शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्यात आला दुरावा...

शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्यात आला दुरावा, सोशल मीडियावर ब्रेकअपची केली घोषणा (Shamita Shetty And Raqesh Bapat Announce Their Breakup on Social Media)

अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण आणि टीव्ही अभिनेत्री शमिता शेट्टी व अभिनेता राकेश बापट यांच्या नात्यांची सोशल मीडियावर मध्यंतरी खूप चर्चा रंगली होती. त्यांच्या बद्दल रोज काही ना काही बातम्या येत राहायच्या. बरेचदा त्यांचे रोमॅण्टिक फोटोसुद्धा सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले. पण अचानक त्या दोघांनी त्यांच्या ब्रेकअपची घोषणा केली आहे.

ओटीटीवर प्रसारित होणाऱ्या बिग बॉसमध्ये अभिनेत्री शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांची भेट झाली होती. चित्रपट निर्माता करण जोहर हा शो होस्ट करत होता. या शोदरम्यान शमिता शेट्टी आणि राकेश बापट एकमेकांच्या प्रेमात पडले. आणि पुढे त्यांचे नाते घट्ट होत गेले. अनेकदा ते दोघे कधी सार्वजनिक ठिकाणी तर कधी डिनर डेटसाठी एकमेकांचा हात घालून फिरताना दिसले.काहीवेळेस तर ते एकमेकांच्या कुटुंबासोबत गेट-टूगेदर करतानाही दिसले होते.

गेले काही दिवस त्यांच्यात काहीतरी बिनसल्याच्या चर्चा चालू होत्या. पण नंतर त्यांचा एकत्र रोमॅण्टिक फोटो व्हायरल झाला. तो फोटो पाहून त्यांचे चाहते सुखावले. पण पुन्हा त्या फोटोनंतर राकेश आणि शमिताने त्यांच्या ब्रेकअपची घोषणा सोशल मीडियावर केली. आपल्या चाहत्यांच्या भावनांचा सन्मान करत ते वेगळे होत असल्याचे त्यांनी सांगितले.

शमिता शेट्टीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, मला वाटते की मी आणि राकेश बापट आता एकत्र नाही हे स्पष्ट करणे खूप महत्त्वाचे आहे. काही काळापूर्वीच आम्ही वेगळे झालो आहोत. आमचा हा म्युझिक व्हिडिओ त्या सर्व चाहत्यांसाठी आहे ज्यांनी आम्हाला खूप प्रेम दिले आणि आम्हाला पाठिंबा दिला. यापुढे चाहत्यांनी आम्हाला वैयक्तिकरित्याही असेच प्रेम आणि सकारात्मक साथ देत रहावी अशी विनंती. तुम्हाला खूप प्रेम आणि आभार.

दुसरीकडे राकेश बापटने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की शमिता आणि मी आता एकत्र नाही. नियतीने आमचे मार्ग एक केले होते.तुमच्या सर्वांच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वैयक्तिकरित्या, मला माझे नातेसंबंध सार्वजनिकपणे उघड करायला आवडत नाही. कारण त्यामुळे चाहत्यांची मनं दुखवली जाऊ शकतात. पण तुम्ही तुमचे प्रेम आम्हाला वैयक्तिकरित्या देत रहाल अशी आशा आहे. तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे.हा म्युझिक व्हिडिओ आमच्या सर्व चाहत्यांना समर्पित आहे.