एक झुंज… स्वत:शीच (Short Story : Ek Zunj ...

एक झुंज… स्वत:शीच (Short Story : Ek Zunj Swatashich)

लग्नानंतर पूजा, देवदर्शन, हनिमून सर्व सोपस्कार झाले आणि आता त्यांचं रुटीन लाइफ सुरू झालं. बघता-बघता सहा महिने निघून गेले आणि हळूहळू चित्र बदलू लागलं. रोजच्या धावपळीच्या जीवनात नवीन लग्नाचे नऊ दिवस पाहता-पाहता जुने झाले.

जीवन प्रवासात एका नवीन जोडप्याने नुकतंच पदार्पण केलं होतं. मध्यम वर्गीय कुटुंबातली प्रिया दिसायला सुरेख होती. बँकेत ऑफिसर होती. अनिशच्या घरची परिस्थितीही तशी बेताचीच होती. तो देखणा आणि हुशार होता. एका नावाजलेल्या खासगी कंपनीत मॅनेजर होता. एकूण दोघंही शिकलेले, कमावते आणि स्मार्ट होते. काहीच महिन्यांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं. ते अरेंज मॅरेज होतं. सुरुवातीचे दिवस एकमेकांच्या प्रेमात, हिंडण्यात-फिरण्यात आणि भविष्याची स्वप्नं रंगवण्यात भुर्रकन उडून गेले. मुंबईसारख्या ठिकाणी त्यांचा स्वतःच्या मालकीचा सुखसोयींनी परिपूर्ण असा फ्लॅट होता. त्यांचा हा खेळीमेळीचा संसार पाहून दोन्हीकडची मंडळीही आनंदात होती.
लग्नानंतर पूजा, देवदर्शन, हनिमून सर्व सोपस्कार झाले आणि आता त्यांचं रुटीन लाइफ सुरू झालं. सकाळी दोघांना ऑफिसला जाण्याची घाई असायची. लाडीगोडीच्या वातावरणात, एकमेकांच्या लहानसहान चुका नजरेआड व्हायच्या. गमतीजमतीत आपापलं काम आटपून प्रेमाने निरोप घेत दोघंही कामावर जाण्यासाठी निघायचे. दिवसभरात अधूनमधून फोनवर एकमेकांची विचारपूस करायचे. ‘मिस यू’सारखे रोमँटिक मॅसेजेस पाठवायचे. वीकएंडला कधी बाहेर फिरण्याचा, तर कधी सिनेमाचा प्लॅन ठरायचा. दिवस कसे छान जात होते. बघता-बघता सहा महिने निघून गेले.
हळूहळू चित्र बदलू लागलं. रोजच्या धावपळीच्या जीवनात नवीन लग्नाचे नऊ दिवस पाहता-पाहता जुने झाले. मोकळा वेळ कमी होत गेला. हल्ली लहानसहान कारणामुळे प्रिया आणि अनिशमध्ये खटके उडू लागले. दोघांना एकमेकांचे दुर्गुण दिसू लागले.


असंच एके दिवशी अनिशने अंघोळीनंतर ओला टॉवेल त्याच्या रोजच्या सवयीप्रमाणे पलंगावर फेकला आणि तो, तिथे घडी करून ठेवलेल्या प्रियाच्या नवीन ड्रेसवर जाऊन पडला. झालं! प्रियाने बघताबघता जोरजोरात आरडाओरडा सुरू केला, “अनिश, हे काय आहे? मी नोकर आहे का तुझी? तुझ्यासोबत अजून अ‍ॅडजस्ट करणं इम्पॉसिबल आहे.
चेंज युवर हॅबिट्स.” रागाच्या भरात तिच्या तोंडाचा पट्टा सुरूच राहिला. तिची बडबड ऐकून अनिशलाही राहवलं नाही. तोही चिडून म्हणाला, “जरा स्वतःच्या सवयींकडे बघ. घरातल्या किती तरी जबाबदार्‍या मीच पार पडतो. मागच्या दोन महिन्यांपासून तू फोनचं बिलही भरलं नाहीस. मी काही तक्रार केली का कधी? आणि हो, ऑफिसला जाताना कधी लाइट-पंखे बंद करण्याची तसदी घेतेस का तू?”
“थँक्स, अ लॉट. साधं ऑनलाइन एक बिल काय भरलंस, त्याचा केवढा गाजावाजा करतोस. घरातून शेवटी तूच निघतो ना. तर सगळं चेक करणं तुझं काम नाही का?”
तावात बडबड करत प्रिया त्या दिवशी काही न खाताच निघून गेली. अनिशही जरा वेळाने
उपाशी पोटीच ऑफिसला गेला. दिवसभर दोघांनी एकमेकाला ना फोन केला, ना मॅसेज. त्यांच्यातील संवादाला पूर्ण विराम लागला. कुणीही माघार घ्यायला तयार नव्हतं. ऑफिसमधून घरी परतल्यावरही घरात एक विचित्र शांतता पसरली होती. कुठल्याही प्रकारच्या संवादाला कुणीही पुढाकार घेत नव्हतं. हे आता जवळपास रोजचंच झालं. वादळ उठायला कधी आदल्या दिवशीचा कुठे
तरी सापडलेला कॉफीचा मग, तर कधी बाथरूममध्ये साचलेलं पाणी निमित्त ठरायचं. वादावादी आणि भांडणं झाल्याशिवाय एकही दिवस जात नव्हता. मंथ एंडिंग असल्यामुळे हल्ली प्रियाला ऑफिसमधून यायला उशीर होत होता. तरीही दिवसभरात ती अनिशला एकही फोन करत नव्हती आणि तोही आपल्या जागी अडून बसला होता. नकळत त्यांच्या नात्यात एक दरी निर्माण होऊ लागली.
महिन्याची पाच तारीख आली होती. प्रियाच्या ऑफिसमध्येही पेन्शनसाठी बरेच पेन्शनर्स आले होते.
त्यात नेमाने येणारं जोशी आजी-आजोबा, हे जोडपं संपूर्ण बँकेत कुतूहलाचा विषय होतं. दोघंही सत्तरीच्या घरात होते; पण ते कधीच एकमेकांशिवाय येत नव्हते. आजोबा नेहमी कडक इस्त्रीचा शर्ट-पँट घालून, काळ्या फ्रेमचा चश्मा लावून यायचे, तर आजी कॉटनची साडी, केसात खोचलेलं एखादं फूल, डोळ्यांवर चढवलेला सोनेरी फ्रेमचा चश्मा. त्यांच्या बॅगेत पाण्याची बाटली, खाण्याकरिता काही तरी, नेहमीची औषधं असायची. दोघांच्या चेहर्‍यावर एक स्मित हास्य असायचं. ते या बँकेचे जुने ग्राहक होते. सगळ्यांची विचारपूस करत-करत काउंटरवर येणं हा त्यांचा नियम होता. आजही काउंटरवर आल्यावर आजोबांनी आपला फॉर्म भरला आणि रिकामा फॉर्म भरायला आजीच्या हातात दिला.
“हे घे, आज तरी भरून दाखव. नेहमी मीच भरायचा का?” आजोबा आजीला दटावत म्हणाले. पण आजींनी आजही फॉर्म रिकामाच परत केला.
“काय हे? एक साधा फॉर्म भरता येत नाही तुला?” आजोबा चिडून बोलले.
“अहो, तुम्ही आहे ना, मग मला कसली काळजी?” आजीनं गोड हसून उत्तर दिलं.
हे त्या दोघांचे नेहमी होणारे संवाद, बँकेच्या स्टाफला पाठ झाले होते. प्रियाही
हे मागच्या तीन वर्षांपासून बघत होती.
“अगदी वेंधळी आहेस तू. इथेच थांब, मी येतो मॅनेजरला भेटून,” म्हणत आजीच्या हातातून फॉर्म घेऊन त्यांनी भरला आणि ते आत गेले. आज काउंटरवर प्रियाची
ड्युटी होती. फावला वेळ बघता तिनं आजींना म्हटलं, “अहो आजी, तुम्ही का नाही शिकून घेत फॉर्म भरायला. हवं तर मी शिकवते. का बरं एवढं बोलणं ऐकून घेता?” प्रिया समजूत घालत बोलली.
“अगं! तसं काहीच नाही. मला येतो फॉर्म भरायला; पण या वयात आपण कुणासाठी काही करू शकतो, या भावनेने माणसाचा अहंकार सुखावतो. मी आजवर त्यांच्यावरच अवलंबून आहे, या जबाबदारीपोटी ते स्वत:ची फार काळजी घेतात. मला तेच तर हवं आहे, त्यामुळे मी मुद्दामच काही कामं करत नाही.”
आजी हसत पुढे म्हणाल्या, “अगं! संसार हा दोन चाकांवर चालतो. कधी-कधी एखादं चाक जरा अडलं, तर गाडी ओढायची जबाबदारी दुसर्‍यावर येते. दोघांना एकमेकांची गरज असते. कुणी लहान-मोठं नसतं.” तेवढ्यात आजोबा केबिनमधून बाहेर आले आणि मुख्य दाराकडे वळले. आजीही त्यांच्या पाठोपाठ गेल्या. दारापाशी पोहोचल्यावर आजोबा म्हणाले, “मी रिक्षा घेऊन येतो,
तू आतच थांब.” उन्हाच्या त्रासापासून वाचवायला आजीही त्यांना छत्री द्यायला विसरल्या नाहीत.
जीवनाच्या या टप्प्यावरही दोघांचं एकमेकांवरचं प्रेम बघून प्रिया आपल्या मैत्रिणीला म्हणाली, “हाऊ रोमँटिक कपल?”
तिची मैत्रीण म्हणाली, “अगं, आजींना उन्हाचा त्रास होऊ नये, म्हणून आजोबा नेहमी लिंबू सरबताची बाटली जवळ ठेवतात. खरंच! नशीब लागतं बाबा, असे पार्टनर मिळायला.” हसत हसत दोघीही कामात गुंतल्या. लंच ब्रेकमध्ये प्रियाला सकाळचा आजी-आजोबांमधला गोड आणि प्रेमळ संवाद आठवला. तिचं मन सुखावलं. तिला अनिशची आठवण आली. आपला नवराही आपली काळजी घेतो. आपण कुठे तरी चुकतो आहोत का, असं तिला राहून-राहून वाटत होतं. तिनं लगेच अनिशला फोन लावला आणि विचारपूस करत म्हणाली, “अरे, काही खाल्लंस का तू? काम बाजूला ठेवून आधी काहीतरी खा.”
“हो, तूही हल्ली सकाळी लवकर घरातून निघतेस. ब्रेकफास्टही घेत नाहीस. हे काही ठीक नाही.” प्रियाला अनिशच्या बोलण्यातून आपल्याबद्दलची काळजी जाणवली. आज बर्‍याच दिवसांनी त्यांच्यात थोडाफार संवाद झाला.
अनिश ऑफिसमधून लवकर घरी आला की, दोघांसाठी कॉफी करून ठेवायचा. प्रियाही घरून निघताना त्याचा लंच बॉक्स पॅक करणं कधी विसरत नव्हती. मनातल्या मनात दोघंही एकमेकांकरिता हळवे होते. या न त्या कारणामुळे त्यांच्यामध्ये थोडं फार बोलणंही होई आणि कधी न कधी एखाद्या क्षुल्लक गोष्टीवरून काही तरी बिनसेही. मग पुन्हा अबोला निर्माण होई.
आज महिन्याचा मधला आठवडा होता. जोशी आजोबा बँकेत एकटेच आलेले पाहून प्रियाला आश्‍चर्य वाटलं. आज पेन्शनचा दिवसही नव्हता. असेल काही दुसरं काम, या विचाराने ती काम करू लागली. थोड्या वेळाने मॅनेजर सरांनी तिला केबिनमध्ये बोलावलं.
“प्रिया मॅडम, जोशी आजोबांचं काही पर्सनल काम
आहे. तुम्ही ही केस बघा, कारण माझी एक मिंटिंग आहे,” मॅनेजर म्हणाले.
“ओके सर,” म्हणत प्रिया जोशी आजोबांना आपल्या काउंटरवर घेऊन आली.
“बोला, काय मदत करू तुमची?” प्रियानं विचारलं.
“माझ्या पत्नीचं अकाऊंट आणि काही एफडी आहेत, त्या क्लोज करायच्या आहेत.”
“का? काय झालं?”


“ती मागच्या आठवड्यात ब्रेन हेमरेजनं गेली.”
प्रियाला ऐकून धक्काच बसला. कसंबसं तिनं सॉरी म्हटलं आणि सगळ्या फॉरमॅलिटीज पूर्ण करायला त्यांना मदत केली. फॉर्म भरत-भरत आजोबा स्वत:शीच पुटपुटले, “आता पुढचं काय? त्यातून मी वेंधळा. तू होतीस, तर नेहमी पाठीशी ठामपणे उभी होतीस. कुणी उरलं नाही विचारपूस करणारं. तू गेल्यावर समजलं, प्रेम कशाला म्हणतात. आता हा शेवटचा जीवन प्रवास एकट्यानं करणं फार कठीण आहे.”
प्रियाच्या कानावर त्यांचं बोलणं स्पष्टपणे पडत होतं. तिचे डोळे भरून आले. आजोबांचं काम झाल्यावर ते निघून गेले. आज त्यांना छत्री देणारे हात नव्हते. हे सगळं प्रियाच्या मनाला कुठं तरी बोचत होतं. त्यानंतर मात्र तिचं मन कामात लागत नव्हतं. हाफ डेची रजा टाकून ती घरी परतली.
घरी आल्यावरही जोशी आजोबांचा कावराबावरा चेहरा तिच्या डोळ्यांपुढे सारखा येत होता. त्यांच्या मनाची वेदना जणू काही आपलीच आहे, असं तिला वाटू लागलं. मनातले विचार तिला स्वस्थ बसू देत नव्हते. माणूस आपल्या अहंकारापुढे कुणाची किंमत करत नाही; पण मृत्यू हे शाश्‍वत सत्य आहे, हेच विसरतो. आपण दिवस मोजण्यासाठी जन्माला आलोय की, आयुष्य आनंदाने आणि सुखासमाधानाने जगण्यासाठी? मी अनिशसोबतची तात्त्विक भांडणं संपवण्याऐवजी राग मनात धरून बसले, हा माझा निव्वळ अहंकार नसून, अजून काय असू शकतं? खरंच त्याच्याविना पदरी आलेलं हे एकटेपण किती टोचतं आहे.
तिच्या मनाची घालमेल चालूच होती. विचारांच्या तंद्रीतच तिचा डोळा लागला. जाग आली ती दरवाजा उघडण्याच्या आवाजाने. अनिश ऑफिसमधून परत आला होता. तिला घरी बघताच त्याने विचारलं, “का गं, आज लवकर कशी काय? बरं नाही वाटत का तुला?”
प्रिया त्याचा हात धरत सोफ्यावर बसवत म्हणाली,
“मला माफ कर. मला तू माझ्या आयुष्यात हवा आहे.
कायम. तू माझा सपोर्ट सिस्टम आहेस.” तिच्या डोळ्यांत तरंगलेल्या प्रेमाची झळक त्याला दिसली.
“मलाही माफ कर. प्रिया, तूच आहेस जी मला आणि माझ्या मूडला सांभाळू शकतेस. मी माझ्यामध्ये नक्की बदल आणायचा प्रयत्न करेन. जरा वेळ दे, बस्स. या पुढे मी माझ्या परीने सर्व काळजी घेईन, प्रॉमिस. पण तू या ना त्या कारणाने अशी उपाशी राहत जाऊ नकोस. माझासुद्धा उपास घडतो आणि तो मला परवडत नाही, बरं का?” अनिश प्रेमाने तिची चेष्टा करत म्हणाला.
“नाही आता असं कधीच घडणार नाही. समजावण्यापेक्षा समजून घेण्यात खरा मनाचा मोठेपणा असतो, हे तत्त्व मला कळलं आहे. चूक झाली की, साथ सोडणारे बरेच असतात; पण ती चूक कशी सुधारायची हे सांगणारं कुणी जवळचंच असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी तरी अशी वेळ नक्की
येते, जिथे कोणाच्या सल्ल्याची नव्हे तर सोबतीची गरज असते. माझी ती गरज तुझ्यावर येऊन संपते.” प्रिया मनमोकळेपणाने बोलत होती.


“अगदी खरं आहे. स्वत:ची चूक कधीच सापडत नाही, इतर सगळं सापडतं,” अनिशच्या वाणीतही क्षमा भाव होता.
प्रिया आणि अनिशला जगण्याचा खरा अर्थ कळला होता. आकर्षणाच्या नियमानुसार, चुंबकाचे विपरीत ध्रुवच एकमेकांकडे आकर्षित होतात. हाच नियम विपरीत स्वभाव आणि आवडीनिवडी असलेल्या दोन व्यक्तींवरही लागू होतो आणि ते नकळत बांधले जातात. प्रिया आणि अनिशचंही असंच होतं. त्यांना आपली चूक उमजली होती. लग्न ही पायात अडकवलेली साखळी नसून, एक मजबूत मात्र रेशमी बंध आहे, ज्याची वीण परस्पर प्रेम, विश्‍वास आणि सामंजस्याच्या नाजूक दोर्‍याने विणायला हवी, तेव्हाच जीवनाला एक भक्कम आधार मिळतो. नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे. जगण्याची एक नवी उमेद घेऊन… आपल्या नात्यावर अतूट विश्‍वास ठेवून… आणखी एका जोडप्याने आपलं भावी आयुष्य समाधानी-आनंदी करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं.

  • प्राजक्ता देशपांडे