शाहरुख खानचे औदार्य; दिल्ली कांझावाला हिट अँड र...

शाहरुख खानचे औदार्य; दिल्ली कांझावाला हिट अँड रन प्रकरणात जीव गमावणाऱ्या अंजलीच्या कुटुंबीयांना केली मोठी मदत (Shah Rukh Khan extends monetary support to Delhi hit-and-run victim Anjali Singh’s family, Fans shower love on King Khan)

सर्वजण नवीन वर्ष साजरे करत असतानाच त्याच रात्री कारच्या धडकेत मृत्यू झाल्यानंतर कारचालकाने २० वर्षीय तरुणीला १२ किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याची मन विषण्ण करणारी घटना दिल्लीजवळ घडली. याप्रकरणी सात आरोपी पोलीस कोठडीत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या अंजली सिंहच्या कुटुंबीयांच्या मदतीला आता अभिनेता शाहरुख खान धावून आला आहे.

अंजली ही तिच्या कुटुंबातील एकमेव कमावती सदस्य होती. तिचे वडील नाहीत आणि आईही आजारी आहे. अशा परिस्थितीत अंजलीच्या जाण्याने तिच्या कुटुंबावर संकटांचा डोंगर कोसळला आहे. अशा परिस्थितीत, शाहरुखच्या मीर फाऊंडेशनकडून अंजलीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. जेणेकरून अंजलीच्या कुटुंबाला या कठीण काळात आर्थिक मदत मिळू शकेल.

तसे, ही पहिली वेळ नाही जेव्हा शाहरुख खानने सिद्ध केले की तो केवळ बॉलिवूडच नाही तर खऱ्या आयुष्यातही किंग खान आहे. याआधीही त्यांच्या या प्रतिष्ठानने अनेक वेळा मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोनाच्या काळातही शाहरुख खानने अनेक शहरातील लोकांना मदत केली होती. त्याने त्याचे मुंबईतील कार्यालय कोविड सेंटर म्हणून वापरण्यासाठी दिले होते. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे करून शाहरुखने औदार्य दाखवून दिले आहे.

नेमकं काय घडलं?

एका कारने दुचाकीवर असलेल्या तरुणीला धडक दिल्यानंतर तिचा मृत्यू झाला. त्यानंतरही कार न थांबवता चालकाने मृत तरुणीला सुलतानपुरी ते कांझावालापर्यंत फरफटत नेल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. याप्रकरणी दीपिक खन्ना, अमित खन्ना, कृष्णन, मिथुन आणि मनोज मित्तल या पाच जणांना आधी अटक झाली. हा दुर्मिळातील दुर्मीळ गुन्हा असून आरोपी प्रभावशाली कुटुंबातील असले तरी त्यांना फाशीची शिक्षा सुनावली जावी, अशी प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.

तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा अंजलीच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये आर्थिक मदत देण्याचं जाहीर केलं आहे. केजरीवाल यांनी पीडितेच्या आईशी बातचित केल्यानंतर वकील मिळवून देण्याचंही आश्वासन दिलं. अंजलीला न्याय मिळवून देणार, असं ते म्हणाले.

मीर फाऊंडेशनबद्दल सांगायचे तर, शाहरुख खानने त्याचे दिवंगत वडील मीर ताज मोहम्मद यांच्या नावाने मीर फाउंडेशन ही एनजीओ सुरू केली आहे, ज्याचा उद्देश तळागाळाच्या समाजामध्ये बदल घडवून आणणे असा असून ही संस्था महिला सक्षमीकरणासाठी काम करते.