शिवांगी जोशी किडनी संसर्गामुळे झाली रुग्णालयात ...

शिवांगी जोशी किडनी संसर्गामुळे झाली रुग्णालयात भरती, फोटो शेअर करुन चाहत्यांना दिली तब्येतीची माहिती (Shivangi Joshi Hospitalised Due To Kidney Infection)

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या टीव्ही शोमध्ये नायरा आणि सीरतच्या भूमिकेतून अभिनेत्री शिवांगी जोशीने प्रेक्षकांची मने जिंकली. नुकतेच या अभिनेत्रीला किडनीच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पण आता तिची तब्येत ठीक असून अभिनेत्रीने आपल्या चाहत्यांना ती लवकरच परत येईल असे वचन दिले आहे.

‘ये रिश्ता’ नंतर ‘बालिका वधू 2’ आणि ‘खतरों के खिलाडी 12’ आणि बेकाबूमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी शिवांगी जोशी रुग्णालयात आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर फोटो शेअर करून याचा खुलासा केला. अभिनेत्रीने सांगितले की, तिच्या किडनीमध्ये संसर्ग झाला आहे, ज्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता ती ठिक आहे.

शिवांगी जोशीने हॉस्पिटलच्या बेडवरून स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना शिवांगीने कॅप्शन लिहिले – सर्वांना नमस्कार, काही दिवसांपूर्वी माझ्या किडनीमध्ये संसर्ग झाला होता. त्यामुळे मला रुग्णालयात दाखल करावे लागले. मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझे कुटुंब, मित्र, माझे डॉक्टर, रुग्णालयातील कर्मचारी आणि देव यांच्या कृपेने मी आता बरी आहे. मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की आता प्रत्येकाने आपल्या मनाची, शरीराची आणि आत्म्याची काळजी घेतली पाहिजे.  सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सर्वांनी स्वतःला हायड्रेट ठेवा. खूप पाणी प्या. तुम्हा सर्वांवर प्रेम आहे आणि मी लवकरच परतेन.

हॉस्पिटलमधून शेअर केलेल्या फोटोमध्ये शिवांगी बेडवर असल्याचे दिसत आहे. आपल्या चेहऱ्यावर हलके हसू आणून ती अंगठा दाखवत आहे. अभिनेत्रीच्या मांडीवर नारळपाणी ठेवले आहे. शिवांगीने ही पोस्ट शेअर केल्यानंतर, तिचे चाहते आणि इंडस्ट्रीतील सहकारी आणि सेलिब्रिटी अभिनेत्रीला लवकर बरी होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

रुबिना दिलैक, श्वेता तिवारी, धीरज धुपर, स्वाती चिटणीस, चेतना पांडे, आध्विक महाजन, समीर ओंकार यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी तिला गेट वेल सून म्हटले आहे.