शगून फेम अभिनेत्री सुरभि तिवारीने पती आणि सासरच...

शगून फेम अभिनेत्री सुरभि तिवारीने पती आणि सासरच्या मंडळींविरोधात नोंदवली घरगुती हिंसाचाराची तक्रार(Shagun Fame TV Actress Surbhi Tiwari Files FIR Against Husband And In-Laws For Domestic Violence)

शगुन , घर जमाई आणि एक रिश्ता साझेदारी का यांसारख्या टीव्ही मालिकांमधुन अभिनेत्री सुरभि तिवारी घराघरात पोहचली. सुरभि तिवारीने आपल्या पायलेट पती आणि सासरच्या मंडळीं विरोधात पोलिसांत घरगुती हिंसाचाराची तक्रार नोंदवली आहे. शिवाय तिने पती आणि सासरकडच्यांवर काही गंभीर आरोपही लावले आहेत.

सुरभिने दिल्लीत राहणाऱ्या प्रवीण सिन्हा सोबत २०१९ मध्ये लग्न केले होते. पण लग्नाच्या काही दिवसांनंतर तिला ती चुकीच्या लोकांमध्ये फसल्याची जाणीव झाली.

सुरभिने सांगितले की, तिच्यासोबत खूप खोटे बोलले गेले. लग्नानंतरही सुरभिला तिचे अभिनयातील करीअर सुरु ठेवायचे होते तेव्हा तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला लग्नानंतर तो मुंबईला शिफ्ट होईल अशी अट घातली होती. ती त्याने मान्यही केली. पण लग्नानंतर तसे काहीच झाले नाही. तो मुंबईला आलाच नाही. त्यामुळे सुरभि लग्नानंतर कोणत्याच मालिकेत काम करु शकली नाही.

सुरभिचे म्हणणे आहे की, तिचे स्त्रीधन सुद्धा तिला दिले नाही. त्यामुळे शेवटचा उपाय म्हणून तिला कायद्याची मदत घ्यावी लागली. २० जूनला सुरभिने वर्सोवा पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली. त्याआधी १२ मे ला तिने अंधेरीच्या मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेट कोर्टात घरगुती हिंसाचाराची तक्रार नोंदवली होती. सुरभिने आपल्या पती आणि सासू विरोधात मारझोड, धमकावणे आणि धोका देणे असे आरोप केले.

सुरभिने पुढे सांगितले की लग्नाच्या वेळी तिला मिळालेले दागिने आणि चांदीची भांडी जी तिच्या हक्काची होती ती सुद्धा तिला मिळालेली नाहीत. सुरभिने तिच्या औषधपाण्यासाठी तिच्याकडे असलेले सोन्याचे दागिने विकून खर्च केल्याचे सांगितले. याशिवाय तिने तिच्या नणंदेवर त्रास देण्याचा आरोप केला आहे. सुरभिने जरी घटस्फोट घेण्याचे नक्की केले असले तरी तिचा नवरा घटस्फोट देण्यास तयार नाही. पण ती तिच्या निर्णयावर ठाम असून कायद्याने ती ही लढाई लढणार असल्याचे ती म्हणाली.

सुरभिने १९९७ मध्ये घर जमाई या मालिकेतून तिच्या अभिनयातील करीअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने श्री गणेश, शगुन, हरी मिर्ची लाल मिर्ची, अगले जन्म मोहे बिटिया ही कीजो, शिकवा, दो दिल बंधे एक डोरी से, हम आपके घर में रहते हैं , एक रिश्ता साझेदारी का यांसारख्या मालिकांमध्ये काम केले.