चूक झाल्याची कबुली देणारी पोस्ट शिल्पा शेट्टीने...
चूक झाल्याची कबुली देणारी पोस्ट शिल्पा शेट्टीने शेअर केली. म्हणते, ‘चुका झाल्या असतील, बट इट्स ओके’ (Shilpa Shetty Admits Of Committing Mistake, Writes In Her Post ‘Made a Mistake, But It’s Ok’)


गेल्या काही दिवसांपासून शिल्पा शेट्टीवर एकामागून एक संकटे येत आहेत. पॉर्नोग्राफी प्रकरणात तिचा नवरा राज कुंद्रा याला अटक झाल्यापासून तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगला तोंड द्यावं लागत आहे. लोकांनी तिच्यावर एवढं तोंडसुख घेतलं की, ती सोशल मीडियावर अंतर राखून राहिली. डान्स रिॲलिटी शोमध्ये परतल्यावर शिल्पा आता त्या मंचावर पुन्हा सक्रीय झाली आहे. शिल्पा शेट्टीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आपल्या हातून झालेल्या चुकांची कबुली दिली आहे. ती म्हणते, “लहानसहान चुका केल्याशिवाय आपलं जीवन इंटरेस्टींग होऊ शकत नाही. मात्र या चुका अति गंभीर अथवा धोकादायक नसाव्यात, असा प्रयत्न केला पाहिजे. दुसऱ्यांना त्रास होईल, अशा चुका करू नयेत. बाकी, जीवनात चुका तर होणारच.”

या मजकुरासोबत शिल्पा शेट्टीने एक ॲनिमेटेड स्टीकर जोडला आहे. त्यावर ती लिहिते – “चूका केल्या आहेत. बट इट्स ओके.”

तिने पुढे असंही लिहिलंय – “हातून झालेल्या चुका आपण विसरू बघतो. त्या चुका केल्या म्हणून नव्हे तर त्यातून खूप काही शिकायला मिळालं म्हणून. तेव्हा मी स्वतःला माफ करून टाकीन. अन् त्यातून काही शिकेन.”

शिल्पा शेट्टीने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम स्टोरीवर एका पुस्तकातील उतारा टाकला होता. त्या पुस्तकाचा फोटो टाकून ती म्हणाली होती, “आपण आपल्या जीवनात पॉजचं बटन दाबू शकत नाही. प्रत्येक दिवसाची गणती होते. मग आपण संकटात असो की नसो. आपण जेव्हा तणावाखाली असतो तेव्हा काही गोष्टी वेळेवरच सोडून दिल्या पाहिजेत. जीवन कधी थांबत नाही, ते चालत राहते. आपल्याकडे फक्त एक काळ आहे. बाकी काही नाही. त्यामुळे प्रत्येक क्षण जगावा हेच उत्तम. जेणेकरून आपल्या हातून काळ निसटणार नाही.”