शाहरुख खानने ‘मन्नत’वर फडकवला तिरंगा, गौरीने ति...

शाहरुख खानने ‘मन्नत’वर फडकवला तिरंगा, गौरीने तिरंग्यासोबत शेअर केला फॅमिली फोटो (Shah Rukh Khan hoist Tricolour at Mannat, Gauri Khan shares a glimpse of their pre-Independence Day celebrations)

आज भारत आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. लाखों वीरांच्या बलिदानाने प्राप्त झालेल्या या स्वातंत्र्याला आज 75 वर्षे झाली. त्या निमित्ताने देशभरात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ म्हणजेच ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा केला जात आहे. या निमित्ताने देशभरात ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमात आता बॉलीवुड कलाकारांनीही सहभाग घेतला आहे. आमिर खान, सलमान खान, राजकुमार यादव यांच्यानंतर आता शाहरुख खान(Shah Rukh Khan) यानेही आपल्या वांद्रे येथील ‘मन्नत’ बंगल्यावर तिरंगा फडकवला आहे.

ध्वज फडकवताना शाहरुख खान सोबतच पत्नी गौरी खान (Gauri Khan) आणि मुले आर्यन खान (Aryan Khan) आणि अबराम खान (Abram Khan) हे देखील उपस्थित होते. शाहरुखने याचा एक व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. तसेच, त्याने चाहत्यांना आणि देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

गौरी खानने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आणि या स्वातंत्र्याच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या चित्रात मन्नतच्या छतावर फडकणारा तिरंगा ध्वजासोबत ब्ल्यू जिन्स आणि व्हाइट कलरच्या टीशर्टमध्ये शाहरुखचं संपूर्ण कुटुंब पोज देताना दिसत आहे. गौरी खानने हा फोटो शेअर करत, ‘स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा’ असा संदेश दिला आहे.

काही मिनिटांतच हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. मन्नतवरील तिरंगा पाहून शाहरुखचे चाहते खूश झाले असून कमेंट करून किंग खानचे कौतुक करत आहेत. एका चाहत्याने ‘काय बात आहे सर, तुम्ही मन जिंकले’, अशी कमेंट केली आहे तर दुसऱ्या चाहत्याने ‘तुमचा हा फोटो अनेकांना प्रेरणा देईल’ अशी कमेंट केली. या फोटोचे खूपच कौतुक होत आहे.