंतू गुरवाची उलट तपासणी घेतली. परंतु त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. मग गावाबाहेर कोणी गेल्याची त्याने चौकशी केली. त्यातून त्याला सखाराम बापूंच्या मुलाव्यतिरिक्त कोणीही व्यक्ती गावाबाहेर गेली नसल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी नंतर कित्येक गावं पालथी घातली. त्यांचा कोनाकोना छानला पण त्यांना ते दोन साधू व सखाराम बापूंचा मुलगा गणेश याचा तपास लागला नाही. अशा केसचे शेवटी होते तेच झाले. ती केस पेंडींग म्हणून फाईल झाली.
  मुलाच्या धास्तीने राधा काकू जवळजवळ वेड्याच झाल्या. ध्यानीमनी नसताना एक दिवस सखाराम बापूंना जबरदस्त अ‍ॅटॅक आला. त्यातच ते निवर्तले. दुकानाची जबाबदारी मग मारुतीने अंगावर घेतली व राधाकाकूची सर्व जबाबदारी घेतली. या घटनेला जवळजवळ 20 वर्षे उलटून गेली. हळूहळू लोक त्या वाईट घटनेला जवळ जवळ विसरून गेले. राधा काकूंचे केस, भुवयांचे केस पांढरे झाले. गोर्‍यापान चेहर्‍यावर सुरकुत्या पडल्या. त्या कमरेत वाकल्या आणि जख्खड म्हातार्‍या झाल्या. दृष्टी अंधुक झाली. लांबचे दिसेना. तरीही डोळ्यात प्राण आणून गणेशाची वाट पाहत राहायच्या. त्यांना वाटायचे काहीतरी उलथापालथ होऊन चमत्कार घडेल व एके दिवशी गणेश आपल्या पुढ्यात येऊन उभा राहील आणि म्हणेल – ”आई मला माफ कर, मी तूला खूप वाट पाहायला लावली. माझ्यामुळे तुझ्या जिवाची खूप परवड झाली. यापुढे तुला सोडून कुठेच जाणार नाही.“ इतके दिवस जे अघटित घडले नाही ते असे एकाएकी थोडेच घडणार! तशा गणेशला ओळखणार्‍या थोड्याच व्यक्ती आता गावात जिवंत होत्या.
  राधा काकू आता वयोमानामुळे थोड्या सैरभैर झाल्यासारख्या वाटत होत्या. दिवसा नाहीच पण रात्रीही त्यांना झोप लागत नव्हती. ती पौर्णिमेची रात्र होती. आकाशात टिपूर चांदणं पडलं होतं. दिवसा आधारवड वाटणारी झाडं रात्रीच्या चंदेरी प्रकाशात दबा धरून बसलेल्या चोरासारखी वाटत होती. मधूनच कुत्र्यांचा कालवा कानांना त्रास देत होता. सावज गिळल्यावर अजगर जसा सुस्तपणे पडून असतो, तसा सारा गाव झोपेच्या अधीन झाला होता. पहाटेच्या पाऊलखुणा स्पष्टपणे दिसायला लागल्या. एकाएकी राधा काकू शुद्धीवर आल्यासारख्या उठल्या. देवघरात गेल्या. त्यांना अचानक प्रसन्न झाल्यासारखं वाटायला लागलं. त्याच उत्साहात रात्री विझलेल्या निरांजनाची वात त्यांनी पेटवली. देव्हार्‍यात प्रकाश पडला. काहीतरी आठवल्यासारखं वाटलं. ते त्यांना आठवलं, त्यांनी त्वरेने अगरबत्ती पेटवून ती लावली. त्या कोंदटलेल्या घरात अगरबत्तीचा मंद सुवासिक सुगंध दरवळायला लागला. अचानक त्यांना आभाळातल्या चंद्राची आठवण झाली. सताड उघड्या दरवाजात त्या आल्या. आभाळातले चंद्रबिंब आता मलूल झाल्यासारखं वाटत होतं. चांदणं विझत आलं होतं. अनाहूतपणे त्यांनी हात जोडले. अचानक त्यांना अंगणातल्या फणसाच्या झाडाखाली कोणाची तरी सावली हललेली दिसली. फिक्कट प्रकाशात ती अज्ञात व्यक्ती पुढे आली.
  ”कोण आहे? चोर असशील तर पुढे येऊ नकोस.“ त्यांचा आवाजाला विलक्षण धार आली होती. त्या व्यक्तीचा चेहरा दिसावा म्हणून त्यांनी देव्हार्‍यातलं निरांजन आणलं. प्रकाशात एक जख्खड म्हातारा साधू उभा होता. त्यांना एकदम तीस वर्षांपूर्वीचं आठवलं.
  त्या म्हणाल्या, ”मी तुला ओळखलं आहे. तू तोच आहेस मारुतीचे डोळे चोरणारा. आता काय हवं आहे?“ तो जवळजवळ शेवटच्या स्थितीत आलेला साधू खाली वाकला. त्यानं राधा काकूंचे पाय धरले. अत्यंत दीनवाण्या स्वरात तो म्हणाला, ”आई मी तुझा गणेश. त्या साधूला परकाया प्रवेश विद्या प्राप्त झालेली होती. त्यानं मला फसवलं. त्यानं माझ्या तरुण शरीरात प्रवेश केला व माझ्या आत्म्याला या त्याच्या जीर्ण शरीरात भरलं. क्षणभर राधा काकूंचं डोकं गरगरलं. त्या खाली पडल्या. त्यांच्या डोळ्यापुढे तेजोमय प्रकाश दिसायला लागला. आपलं शरीर एकदम हलकं झाल्यासारखं… त्यांचा आत्मा पंचत्त्वात विलीन झाला होता.