ईदं न मम (Short Story: Edam Na Mam)

ईदं न मम (Short Story: Edam Na Mam)

ईदं न मम म्हणजे ‘हे माझं नाहीच.’ मनुष्य जन्म लाभला हेच केवळ भाग्य. हा जन्म सोडून बाकी आपलं काहीच नाही. माझं माझं करून संचय करू नये. पक्ष्यासारखे चोचीत दोन दाणे टिपावे नि समाधानी राहावे.

 • ज्वाळांनी वेग घेतला आणि चिता पूर्णपणे ज्वाळांच्या स्वाधीन झाली. शांतपणे पहुडलेलं ‘ते’ देवानं दिलेलं मानवी शरीर समर्पित करत दिसेनासं झालं. आत्म्याचा पक्षी तर केव्हाच उडून पुन्हा ईश्वर चरणी रुजू झाला असेल. तसाही आयुष्यभर तो देवाच्याच चिंतनात होता. इतका की…स्वत:च देव वाटावा. आमच्या सारख्या कृपाभिलाषिंसाठी तो देवच होता. गंजलेल्या लोखंडाचं परीसस्पर्शानं सोनं व्हावं तशी अनेक आयुष्यं त्यांच्या सहवासानं कृतार्थ झाली. काळाच्या ओघात आता अंधुक झाला असेल पण ज्वाळांच्या धुरात अधिक स्पष्ट होत गेला तो भूतकाळ …
 • ‘ते’… म्हणजे आमचे आपटे सर. माझ्यासारख्या कितीतरी जणांच्या आयुष्याचे शिल्पकार. ओल्या मातीचा गोळा हातात द्यावा तशी सरांच्या वर्गात माझी भरती झाली. सरांचा एक दरारा होता विद्यालयात. हातातल्या छडीचा मोजकाच पण वापर करणारे….आपटे सर. श्रीयुत व्यंकटेश पुरुषोत्तम आपटे.
 • “नमस्कार सर. लेकीचं शाळेत नाव टाकायचं होतं, चौथीत. तुम्ही तर आयुष्य घडवता सर. तुमच्या हातात विद्यार्थी सोपवला की काळजी नाही.” बाबा विनंतीच्या सुरात म्हणाले.
 • “ठीक आहे.” एवढंच म्हणाले सर, पण बाबांच्या खांद्यावर आश्वासक दिलासा द्यायला विसरले नाहीत.
 • आमचं कुटुंबं तसं साधंच. बाबांचा छोटा व्यवसाय. हातावर पोट, त्यामुळे तोंडावर बोट होतं नियतीचं. बाबा फक्त कष्ट करायचे. समजायला लागल्यापासून आम्ही कष्ट करतानाच पाहिलं आहे त्यांना नेहमी. कधी कुठल्या समारंभात हास्य विनोद करत गप्पा मारताना, कधी मनसोक्त जेवणाचा आस्वाद घेताना, कधी आराम करताना, एवढंच काय कधी शांतपणे ते झोपलेलेही पाहिल्याचं आठवत नाही. इतर लोकांसारखं आयुष्य त्यांच्या नशिबी नव्हतंच. त्यांच्याकडे पाहिलं की वाटायचं, आमच्या फाटक्या नशिबाची भोकं त्यांच्या सदर्‍याला पडली आहेत. त्या दोन जोडी सदर्‍याला भोकं असली तरी अंगी ओतप्रोत सज्जनपणा भरला होता. संत प्रवृत्तीचे बाबा आमच्या भविष्याची मोठी स्वप्नं डोळ्यांत बाळगून होते. शिक्षणाच्या ध्येयानं त्यांनी मला आपटे सरांकडे सोपवलं.
 • आणि त्या दिवसापासून सरांच्या शिकवणीत तयार होत आयुष्य आकार घेऊ लागलं. अज्ञानाची फोलपटं बाजूला होत गेली. ज्ञानाच्या प्रकाशकिरणांनी समज-उमज यांचे कोपरे उजळू लागले. सरांचे एवढे थोर उपकार झाले की उच्चभ्रू वर्गातील पालकांकडून फी आकारणार्‍या सरांनी माझ्या बाबांकडून मात्र एक पैसाही फी घेतली नाही. नि:शब्द होऊन गेले बाबा. देव आता वेगळ्या कोणत्या रूपात असेल पृथ्वीवर? असा प्रश्‍न पडला. आपटे सरांचा असा प्रत्यय घेणारे अनेकजण आहेत. आज ते अनेक जण प्रथितयश नागरिक होऊन समाजात याच चांगुलपणाचा वारसा पुढे नेत आहेत.
 • अशा असामान्य व्यक्ती ज्यांच्यात “मोहमाया व्यापे नही जेणे…”चापोत आढळतो, परोपकार ज्यांच्या अंगी रक्तासारखा भिनलेला असतो. या व्यक्ती देवाच्या आणि दैवाच्या सत्त्व-परीक्षेला कायमच बसलेल्या असतात की काय जणू? वैयक्तिक आयुष्यात आपटे सर अशाच ‘चौकटीत’ होते. सेवाव्रती शिक्षकाच्या पेशातले. ‘कफल्लक’ मण्यांची माळ त्यांनी स्वत: गळ्यात घालून घेतलेली होतीच. शिवाय सेवाव्रती, निर्मोही वृत्ती. प्रसंगी पदरमोड करून समोरच्याला मदत करण्याची सवय. ‘ईदंं न मम’ ला सार्थ मानणारे आमचे आपटे सर.
 • ‘ईदं न मम’ म्हणजे काय ठाऊक आहे का?… मृदू स्वरात सर सांगायचे, “ईदं न मम म्हणजे ‘हे माझं नाहीच.’ मनुष्य जन्म लाभला हेच केवळ भाग्य. हा जन्म सोडून बाकी आपलं काहीच नाही. माझं माझं करून संचय करू नये. पक्ष्यासारखं चोचीत दोन दाणे टिपावे, समाधानी राहावे. ज्या संपत्तीची साठवण करत ऐहिक सुखाच्या, वस्तूच्या मागे आपण धावतो ते आपलं नाहीच. आपलं असतं ते फक्त सत्कर्म. सरांचे विचार कुणाला तंतोतंत पटायचे तर कुणाला अव्यवहारीपणा वाटायचा. ते स्वत: मात्र प्रत्यक्षात या तत्त्वांच्या विस्तवावर चालतच होते. जीवनाच्या या वाटचालीत सुदैवानं त्यांच्या पत्नीची त्यांना सावलीसारखी साथ होती. सरांना दोन मुलं. शिरीष आणि विनायक. पैकी शिरीष वेगळ्या विचारांचा आणि विनायक कोणतेच विचार मेंदू करू शकत नाही असा मंद गतीचा. नियतीनं इथंच त्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं होतं असं वाटतं. त्यांची संत प्रवृत्ती, ईश्वरावरचा ठाम विश्वास आणि त्यांची सहनशक्ती या सर्वाचा कस लावून या माता-पित्याची नियतीनं पारख चालवली होती. विनायकच्या संगोपनात नियतीला त्यांची पारख होत होती तर त्यांना ईश्वराचं दर्शन घडत होतं. इथेही सरांनी कधी ना नशिबाला दोष दिला, ना कधी चिडचिड करून त्या निष्पाप जिवाचे हाल केले. या उलट असे जीव म्हणजे ईश्वराचं रूप. कारण अशा जीवांना राग, लोभ, मत्सर, तिरस्कार अशा या जगातील विषारी अवगुणांचा स्पर्शही नसतो, गंधही नसतो. अशी त्यांची ठाम मतं होती. त्यामुळे सरांच्या स्वत:च्या आचरणातूनच या गोष्टी दिसायच्या. आम्हाला दिसायचं ते वास्तव जग. सरांना मात्र परमार्थाच्या पलीकडचं दिसत असावं. शिरीषला वाटायचं, सरांनी त्यांचा शिकवण्याचा हातखंडा, त्या योगे मिळणारी मान-प्रतिष्ठा, या सगळ्याचा आर्थिक विचार करावा. मान आणि धन मिळतंय तोवर कमवून घ्यावं. आणि सरांना-बाईंना वाटायचं ज्ञान हे दानाचं कार्य आहे. गरजेपुरतं स्वीकारून उर्वरित पुण्यकर्म; समजून करावं. शिक्षणाचा बाजार निदान आपल्याकडून तरी होऊ नये. शिरीषला वाटायचं, विनायकची जबाबदारी हा मोठा प्रश्‍न कसा सुटावा, याकडे सरांनी अधिक लक्ष द्यावं. त्याचं त्या कुटुंबात असणं हा एक शाप आहे, जो पैशाच्या बळावर थोडा सुसह्य होईल. परंतु सरांचे विचार वेगळे होते. त्यांच्या मते असे जीव म्हणजे ईश्वराचा अवतार. अशा जिवाचा सांभाळ म्हणजे देवाचे सान्निध्य याच मतांतरांच्या पायावर उभे राहिले ते बाप आणि मुलगा यांच्यातले वाद.
 • पिढीतलं अंतर होतंच. वैयक्तिक विचारांमुळे ते अजूनच फाकलं. शिरीष सी.ए. झाला. जात्याच हुशार असलेला शिरीष सरांच्या हातची जडणघडण होता. बाईंचे प्रेम आणि संस्कार लाभलेला. त्या उभयतांची उत्तम प्रतिमा होता. जणू आपटे सरांचं आरशातलंच रूप, पण तेवढं सात्त्विक आणि निर्मोही नसलेलं.तसं असण्याची शक्यताही नव्हती. कारण शिरीषच्या पिढीला व्यवहारीकतेची कोंदणं होती. अटळपणे त्याच्या पिढीचे सर्वजण, अगदी आम्हीही व्यावहारिकता पाहत, अनुभवतच वाढलो. अशा सामाजिक व्यवस्थेत आम्हाला आमचं प्रॅक्टीकल राहणं म्हणजे काळाबरोबर चालणं वाटतं. अशा प्रवाहात वाहत राहावं लागतं. शिरीषनं वेगळं काहीच केलं नाही. तो त्या प्रवाहात वाहत राहिला. त्यात वाहताना त्याच्यात आणि कुटुंबात अंतर पडत गेलं हे नक्की. प्रत्यक्षात तो, सर, बाई आणि विनायक एकत्र राहत असले तरी मनानं शिरीष मात्र दूर होता. विनायकची जबाबदारी कधी आलीच शिरावर तर तो विशेष आश्रमात त्याची बडदास्त लावून सर्वांची सोय पाहणार होता. त्यात त्याला तरी काही गैर वाटत नव्हतं.
 • सरांच्या तत्त्वांना हेच पटणार नव्हतं. अहो, जिथे गरीब मजूर – कामगारांच्या उघड्या-नागड्या पोरांना प्रसंगी अन्न-वस्त्र देऊन शिक्षणासाठी स्वत:कडे ठेवून घेणारे, मध्यमवर्गीय पालकांना फीची काही काळजी नको, जमतील तेव्हा द्या असं सांगून त्यांच्याही मुलांच्या शिक्षणात खंड पडणार नाही हे पाहणारे आणि उच्चभ्रू स्तरातील पालकांना इतरांना मदत करण्याचं प्रेमाचं आव्हान करणारे आपटे सर त्यांच्या केवळ याच हातोटी मुळे सर्व स्तरांत लोकप्रिय होते. तेच सर स्वत:च्या पोटच्या गोळ्याला आपल्या छातीपासून दूर ठेवून त्याची कशी सोय करतील? अशी मुले मुखात अन्न भरवून नाही तर स्पर्शाची भाषा बोलून सांभाळावी लागतात, असं त्यांचं मत होतं.
 • असे वाद विकोपाला गेले की सरांची शांत-प्रवृत्तीची जुनी पिढी माघार घेऊनही जिंकल्याचं समाधान मानत असे. कारण तिथे त्यांचा मुलगा खूश असायचा आणि आमची नवी पिढी सगळंच जिंकलेली असायची. कारण जुन्या पिढीचं व्यवहारशून्यपण त्यांनी हाणून पाडलेलं असायचं.
 • वरचेवर असे वाद होत गेले. शिरीषनं स्वत:चं लग्न ठरवणं, त्यानंतर थोडीच वर्षं घरात राहणं, मुलगा -सून प्रगती करत असतानाच जुन्या पिढीचा किती हा कमकुवतपणा? यावरचे अभ्यासक विचार ऐकणं आणि शेवटी चारच वर्षात परदेशी जाणं हे सर्वच सरांनी खूप संयमानं आणि सहजपणे पाहिलं… पचवलं किंवा तसं दाखवलं असेल. त्या उभयतांची परवानगी कुणाला नकोच होती. प्रश्‍न होता तो आता उतारवयात सारं सहन करू शकण्याचा. जो खांब त्यांनी स्वत:, आपल्या आधारासाठी, आपल्या उंचीचा घडवला. तशीच वेळ आली तर ज्याला घट्ट धरून त्याचा आधार घेणार होते… तोच आता हाताशी नसणार होता. त्या परदेशी अर्थव्यवस्थेचा एक छोटासा खिळा बनून राहणं त्याला मान्य होतं. पण आपल्या छोट्या घरट्याची फांदी होणं ओझं वाटत होतं.
 • टाइमस्टार पुढे कुणाची मात्रा चालत नाही. हिरव्या गवताचा एक दिवस पाला होतो. गोंडस फुलांचं निर्माल्य आणि इच्छा-आकांक्षाचं शल्य होतं. आयुष्यात तत्त्वं मौल्यवान असतात. पण तीच तत्त्वं सत्त्व पणाला लावतात. आपटे सर तत्त्वावर उभे होते. एका उंचीवर पोहोचले होते. पण गात्रं थकली, तेव्हा शरीर आधार शोधू लागलं आणि विनायकच्या भवितव्याचा विचार करून ते तिघेही एका आश्रमात दाखल झाले.आश्रमात उभयतांनी ज्ञान-दानाचं काम करावं, संस्कारवर्ग घ्यावे आणि उर्वरित वेळात विनायकची काळजी घ्यावी. अशी दैनंदिनी सांभाळत दिवस व्यतीत होत होते.
 • कालौघात एक दिवस सावलीनंही साथ सोडली आणि सर मनानंही निराधार झाले. आईच्या जाण्यानं पोर अनाथ व्हावं तसं झालं सरांचं. बाई विनायकची आई तर होत्याच पण सरही आता त्यांचं मूल झाले होते. शरीरात आत्मा, मोत्यात झळाळी, सोन्यात तेज आणि हवेत प्राणवायू कधी दिसतात का? पण तेच नसेल किंवा नाहीसे झालं की ते सारं अर्थहीन वाटतं तसं अस्तित्व होतं बाईंचं सरांच्या जीवनात. त्या गेल्या आणि सर निष्प्रभ झाले. शिरीष आला, यंत्रवत वागला, परदेशातून भारतात येणं किती अवघड झालंय, तिथलं जीवन कसं व्यग्र आहे यावर जरा जास्तच बोलला आणि थोडेफार पैसे फेकून निघूनही गेला.
 • “कुठे चुकलं माझं आणि मालतीचं? माझंच रक्त, माझीच शिकवण, माझीच तत्त्व… हरलो, हरलो आपण मालती.” असंच काहीबाही स्वत:शीच बोलत सर बरसू लागले. गणितातला त्यांचा हातखंडा सर्वदूर प्रसिद्ध होता. तेच सर आयुष्याचं गणित कुठे चुकलं? हे शोधत तास्न तास शून्यात हरवू लागले. शेकडो विद्यार्थ्यांना जगात मानानं उभं करणारे सर आपली कृश देहयष्टी सांभाळताना लटपटू लागले.
 • आयुष्याची 78 वर्षे… त्यातले अनेक अनुभव. ते रम्य बालपण… शिक्षण… त्यावरची निष्ठा… प्रामाणिक प्रयत्न… त्यासाठी खाल्लेल्या खस्ता… आई-वडील… नाती-गोती, लग्न-संसार… सावलीची साथ आणि हाती सावलीचाच हात… मुलंबाळं… माणुसकीवरची श्रद्धा… निष्ठा… जीवनाची तत्त्वं… थकलो आता… डोळे मिटावेसे वाटतायत…
 • वावटळ उठल्यासारखं सभोवती गरगर गोलाकार फिरू लागलं. वर्तुळाकार फिरणार्‍या पाचोळ्यासारखं घोंगावू लागलं.
 • “नको ऐहिकाचा नाथा व्यर्थ बडिवार,” देहाच्या एका कोपर्‍यात रक्ताचा एक कण गात होता. शरीराच्या गाभार्‍यात तो आवाज घुमला. त्या आवाजानंसुद्धा कानठळ्या बसल्यासारखं सरांनी डोकं गच्चं दाबून धरलं आणि त्यांची शुद्ध हरपली.
 • आश्रमवासी धावले. सरांचे अनेक विद्यार्थी, त्यांनी जोडलेली अनेक माणसं धावली. पण ती कोणीही सरांना या गर्तेतून बाहेर काढू शकली नाहीत. आपटे सरांना वेड लागलं.
 • हो, सर थोडे भ्रमिष्ट झालेत खरे… “अहो, कशा- कशाचं भान नसतं हल्ली … डोक्यावर परिणाम झालाय त्यांच्या… त्या येड्या पोराचं करता करता यांचंही असं झालं शेवटी.”
 • एक ना अनेक शेरे. व्यक्ती तशी वक्तव्यं. काही विद्यार्थ्यांनी जबाबदारी घेतली. खूप उपचार केले. पण आतून मोडलेले सर पुन्हा उभे राहिले नाहीत.
 • आणि… एका क्षणी वय, खालावलेली प्रकृती आणि पैलतीरी लागलेले मन, सगळ्याची नियतीनं बेरीज केली आणि तिनं उत्तर दिलं… मृत्यू.
 • सर गेले. आपटे सर गेले. बातमी पसरली. वर्तमानपत्रं… बातम्या… भाषण… आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री. व्यंकटेश आपटे सरांचं निधन. दूरवरून विद्यार्थी आले. शिक्षण संस्थांनी दखल घेतली. धो-धो श्रावण सुद्धा बरसला त्या महात्म्याच्या शेवटच्या आंघोळीला.
 • त्या महान व्यक्तीनं आयुष्यभर कमवलेलं सर्व काही… अगदी राहता वडिलोपार्जित वाडा, जमीन सुद्धा सारं सारं आश्रमाच्या नावे केलं होतं. मिळालेले पुरस्कार, देणग्या, इतर ठेवी आणि संपूर्ण आयुष्य शिक्षणासाठी दान करत, स्वत: मात्र रिक्त हातानं हा साधूचरित पुरुषोत्तम आज वेगळ्या प्रवासाला निघून गेला. एखाद्या मस्त-मौलासारखा. जातानाही म्हणाला असेल –
 • ईदं न मम… ईदं न मम…
 • ईदं न मम…
 • सविता शिंदे