ख्रिसमस निमित्त दुकाने, मॉल्स सजले : शॉपिंगसाठी...

ख्रिसमस निमित्त दुकाने, मॉल्स सजले : शॉपिंगसाठी दाखवली भेटवस्तुंची आमिषे (Shops And Malls Decorated With Spider Man Theme, X Mas Trees, Alongwith Gifting Contests For Christmas)

ख्रिसमसचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होत असल्याचे दृश्य जागोजाग दिसून येत आहे. देशभरातील दुकाने व मॉल्स नाताळाच्या सजावटीने व शॉपिंगवेड्या लोकांनी फुलली आहेत. भेट देणाऱ्या ग्राहकांचे स्वागत मोठमोठ्या, रंगीबेरंगी दिवे लावलेल्या ख्रिसमस ट्रीने व आकर्षक सजावटीने केले जात आहे.

ठाण्याच्या व्हिवियाना मॉलने त्यांच्या प्रांगणात स्पायडर मॅनचा आकर्षक देखावा केला आहे. शिवाय स्पायडर मॅनच्या वेषात एक कलाकार त्याची नक्कल करीत व विविध स्टंट्‌स करीत लोकांना रिझवीत आहे. तर सांताक्लॉज्‌ बच्चेकंपनीला भेटवस्तू देत आहे. याशिवाय शॉप ॲन्ड विन कॉन्टेस्टचे आयोजन करण्यात आले असून तयामध्ये दर रविवारी २ लकी विजेत्यांना ॲपलचे मॅकबुक जिंकण्याची संधी आहे. प्रवेशद्वारी २५ फूट उंचीचा ख्रिसमस ट्री उभारण्यात आला असून त्यामध्ये खऱ्या फुलांच्या कुंड्यांची सजावट करण्यात आली आहे. या नाविन्यपूर्ण सजावटीत रंगीबेरंगी ५०० खरी फुले आहेत. जी मॉलच्या स्वतःच्या गार्डनमधील आहेत.

गोरेगावच्या ओबेरॉय मॉलच्या प्रवेशद्वारी ४० फूट उंचीचा ख्रिसमस ट्री तयार करण्यात आला असून त्याच्या सभोवती सोनेरी खेळणी, रेड विंटर बेरीज्‌ आणि रेनडिअर प्राण्यांची सजावट करण्यात आली आहे. नाताळाच्या निमित्ताने आनंद आणि प्रेमाचे हे प्रतीक असल्याचे सांगण्यात येते. या मॉलमध्येसुद्धा शॉपिंग करणाऱ्यांसाठी स्पर्धा ठेवण्यात आली असून ९ लकी विजेत्यांना स्मार्ट टी.व्ही. व बोस होम थिएटर व इको डॉट-जेन ४ मिळणार आहे. या ऑफर्स जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालतील.