शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा यांच्यावर दीड कोटी रु...

शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा यांच्यावर दीड कोटी रुपये फसवणुकीचा आरोप : तक्रार दाखल (Shilpa Shetty-Raj Kundra Accused Of Cheating Of 1.51 Crores, Case Filed Against Them)

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या अडचणी कमी होण्याऐवजी हात धुवून त्यांच्या मागे लागल्या आहेत. एका समस्या दूर होत नाही तोपर्यंत दुसरी समोर येऊन उभी राहते. अलिकडेच काही आठवड्यांपूर्वी राज कुंद्रा जामीनावर तुरुंगातून बाहेर आला आहे आणि आता त्याच्यावर फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात राज कुंद्रासोबत शिल्पा शेट्टी यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला गेला असल्याचे समजते.

एका प्रसिद्ध व्यावसायिकाने शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांच्याविरोधात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करून त्यांच्याकडे दीड कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्या व्यावसायिकाच्या म्हणण्यानुसार, २०१४ मध्ये SFL फिटनेस प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक काशिफ खान, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी त्याला फिटनेस संबंधित एका व्यवसायात १ कोटी ५१ लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगितले होते. ही गुंतवणूक केल्यानंतर काही वर्षांनी याबाबत काहीही सुरळीत न झाल्याने त्या व्यावसायिकाने त्यांच्याकडे पैसे परत करण्याची मागणी केली. मात्र त्यांनी त्या व्यावसायिकाला धमकी दिली, असा आरोप त्याने केला आहे.

दरम्यान या संपूर्ण प्रकरणी शिल्पा शेट्टीने प्रतिक्रिया दिली आहे. तिने नुकतंच ट्वीट करत याबद्दल भाष्य केले आहे. शिल्पा शेट्टीने तिच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने म्हटले आहे की, “मी सकाळी उठल्यावर मला कळले की माझ्या आणि राजविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. हे सर्व ऐकून मला धक्का बसला. SFL फिटनेस ही एक कंपनी असून याचा सर्वेसर्वा हा काशिफ खान आहे. ही संपूर्ण कंपनी तो एकटा चालवत होता. या ब्रँडच्या नावाने देशभरात फिटनेस जिम उघडण्याचे संपूर्ण अधिकार त्याने घेतले होते. तसेच याबाबत सर्व करारांवर तो स्वाक्षरी करायचा. त्याच्याकडे बँकिंग आणि इतर नियमित कामाची जबाबदारही त्याच्यावर होती. त्यामुळे त्याच्या कोणत्याही व्यवहाराची आम्हाला माहिती नाही. तसेच आम्ही त्यांच्याकडून कोणतेही पैसे घेतलेले नाहीत. या सर्व फ्रँचायझी थेट काशिफ खानकडून घेता येतात. ही कंपनी २०१४ मध्ये बंद झाली असून त्याची संपूर्ण जबाबदारी ही काशिफ खान यांनी घेतली होती,” असे तिने सांगितले.

“मी गेल्या २८ वर्षांपासून फार मेहनत घेत आहे. मात्र इतक्या सहज माझे नाव, माझी प्रतिष्ठा खराब होत असल्याचे पाहून मला फार दु:ख होत आहे. मी कायद्याचे पालन करणाऱ्या आणि आदर करणाऱ्या देशाची अभिमानास्पद नागरिक आहे. त्यामुळे मला माझ्या अधिकारांचे संरक्षण केले पाहिजे,” असे तिने यात म्हटलं आहे.

दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी कलम ४०६, ४०९, ४२०, ५०६, ३४, १२०(ब) या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लवकरच मुंबई पोलिसांकडून याप्रकरणी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची चौकशीला बोलवण्याची शक्यता आहे.

काही महिन्यांपूर्वी पॉर्न फिल्म बनवल्याप्रकरणी राज कुंद्रा तुरुंगात गेला होता, नुकताच तो जामिनावर बाहेर आला होता अन्‌ बाहेर आल्यानंतर राज कुंद्रा पहिल्यांदा सार्वजनिक ठिकाणी ९ नोव्हेंबरला दिसला होता. त्याच्यासोबत शिल्पा शेट्टीही दिसली. दोघेही हातात हात घालून मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दोघांचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर काही दिवसांनी राज कुंद्राने सोशल मीडियापासून दूर राहून आपली सर्व खाती निष्क्रिय केली होती. पॉर्न प्रकरणात अडकण्यापूर्वी राज कुंद्रा ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय असायचा. शिल्पा शेट्टीसोबतही तो रोज त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असे. पण आता त्याने सोशल मीडियापासून दूर राहणेच पसंत केले आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम (सर्व फोटो)