हुरहुर (Short Story :HurHur)

हुरहुर (Short Story :HurHur)

 • माधुरी महाशब्दे
  केतकीचं विमान यायला अजून तासाभराचा अवकाश होता. प्रतीक्षा, हुरहुर आणि काहीशी अस्वस्थता यांनी सुजयचं मन काहुरलं होतं. गेले काही दिवस तो थोडा तणावाखाली होता. त्यातून मूल होण्याचा क्षण आला होता; पण कसा? हे प्रश्‍नचिन्ह होतं त्याच्यापुढे…
  मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुजय अस्वस्थपणे येरझार्‍या घालत होता. केतकीचं विमान यायला अजून तासाभराचा अवकाश होता. प्रतीक्षा, हुरहुर आणि काहीशी अस्वस्थता यांनी त्याचं मन काहुरलं होतं. खांद्यावर झालेल्या हाताच्या स्पर्शाने तो भानावर आला. त्याने आपल्या बाबांकडे पाहिलं. सुजयच्या नजरेतली व्याकुळता बाबांनी जाणली होती. त्यांनी सुजयच्या खांद्यावर फक्त थोपटल्यासारखं केलं. त्या स्पर्शाने दोघांनी एकमेकांच्या मनातले भाव ओळखले. सुजयला काहीसा दिलासा मिळाला. गेले काही दिवस तो थोडा तणावाखाली होता.त्यातून मूल होण्याचा क्षण आला होता; पण कसा? हे प्रश्‍नचिन्ह होतं त्याच्यापुढे…
  केतकीचं विमान लँड झाल्याची घोषणा झाली आणि सुजय आतुरतेने तिला शोधू लागला. दुरूनच ती दिसल्यावर त्याने आनंदाने हात उंचावला. केतकी बाहेर आल्यावर त्याने चटकन तिला आपल्या बाहुपाशात घेतलं. केतकीचं रूप पाहून सुजय चकीत झाला होता. किती उत्साही, स्मार्ट आणि सुंदर दिसत होती ती! कारमध्ये बसल्यापासून किती आत्मविश्‍वासाने आपल्या प्रोजेक्टबद्दल बोलत होती ती! तिची अमेरिकन वारी यशस्वी झाली होती. सुजयही आनंदला होता. वर्षभरापूर्वी तिचं अमेरिकेला जायचं ठरलं होतं, तेव्हाही त्याला आनंद झाला होता. पण तरी त्याने तेव्हा थोडा विरोध केला होता. त्याचं कारण वेगळंच होतं.
  सुजय आणि केतकीच्या लग्नाला चार वर्षं झाली होती. त्यांचे आईवडीलही आता गोड बातमीसाठी आसुसले होते. आडून आडून ते चौकशी करत होते. सुचवत होते. पण सुजय आणि केतकीकडून कोणताच प्रतिसाद मिळत नव्हता. दोघांच्या करिअरची कल्पना असल्यामुळे तेही जरा समंजसपणे घेत होते. मात्र अलीकडे सुजयला पितृत्वाची आस लागली होती. त्याने केतकीला तसं सुचवून पाहिलं होतं. तिला मात्र त्याची घाई नसावी. आपलं करिअर, नवीन आव्हानं यातच ती इतकी बुडून गेली होती की, आपल्या स्त्रीसुलभ भावनांचीही तिला तीव्रतेने जाणीव होत नसावी.
  पाच वर्षांपूर्वी तिची आणि सुजयची ऑफिसमध्ये कामानिमित्ताने ओळख झाली होती. मीटिंग, चर्चा यानिमित्ताने त्यांच्या वारंवार भेटी होऊ लागल्या. केतकीची हुशारी, तिची महत्त्वाकांक्षा यानं सुजय खूप प्रभावित झाला होता. हळूहळू दोघांच्याही लक्षात आलं की, आपले विचार जुळताहेत. आपण एकमेकांना आवडू लागलो आहोत. कोणाच्याही घरून विरोध होण्याचा प्रश्‍नच नव्हता. सारे सुशिक्षित, समंजस. लग्न झालं. नवलाईचे दिवस सरले आणि दोघे पुन्हा आपापल्या कामात गढून गेले. बघता बघता चार वर्षं होत आली. आता मात्र वडीलधार्‍यांनी पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. पण केतकीला अमेरिका खुणावत होती. सुजय तिला समजावत होता, “केतकी, अमेरिकेला जाण्याची संधी पुन्हा येईल. पण आता आपण ज्या निर्णयाजवळ आलो आहोत त्याचं काय? मला वाटतं, तू आता याचा गांभीर्याने विचार करावास.”
  केतकीला सुजयचं आश्‍चर्य वाटलं. हाच तो सुजय आहे का, जो माझ्या महत्त्वाकांक्षेला प्रोत्साहन देत राहिला. माझी बुद्धिमत्ता, महत्त्वाकांक्षा याची त्याला पूर्ण कल्पना होती. मग आताच का? “सुजय मातृत्वाचा आनंद घेणं मलाही आवडेल. पण कदाचित अगदी लवकरच मला अमेरिकेला जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. ती संधी सोडणं वेडेपणाचं ठरेल आणि फक्त एका वर्षाचाच तर प्रश्‍न आहे…”
  सुजय काहीच बोलू शकला नाही. पण त्याच्या मनात आलं, काय सांगावं हे वर्षं आणखी एका वर्षाने पुढे गेलं तर? दोन वर्षं झाली तर? उलटसुलट विचारांनी तो अस्वस्थ होत होता. केतकीच्या दृष्टीने तिचं म्हणणं बरोबरही असेल… आणि मीच नाही का तिला प्रोत्साहन देत आलो. मग आत्ताच मी असा विरोध का करतोय? तिचं करिअर महत्त्वाचं आहेच; पण संसारातले काही आनंद त्याच वेळेस घ्यायला हवेत. तेही तितकंच महत्त्वाचं असतं, हे कसं तिच्या लक्षात येत नाहीये?
  अखेर सुजयच्या प्रेमाच्या हट्टापायी केतकी डॉक्टरांकडे जाण्यास तयार झाली. काही चाचण्या झाल्या. डॉक्टरांनी सांगितलेलं सत्य पचवणं हा खूप मोठा मानसिक धक्का होता. केतकीचं गर्भाशय खूप नाजूक होतं. मातृत्वाचा भार सहन करणं, किंबहुना गर्भ टिकवणं फार कठीण होतं. वडीलधार्‍यांसाठीही हा धक्काच होता; पण सुजयच्या आई खूप समंजस होत्या. त्यांनीच सुजयला दुसरा मार्ग पत्करण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या सल्ल्याने सरोगसीचा पर्याय होता; पण त्यातही दुर्दैव आड आलं. केतकीचं बीज आणि सुजयचे शुक्राणू यांतून फलधारणा होत नव्हती. अखेर सुजयचे शुक्राणू आणि डोनर स्त्रीचे बीज यामधून फलधारणेचा मार्ग उपलब्ध होता. सुजय आणि केतकी दोघांनीही आठ दिवस-रात्र तळमळून काढले; पण अखेर तो मार्ग स्वीकारण्याचं ठरवलं. डोनरची व्यवस्था झाली. डॉक्टरांच्या मदतीने सारं व्यवस्थित पार पडलं. सुजय आणि केतकीने सुटकेचा निःश्‍वास टाकला. आपल्या दोघांच्या रक्ताचं नव्हे; पण किमान ते बाळ सुजयचं असणार होतं.
  दिवस सरत होते आणि अचानक केतकीला अमेरिकेला जाण्याची संधी चालून आली. केतकी खूप आनंदली. सुजयलाही आनंद झाला; पण तरी त्याने थोडा विरोध केला. त्यांचं बाळ सरोगेट मदरच्या पोटात वाढत होतं. त्याची काळजी घेणं आवश्यक होतं. मात्र आता केतकी आपल्या प्रोजेक्टच्या तयारीला लागली होती. या वेळी माघार घेण्याची तिची मुळीच तयारी नव्हती. सुजयने मग फार ताणून धरलं नाही. तिचं तिथे प्रोजेक्टचं काम जोरात सुरू झालं. अधून मधून तिचे फोन येत होते. आपल्या प्रोजेक्टबद्दल, प्रोफेसरांबद्दल वगैरे ती बोलत होती. आश्‍चर्य म्हणजे, बाळाबद्दल एक-दोन वेळा तिने चौकशी केली खरी; पण सुजयला जाणवलं की त्याबद्दल ती फारशी उत्सुक नव्हती. कित्येकदा त्याला वाटत असे, जाण्यापूर्वी आपण जे पाऊल उचललं, जो निर्णय घेतला, त्यासाठी ती अनिच्छेने तयार झाली होती? तसं असलं, तरी तो तिचं मन समजू शकत होता. पण शेवटी ते त्यांचं मूल होतंच ना? आपलं एकमेकांवर इतकं प्रेम असताना केतकी समजून घेईल, याची खात्री त्याला वाटत होती. तो स्वतः जातीने आपल्या बाळाची काळजी घेत होता.

 • …आणि मग एके दिवशी बाळ जन्माला आलं. सुदृढ, गुटगुटीत मुलगा. काळेभोर जावळ असलेला. दोन्हीकडच्या आजी-आजोबांच्या आनंदाला उधाण आलं होतं. त्यांच्या कौतुकात बाळ न्हाऊन निघत होता. आज बाळ तीन महिन्यांचं झालं होतं आणि केतकी आली होती. पंधरा दिवसांपूर्वी तिचा तसा फोन
  आला होता.
  विमानतळावर केतकीच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या सुजयच्या मनात आलं, केतकीची प्रतिक्रिया कशी असेल? हे बाळ माझ्या रक्ताचं आहे; पण तिचं काय? तिच्या संमतीनेच तर झालं होतं सगळं! तरीही… आमचं दोघांचं बाळ असावं, ही तिची इच्छा अपुरीच राहिली ना अखेर! प्रत्येक स्त्रीच्या मनात ही आस तर असतेच.
  बंगल्याच्या दारात कारमधून उतरल्यावर त्यांच्या स्वागताला तिचे आईबाबा, सुजयची आई, बहीण सारे समोर आले. केतकी वडीलधार्‍यांच्या पाया पडली. आत्तापर्यंत अखंड बडबड करणारी केतकी काहीशी अबोल झाली होती. तिची नजर काहीतरी शोधत होती. तिचे डोळे कोणासाठी तरी भिरभिरत होते. सुजयच्या आईने बाळाला आणून तिच्या हातात दिलं आणि भान हरपून केतकी त्याच्याकडे एकटक बघत राहिली. तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. बाळाचं गोजिरं रूपडं पाहून तिला सार्‍या-सार्‍याचा विसर पडला. अमेरिका… प्रोजेक्ट… सारं या आनंदात वाहून गेलं होतं.