शाहरुखकडे सुद्धा विराजमान झाले बाप्पा, म्हणाला,...

शाहरुखकडे सुद्धा विराजमान झाले बाप्पा, म्हणाला, देवावर विश्वास ठेवल्यास आपली सगळी स्वप्न पूर्ण करु शकता (Shah Rukh Khan welcomes Ganpati at Mannat, Says, ‘Through hard work, perseverance & faith in God, u can live your dreams’)

कालपासून देशभरात गणेशोत्सव साजरा होण्यास सुरूवात झाली आहे. लोकांनी घरोघरी गणेशाची स्थापना केली आहे. अनेक सेलिब्रिटींनीही आपल्या घरी बाप्पाची स्थापना करून विधिवत पूजा केली आहे. अनेक मुस्लिम कलाकारांनीसुद्धा आपल्या घरी बाप्पाची भक्तीभावाने स्थापना केली आहे. सलमान खान, सारा अली खाननंतर आता बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खाननेही आपल्या घरी बाप्पा आणला आहे. शाहरुख खानने सोशल मीडियावर आपल्या घरी बसवलेल्या गणपतीचा फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे. तसेच चाहत्यांना एक खास संदेशही दिला आहे.

स्वत: शाहरुख खानने ट्विटर आणि इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत त्याने आणि त्याचा लहान मुलगा अबरामने त्यांच्या घरी गणपतीचे स्वागत केल्याची माहिती दिली. मोदक खूप छान होते असेही किंग खानने म्हटले आहे.

बाप्पाचा हा फोटो शेअर करत शाहरुखने कॅप्शनमध्ये लिहिले  “मी आणि माझ्या मुलाने गणपतीचे स्वागत केले… त्यानंतर आम्ही खूप चविष्ट मोदक खाल्ले. कठोर परिश्रम, चिकाटी आणि देवावर विश्वास ठेवून तुम्ही तुमची सर्व स्वप्ने सत्यात उतरवू शकता असे आपल्याला शिकवले जाते. सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.”

शाहरुखने शेअर केलेल्या फोटोमध्ये गणेशाची मूर्ती दिसत आहे. मूर्ती खूप छान सजवण्यात आली. बाप्पाच्या शेजारी फळे आणि फुलेही ठेवण्यात आली आहेत. फोटोत शाहरुख आणि अबरामच्या डोक्याचा काही भागसुद्धा दिसत आहे.

या फोटोला सोशल मीडिया यूजर्सकडून खूप पसंती मिळत आहे. तर काही लोक किंग खानला ट्रोल करत आहेत. काही ट्रोलर्सचे म्हणणे आहे की शाहरुख आपल्या आगामी पठाण चित्रपटाच्या यशाबद्दल चिंतेत त्यामुळे तो देवाकडे प्रार्थना करत आहे. तर काहींच्या मते, सध्या बॉलिवूडवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेण्ड जोरदार सुरु असल्यामुळे तो हे सर्व करत आहे. ट्रोल करणारे असेही म्हणतात की त्यांनी काहीही केले तरी लोक विश्वास ठेवणार नाहीत आणि त्याच्या चित्रपटाचे सुद्धा इतरांप्रमाणेच होईल.

शाहरुख खान ‘पठाण’ या चित्रपटाद्वारे पुनरागमन करत आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट जानेवारी 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे, मात्र आतापासूनच लोकांनी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सुरू केली आहे.