ब्रा खरेदी करताना… (Select A Perfect Bra ...

ब्रा खरेदी करताना… (Select A Perfect Bra For Sexy Figure)

एका सर्वेक्षणानुसार, दहापैकी आठ भारतीय स्त्रिया चुकीच्या मापाची ब्रा वापरतात. हे प्रमाण पाहता ब्राविषयी स्त्रियांनी जागरूक व्हायलाच हवं, यात शंका नाही.
‘तुझ्या ब्राची पट्टी दिसतेय’ असं दबक्या आवाजात कानात सांगण्यापासून ते पारदर्शक टॉपमध्ये स्टायलिश ब्रालेट मिरवण्यापर्यंत हल्ली तरुणीच नव्हे तर समस्त स्त्रीवर्ग ब्रा-पँटीचे विविध प्रकार अजमावून पाहू लागल्या आहेत. मात्र असं असलं तरी, आजही अनेक स्त्रिया अंतर्वस्त्रांसाठी वेगळं बजेट ठेवत नाहीत, हे एका

सर्वेक्षणातून समोर आलं आहे. शरीर सुशोभित करणार्‍या कपड्यांसाठी खर्च करताना आपण मागेपुढे पाहत नाही आणि शरीराची योग्य काळजी घेणार्‍या अंतर्वस्त्रांच्या बाबतीत मात्र, ‘ते कोण बघणार आहे?’ असं म्हणत कंजुषी करतो, हे योग्य नाही. आपल्या आंतरअंगांची स्वच्छता, त्यांचा आकार, त्यांना मिळणारा आराम हे सारं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी अंतर्वस्त्रांची निवड काळजीपूर्वक करणं अत्यंत गरजेचं आहे.
एका सर्वेक्षणानुसार, दहापैकी आठ भारतीय स्त्रिया चुकीच्या मापाची ब्रा वापरतात. हे प्रमाण पाहता ब्राविषयी स्त्रियांनी जागरूक व्हायलाच हवं, यात शंका नाही. ब्रा खरेदी करण्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात ते जाणून घेण्यापूर्वी ब्राचा वापर करताना कोणती काळजी घ्यायला हवी ते जाणून घेऊ-
– दिवसातील किमान 16 तास अंतर्वस्त्रं शरीरावर असतात आणि त्यात ती घट्ट असतात, त्यामुळे ती आरामदायीच असायला हवीत.
– ब्रा 24 तास घालू नये. एका दिवसात ती 16 तासांपेक्षा जास्त काळ अंगावर नसावी, असं वैद्यकीय संशोधन सांगतं.
– सहा ते सात वर्षं स्त्रिया एकाच मापाची ब्रा वापरतात, हे अत्यंत चुकीचं आहे. स्त्रीच्या आयुष्यात किमान सहा वेळा तिच्या स्तनाचा आकार बदलतो, हे लक्षात घ्यायला हवं.
– वर्षांतून एकदा आपण योग्य मापाची ब्रा वापरतो आहोत का, याची खात्री करणं गरजेचं आहे.
– एखादी ब्रा साधारण सहा महिन्यांहून अधिक काळ वापरू नये.
– अंतर्वस्त्रं घट्ट असल्यामुळे शक्यतो आपल्या त्वचेला कोणत्या प्रकारच्या कापडाचा त्रास होत नाही, कोणतं कापड आरामदायी आहे, हे लक्षात घ्या.
– घट्ट अंतर्वस्त्रं परिधान केल्यास शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होत नाही. त्यामुळे त्वचेचा संसर्ग होऊ शकतो, तसंच खांदे आणि पाठीशी संबंधित समस्याही उद्भवू शकतात.
– अयोग्य मापाच्या अंतर्वस्त्रांमुळे स्तनाचा कर्करोग, पचन क्रियेसंबंधी समस्या, छातीत जळजळ, डोकं दुखी आणि पुरळ येण्यासारख्या समस्याही सतावू शकतात.
– अंतर्वस्त्रं चांगल्या दर्जाचीच असावीत. नाहीतर खाज, खरूज आणि इतर त्वचेशी संबंधित रोग उद्भवू शकतात.
– अंतर्वस्त्रं वेळोवेळी गरम पाण्याने धुवायला हवीत. तसंच दररोज स्वच्छ धुतलेली कोरडी अंतर्वस्त्रंच परिधान करायला हवीत.
– सैल, फाटलेली, कपड्यांतून डोकावणारी अंतर्वस्त्र आपल्याला निर्धास्त वावरू देत नाहीत. तेच अंतर्वस्त्र योग्य मापाची, आरामदायी असली की एक वेगळाच आत्मविश्‍वास आपल्या वर्तणुकीत येतो.

खरेदी करताना…
इतर वस्तू खरेदी करण्यासाठी आपण दहा दुकानं धुंडाळतो आणि विचारपूर्वक खरेदी करतो. परंतु, अंतर्वस्त्रं खरेदी करण्याची वेळ येते, तेव्हा आपण रस्त्यात दिसलेल्या कोणत्याही दुकानात शिरतो आणि तेथील सेल्सगर्लने ‘बेस्ट’ म्हणून सांगितलेलं काहीही उचलून घर आणतो. मग मात्र माप योग्य नाही, व्यवस्थित बसत नाही, आरामदायी नाही, टोचतेय म्हणून पश्‍चात्ताप करतो. तसं मुळीच करू नका. ब्राची खरेदी करताना हे मुद्दे जरूर लक्षात घ्या.
– शरीराचा आकार सतत बदलत असतो. शिवाय काळानुरूप स्तनांचाही आकार बदलत असतो. त्यानुसार आराम देणारी अंतर्वस्त्रंही घालायला हवीत. म्हणूनच प्रत्येक वेळी खरेदी करण्यापूर्वी अंतर्वस्त्रांचं योग्य माप अवश्य तपासून घ्यायला हवं.
– ब्रा खरेदी करण्यापूर्वी योग्य माप आणि आराम तपासण्यासाठी एकदा घालून पाहणं योग्य ठरतं. म्हणूनच सुरक्षित ट्रायल रूम असेल, अशा दुकानातून ब्रा खरेदी करा.
– ब्राची ट्रायल घेताना, ब्रा घातल्यानंतर पुढील बाजूला वाकून, दोन्ही हात वर आणि खाली दोन्ही दिशेने फिरवून आरामदायी आणि माप योग्य आहे, याची खात्री करून घ्या.
– ब्रा ऑनलाइन खरेदी न करणंही टाळलेलंच बरं. वापरून पाहिलेली एखाद्या ब्रँडची ब्रा ऑनलाइन खरेदी करण्यास हरकत नाही. कारण त्याची फिटिंग, कम्फर्ट आपल्याला माहीत असते.
– ब्रा निवडताना, आपले स्तन ब्राच्या ‘कप्स’ने पूर्णतः झाकले जातील असं पाहा. हल्ली कप्सही वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहेत. त्यानुसार योग्य ब्राची निवड करा. लक्षात ठेवा, तुम्ही आज निवडलेल्या ब्रावर तुमच्या स्तनांचा आकार भविष्यात कसा राहील, हे अवलंबून असतं. शिवाय योग्य मापाच्या, आकाराच्या ब्रावर परिधान केलेल्या पोशाखाचाही लूक छान दिसतो.
– स्तन मोठे दिसण्यासाठी पॅडेड ब्राची निवड करा. एक्स्ट्रा सपोर्टसाठी ब्रा अंडरवायर ब्रा निवडता येईल. व्यायाम करताना, खेळताना वारण्यासाठी स्पोर्ट्स ब्रा खरेदी करा.

बरेचदा आपला शू-रॅक ओसंडून वाहत असतो, कपड्यांच्या कपाटाचंही काही असंच असतं, पण अंतर्वस्त्र खरेदी करताना मात्र आपण हात आखडता घेतो. लक्झरीवर नको तेवढा पैसा खर्च करतो आणि जे खरंच शरीरासाठी, आरोग्यासाठी गरजेचं आहे त्याची खरेदी करताना कंजुषी करतो. पैसे वाचवण्याच्या हेतूने केवळ शरीर झाकलं जाईल, एवढंच पाहून काहीही खरेदी करतो. अशा वस्तू लवकर खराब तर होतातच, मात्र शरीराचंही नुकसान करू शकतात, तेव्हा असं मुळीच करू नका. अंतर्वस्त्र तुमच्या शरीराच्या सर्वांत नजीक असतात, हे विसरू नका. स्ट्रॅपलेस, बॅकलेस, स्पोर्ट्स, टी-शर्ट ब्रा अशा टीनएजरपासून ते साठीकडे झुकलेल्या आजीपर्यंतच्या सर्व वयोगटासाठी नानाविध प्रकारच्या ब्रा सध्या बाजारात उपलब्ध आहेत. त्यांपैकी आपल्यासाठी खास ब्रा निवडताना ती वेगवेगळ्या स्टाइलची असेल हे पाहाच, मात्र सोबत ती उत्तम दर्जाची, योग्य मापाची आणि आरामदायीही आहे, याची खात्री करून घ्या.