महिन्याचं बजेट, करा सेट! (Set Your Monthly Budget)

महिन्याचं बजेट, करा सेट! (Set Your Monthly Budget)

गृहिणींना दर महिन्याला किराणा सामानाची खरेदी करावी लागते. तेव्हा त्यांनी आपलं बजेट किती आहे, हे लक्षात घेऊन काही गोष्टी केल्या तर वायफळ खर्च कमी होऊन मनासारखी खरेदीही होईल आणि बचतही…
आपण आपल्या महिन्याच्या किराणा सामानाचं बजेट बनवून आपले खर्च आटोक्यात आणू शकतो, परंतु आपल्यातील बर्‍याच जणींना किराण्याचं बजेट बनविताच येत नाही. आणि जमलं तरी ते योजनाबद्ध नसल्यामुळे बारगळतं. चला तर योजनाबद्ध पद्धतीनं आपलं महिन्याचं खाण्यापिण्याच्या सामानाचं बजेट कसं बनवायचं ते पाहूया.

–  सर्वप्रथम नियमित लागणार्‍या गरजेच्या सामानाची जसे – पीठ, तांदूळ, साखर, धान्य इत्यादी यादी बनवा. त्यानंतर बजेटप्रमाणे इतर सामानाची यादी त्यात घाला.
–  रोजच्या रोज काहीना काही किराणा सामान खरेदी करण्यापेक्षा आठवड्याची यादी बनवा. यामुळे आपल्याला अमुक एक सामानावर होणार्‍या खर्चाचा अंदाज येईल.
–  शक्यतो सामानाची यादी फ्रिजच्या दारावर लावून ठेवा. घरातील एखादं सामान संपलं की त्याची नोंद त्या यादीत करा. त्यामुळे केवळ आवश्यक सामान घरी येईल आणि अनावश्यक खर्च टळतील.
–  किराण्याचं सामान खरेदी करण्यासाठी आजुबाजुच्या छोट्या छोट्या दुकानांत जाण्याऐवजी सुपरमार्केट किंवा होलसेल मार्केटमधून सामान विकत घ्या. कारण सुपर मार्केट व छोट्या दुकानातील दरांमध्ये बराच फरक असतो.
–  तुमची सामानाची यादी बरीच मोठी असली तर   ज्या ठिकाणी सेल लागला असेल वा सवलत मिळत असेल अशा ठिकाणाहून खरेदी करा.
–  सेलमध्ये खरेदी करताना ज्या गोष्टींचा तुम्ही जास्त प्रमाणात वापर करता, त्या गोष्टी जास्त प्रमाणात विकत घेऊन ठेवा.
–  सेलमध्ये गरजेपेक्षा जास्त सामान खरेदी करताना आपलं किराण्याचं बिल वाढतंय हे लक्षात ठेवा. तेव्हा सेलचा फायदा जरूर घ्या, परंतु आपलं बजेटही बिघडू देऊ नका.
–  सेलमधून किराणा खरेदी करताना सामानाचा दर्जा आणि प्रमाण (माप) यांच्याशी तडजोड करू नका.
–  किराण्याच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याकरिता आवश्यकता असेल तेवढेच अन्न शिजवा म्हणजे अन्न वाया जाणार नाही.
–  शिल्लक राहिलेलं अन्न फेकून देऊ नका. त्यापासून चवीष्ट पदार्थ बनवून खा.

–  किराणा खरेदी करताना अन्नधान्यासाठीच्या कुपनचा वापर करू शकतो. परंतु कुपन वापरताना स्वस्त वस्तू न घेता चांगल्या वस्तू घ्या.
–  सध्या बर्‍याच ऑन लाइन ग्रॉसरी अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. या अ‍ॅप्सच्या मदतीने तुम्ही किराणा घेऊ शकता.
–  या अ‍ॅप्समध्येही सेल, सवलत आणि कॅश बॅक यासारख्या अनेक सुविधा असतात. या सुविधांचा लाभ घेऊन आपण किराण्याची खरेदी करू शकतो.  
– तुम्हाला वरचेवर रेस्टॉरंटमध्ये जाण्याची सवय असल्यास अथवा आठवड्यातून दोन तीन वेळा तुम्ही बाहेरून जेवण मागवत असाल तर आपल्या सवयी बदला. असं केल्याने केवळ अनावश्यक खर्चाची बचत होईल असं नसून घरचं जेवण खाल्याने निरोगीही  राहता येईल.