‘सेक्स एज्युकेशन ही काळाची गरज’, अभिनेत्री रकुल...

‘सेक्स एज्युकेशन ही काळाची गरज’, अभिनेत्री रकुल प्रीत सिंहचे आग्रही प्रतिपादन (‘Sex Education Is The Need Of The Hour’ : Actress Rakul Preet Singh Endorses Its Importance)

‘सेक्स एज्युकेशन ही काळाची गरज आहे. त्याच्या अज्ञानाने महिलावर्गाला लैंगिक व आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. आपण मानसिक, शारीरिक आरोग्याबाबत फार जागरूक असतो. मग लैंगिक आरोग्याबाबत का असू नये?’ असे आग्रही प्रतिपादन अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने केले. रॉनी स्क्रूवाला व झी ५ यांची निर्मिती असलेल्या ‘छत्रीवाली’ या चित्रपटाच्या ट्रेलर अनावरण प्रसंगी ती बोलत होती.

लैंगिक शिक्षणाचे महत्त्व आणि असुरक्षित शरीरसंबंध या विषयाला हात घालणारा हा धाडसी विषयांवरील चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित होत आहे. त्यामध्ये सानिया, या नायिकेची भूमिका रकुल करत आहे. शाळेमध्ये लैंगिक शिक्षण हा विषय ऑप्शनल न करता कंपलसरी करावा, अशी मागणी ती या चित्रपटात करते. अन्‌ त्यासाठी लढा देते. ‘तहानलेल्या पुरुषाला विहिरीकडे येऊ द्यात, पण विहीरीच्या अटींवर,’ अशा तऱ्हेचा उद्‌बोधक संवाद बोलताना रकुल ‘छत्रीवाली’च्या ट्रेलरमध्ये दिसते.

‘छत्रीवाली’चे दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देवस्कर यांनी केले असून रकुल सह सुमित व्यास, प्राची शर्मा आणि जुनेजाणते अभिनेते सतीश कौशिक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘सेक्स एज्युकेशनचे महत्त्व विनोदाची झालर लावून या चित्रपटात सांगण्यात आले आहे,’ असे तेजस देवस्कर यांनी सांगितले.

‘आजच्या युगात लैंगिक शिक्षण गरजेचे असून या विषयाची खुलेपणाने चर्चा झाली पाहिजे,’ असे आपले मत व्यक्त करून सतीश कौशिक म्हणाले, ‘हिंदी सिनेमाचा इतिहास पाहता मनोरंजनाच्या आधारे सामाजिक संदेश देण्याचा प्रघात आहे. व्ही. शांताराम, बी. आर. चोप्रा यांनी आपल्या चित्रपटांमधून मनोरंजनाबरोबर सामाजिक प्रबोधन केले आहे. असे चित्रपट यशस्वी ठरले आहेत. ‘छत्रीवाली’ मध्ये गंभीर विषय विनोदी पद्धतीने मांडण्यात आल्याने प्रेक्षकांना तो नक्कीच आवडेल.’ ट्रेलरच्या अनावरण प्रसंगी निर्माते रॉनी स्क्रूवाला आणि झी ५चे चीफ बिझनेस ऑफिसर मनीष कालरा यांची समयोचित भाषणे झाली.