ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे निधन(Senio...

ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे निधन(Senior Actress Chitra Navathe Passes Away)

पन्नासाव्या दशकात मराठी सृष्टी गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे निधन झाले आहे. त्या 89 वर्षांच्या होत्या. गेली दीड वर्षे मुलुंड येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.आज संध्याकाळी सांताक्रुझ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. योगायोग म्हणजे गेल्या वर्षी आजच्याच तारखेला ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचं निधन झालं होतं.

रेखा आणि चित्रा या दोघी सख्ख्या बहिणी होत्या.१९५२ साली प्रदर्शित झालेला राजा परांजपे दिग्दर्शित ‘लाखाची गोष्ट’ हा या दोन्ही बहिणींचा नायिका म्हणून पहिला चित्रपट होता.

चित्रा यांचे लग्नापूर्वीचे नाव कुसुम सुखटणकर असे होते. गदिमांनी कुसुम यांचे नाव बदलून चित्रा असे ठेवले होते. दिग्दर्शक राजा नवाथे यांच्याशी त्यांनी लग्न केले.  लाखाची गोष्ट, गुळाचा गणपती, देवबाप्पा, मोहित्यांची मंजुळा, बोलाविता धनी, कोर्टाची पायरी अशा अनेक नावाजलेल्या सिनेमांमध्ये चित्रा यांनी नायिका म्हणून काम केले होते.अलीकडच्या काळात त्यांनी ‘बोक्या सातबंडे’, ‘अगडबंब’,‘टिंग्या’ या चित्रपटात काम केले होते.