‘हे राम’ च्या निमित्ताने शरद पोंक्ष...

‘हे राम’ च्या निमित्ताने शरद पोंक्षेने केला होता पहिला विमान प्रवास : त्यासाठी कमल हसनने दिलेले मानधन बघून झाला आश्चर्यचकित (Sharad Ponkshe Travelled By Air For The First Time : Was Stunned To Receive Money Given By Kamal Hassan For The Role In ‘Hey Ram’)

मराठी नाट्य-चित्रपट-टी.व्ही. क्षेत्रातील श्रेष्ठ कलाकार शरद पोंक्षे ‘मी नथुराम गोडसे’ या नाटकातून नावारुपास आले. त्यातील भूमिकेने त्यांना कमल हसन दिग्दर्शित ‘हे राम’ या हिंदी चित्रपटात गोडसेची भूमिका करायला मिळाली. या चित्रपटाचे शूटिंग उटी या थंड हवेच्या ठिकाणी झाले. त्या निमित्ताने त्यांनी पहिल्यांदाच विमान प्रवास केला होता, असे आपल्या ‘मी आणि नथुराम’ या पुस्तकात म्हटले आहे. अन्‌ त्यासाठी घडलेल्या गंमतीजमती दिल्या आहेत.

नथुराम गोडसेच्या भूमिकेसाठी तू किती पैसे घेशील, अशी विचारणा कमल हसनने त्यांना केली होती. तेव्हा तुम्ही काय द्याल ते, असं विनम्रपणे सांगून शरदनी कमलवरच जबाबदारी टाकली होती.

शरद पोंक्षे हे स्वभावाने स्पष्टवक्ते आहेत. शिवाय विनम्र देखील आहेत. याची प्रचिती त्यांच्या या पुस्तकातून येते.  ‘हे राम’ मधील भूमिकेबाबत मिळालेल्या मानधनाचा खुलासा त्यांनी निःसंकोचपणे केलेला आहे. त्याचा अनुभव सांगताना पोंक्षे यांनी लिहिलं आहे – “मी मराठी नाटकात छोटी छोटी कामं करणारा एक नट. मला नाव नाही, प्रतिष्ठा नाही. नाटकाच्या एका प्रयोगासाठी २५० रुपये मानधन घेणारा नट.” अशा निगर्वी शरदला, कमल हसनने ६ दिवसांच्या शूटिंगसाठी ४२ हजार रुपये मानधन दिले होते. म्हणजे दिवसाला ७ हजार रुपये. हे मानधन स्वीकारून आपण चकित झालो होतो, अशी स्पष्ट कबुली पोंक्षे यांनी पुस्तकात दिली आहे. शिवाय विमान प्रवासाचे भाडे व  जाण्यायेण्याचा प्रवासखर्च देण्यात आला. हा अनुभव पोंक्षे यांना नवा असल्याने ते भारावून गेल्याचे दिसते.

‘हे राम’ मधील नथुरामची भूमिका आणि त्या चित्रपटास लागलेला कमल हसनचा हात यामुळे पोंक्षे त्यावेळी प्रसिद्धीच्या झोतात आले होते. इंग्रजी प्रसिद्धी माध्यमांनी त्यांची चांगली दखल घेतली होती. त्याचे सर्व सचित्र उल्लेख पोंक्षे यांनी सदर पुस्तकात केले आहेत. अन्‌ मुंबईच्या  ‘बेस्ट’ या बस सेवा देणाऱ्या कंपनीत आपण मेकॅनिक होतो, याचा उलगडा त्यांनी बिनदिक्कतपणे केला आहे. बेस्टचा एक मेकॅनिक मोठा अभिनेता म्हणून नावारुपास कसा आला, हे इंग्रजी प्रसारमाध्यमांनी लोकांसमोर मांडले होते.

शरद पोंक्षे आता ‘ठिपक्यांची रांगोळी’ आणि ‘दार उघड बयो’ या दोन मराठी मालिका गाजवत आहेत.  ‘हे राम’च्या वेळी त्यांची ‘दामिनी’ ही मालिका गाजली होती. तर नंतर आलेल्या ‘वादळवाट’ या मालिकेतील त्यांची देवराम खंडागळे ही भूमिका विशेष गाजली होती.