शाहरूख खानचे शाळेत टोपण नाव होते ‘मेल गाड...

शाहरूख खानचे शाळेत टोपण नाव होते ‘मेल गाडी’, लहानपणी त्याने खूप उनाडक्या केल्या होत्या (Shah Rukh Revealed About His Funny Nickname ‘Express Train’ And How He Used To Trouble Everyone In School)

रोमान्स किंग म्हणून ओळख असलेला शाहरूख खान आपल्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी बोलत असतो. त्यामुळे जेव्हा कधी तो बोलतो, तेव्हा लोकांना त्याची अधिकाधिक माहिती हवी असते. आता शाहरुखने आपल्या बालपणीच्या मधुर स्मृती जागविल्या आहेत. अन्‌ शाळेमध्ये आपल्याला कोणत्या टोपण नावाने हाक मारत होते, तेही सांगितलं आहे.

अलिकडेच एका मुलाखतीत शाहरूखने सांगितलं आहे की, शाळेमध्ये त्याचे मित्र ‘मेल गाडी’ म्हणत असत. ‘मी फारच वेगाने धावत होतो. अगदी एक्सप्रेस ट्रेन प्रमाणे. म्हणून मला मुलांनी मेल गाडी असं टोपण नाव दिलं होतं.’ असं तो सांगतो.

आपण शिक्षकांना कसं छळत होतो नि ब्लॅकमेल करत होतो, तेही शाहरूखने या मुलाखतीत सांगितलं आहे. ‘केमिस्ट्रीच्या टिचरकडून मार्क्स वाढवून घ्यायचे होते, तेव्हा मी त्यांना म्हटलं, मी तर तुमच्या मुलासारखा आहे. अशा रितीने मी त्यांचा मुलगा असल्याची बतावणी करून आपले मार्क्स वाढविण्यास त्यांना भाग पाडलं.’

शाळेमध्ये आपण खूप उनाडक्या केल्या असंही शाहरूखनं सांगितलं. तो मिर्गी आल्याचं नाटक करायचा. तेव्हा टिचर्स त्याला जोडे हुंगवायचे. याबद्दल एक मजेदार किस्सा शाहरूखने सांगितला की, ‘एक नवे टिचर आले. तेव्हा त्यांच्यासमोर मी बेशुद्ध पडल्याचं नाटक केलं. वर्गातले मित्र त्यांना म्हणाले, याला जर तुम्ही जोडे हुंगवले नाहीत, तर मरेल हो! बिचारे नवे टिचर अनवाणी होऊन त्यांनी मला जोडे हुंगायला दिले.’

शाहरूख खानच्या जीवनावर चित्रित करण्यात आलेली एक डॉक्युमेंटरी फिल्म आजकाल फार चर्चेत आहे. त्यामध्ये तो आपल्या शाळेला भेट देताना दाखवलं आहे. शाळेमध्ये फिरत तो जुन्या आठवणींना उजाळा देताना दाखवला आहे. त्यामध्येच तो सांगतो की, एका मुलाचे मी दात पाडले होते. त्याची ही डॉक्युमेंटरी लोकांना आवडली आहे.