पति राज कुंद्राच्या जामीनानंतर शिल्पा शेट्टीची ...
पति राज कुंद्राच्या जामीनानंतर शिल्पा शेट्टीची सोशल मीडियावर भावूक पोस्ट (Shilpa Shetty Gets Emotional After Bail To Husband Raj Kundra, Writes- Beautiful Things After Bad Storm)

पॉर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला मुंबईतील मॅजिस्ट्रेट कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. ५० हजारांच्या जातमुचलक्यावर सोमवारी न्यायालयाने राज कुंद्राला जामीन मंजूर केलाय. राज याला २ महिन्यांनी जामीन मिळाला आहे. १९ जुलैला मुंबई पोलिसांनी राज कुंद्राला अटक केली होती. पतीचा जामीन मंजूर झाल्यानंतर शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

गेले दोन महिने अनेक समस्यांना सामोरं गेल्यानंतर शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक सकारात्मक स्टोरी शेअर करून आपला आनंद व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये शिल्पाने इंद्रधनुष्य असलेला फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर ‘एका मोठ्या वादळानंतरच सुंदर इंद्रधनुष्य दिसते. हे इंद्रधनुष्य वादळानंतरदेखील अनेक चांगल्या गोष्टी होऊ शकतात हे सांगते’ या आशयाची पोस्ट शिल्पाने केली आहे.

अलीकडेच शिल्पा माता वैष्णव देवीच्या दर्शनासाठी जाऊन आली. या दरम्यान, तिचे व्हिडिओ आणि फोटो देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले. तेव्हा आता शिल्पाची श्रद्धा फळाला आली म्हणायची. पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा जुलैपासून अटकेत आहे. पोलिसांच्या चौकशीत राज कुंद्राविरोधात अनेक पुरावे हाती लागल्याने राज कुंद्राच्या न्यायालयिन कोठडीत वाढ होत गेली. पण आता राज कुंद्राला जामीन मिळाला आहे.

राजच्या अटकेनंतर शिल्पाने या प्रकरणी एक पोस्ट शेअर केली होती, ज्यात तिने लिहिले होते की, मी आजपर्यंत काहीही चुकीचे केले नाही आणि मी पुढेही तसे काही करणार नाही. तर कृपया माझ्याबद्दल खोट्या गोष्टी पसरवू नका. एक सेलिब्रिटी म्हणून मी ना तक्रार केली आहे, ना पुढे करणार आहे. माझा मुंबई पोलिसांवर आणि भारताच्या कायद्यावर पूर्ण विश्वास आहे.
राजच्या अटकेनंतर शिल्पाने काही दिवस कामातून ब्रेक घेतला होता. आता ती गीता कपूर आणि अनुराग बसू सोबत ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’च्या शूटिंगवर परत आली आहे. चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ती अलीकडेच ‘हंगामा 2’ चित्रपटात दिसली होती, जो राजला अटक केल्यानंतर काही दिवसांनी प्रदर्शित झाला होता. त्यावेळेस अभिनेत्रीने चाहत्यांना चित्रपट पाहण्याची विनंती केली होती आणि असे म्हटले होते की चित्रपट बनवण्यासाठी बऱ्याच लोकांची मेहनत लागते, तर निश्चितपणे हा चित्रपट पहा. शिल्पा आगामी चित्रपट ‘निकम्मा’ मध्ये दिसणार आहे.