सिद्धार्थ शुक्लानंतर शहनाझ गिल पुन्हा प्रेमात? ...

सिद्धार्थ शुक्लानंतर शहनाझ गिल पुन्हा प्रेमात? (Shehnaaz Gill again fall in love rumours about she is dating raghav juyal )

‘बिग बॉस’मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली शहनाझ गिल सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. बिग बॉसमध्ये असताना आणि त्यानंतर शहनाझचं खासगी आयुष्य आणि सिद्धार्थ शुक्लाशी असलेली तिची मैत्री बरीच गाजली होती. शहनाझ लवकरच सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण यासोबतच पुन्हा एकदा ती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. शहनाझ गिल पुन्हा प्रेमात असल्याचं बोललं जात असून तिचं नाव एका अभिनेत्याशी जोडलं जात आहे.

शहनाझ गिल सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. याच चित्रपटातून प्रसिद्ध डान्सर राघव जुयालदेखील बॉलिवूडमध्ये पाऊल टाकणार आहे. दोघंही सलमानच्या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग आहेत. पण आता काही मीडिया रिपोर्टनुसार शहनाझ आणि राघव यांच्यात मैत्री पलिकडे काही असल्याचं बोललं जात आहे. दोघांमध्ये जवळीक वाढली असून अनेकदा त्यांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहिलं गेलंय.

शहनाझ गिल आणि राघव जुयाल यांना बरेचदा एकत्र स्पॉट केलं गेलं आहे. काही दिवसांपूर्वीच दोघंही एकत्र हृषिकेश ट्रीपसाठी गेले होते. या दोघांच्या अफेअरची सोशल मीडियावर चर्चा असली तरीही या दोघांनी अद्याप या नात्यावर भाष्य केलेलं नाही. दोघंही एकमेकांना पसंत करतात मात्र अफेअरच्या चर्चांवर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा त्यांच्या नात्याची कबुली दिलेली नाही.

दरम्यान शहनाझ गिल याआधी अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबत रिलेशनशिपमध्ये होती. ‘बिग बॉस’ शोमध्येच या दोघांमध्ये जवळीक वाढली होती. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतरही दोघांनी काही अल्बम साँगमध्ये एकत्र काम केलं होतं. या दोघांच्या जोडीला चाहत्यांचीही चांगलीच पसंती मिळाली होती. पण सिद्धार्थ शुक्लाच्या अकाली निधनाने शहनाझसह चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाझ खूप एकटी पडली होती. मात्र काही महिन्यांनंतर तिने स्वतःला सावरलं आणि आता ती आनंदी आयुष्य जगताना दिसतेय.