‘आई कुठे काय करते’च्या कलाकारांना ‘आयपीएल’ची ला...

‘आई कुठे काय करते’च्या कलाकारांना ‘आयपीएल’ची लागण; खेळले क्रिकेटचा सामना (Serial Artistes Obssesed By IPL Matches; Played A Cricket Match During Break)

स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक मनापासून प्रेम करतात. देशमुख कुटुंबं जसं आपल्या प्रत्येकाच्याच जगण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे अगदी त्याचप्रमाणे या मालिकेतील कलाकारांसाठीसुद्धा हे कुटुंब त्यांच्या अगदी जवळचं आहे. दिवसाचे बारा-तेरा तास एका छताखाली शूट करत असतानाच त्यांच्यातला ऋणानुबंध हा दिवसेंदिवस द्विगुणीत होतोय. त्यामुळे शूटिंग व्यतिरिक्तही विसाव्याचे क्षण आई कुठे काय करते मालिकेची टीम शोधत असते. त्यामुळेच शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातून एक दिवस काढत या संपूर्ण टीमने क्रिकेट खेळायचं ठरवलं.

दिग्दर्शक रवींद्र करमरकर आणि लेखिका नमिता वर्तक यांच्या पुढाकाराने हा खास क्रिकेटचा सामना भरवण्यात आला. या संकल्पनेला सर्वच कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळींनी हिरवा कंदील दाखवला आणि सामन्याचा दिवस पक्का झाला.  टीम संजना, टीम अरुंधती, टीम अनिरुद्ध आणि टीम रवींद्र अश्या चार टीम तयार करण्यात आल्या. प्रत्येकानेच आपलं कौशल्य पणाला लावत हा सामना जिंकण्याचा प्रयत्न केला. मात्र महाअंतिम फेरी रंगली टीम अनिरुद्ध आणि टीम संजनामध्ये. सामना चुरशीचा होता. मात्र महाअंतिम फेरीत टीम संजनाने बाजी मारली. खेळ म्हटलं तर हार-जीत ही आलीच. मात्र संपूर्ण टीमला एकत्र बांधून ठेवण्याचा हा स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल सर्वांनीच दिग्दर्शक रवींद्र करमकरकर यांचे आभार मानले.