नवरा-बायकोच्या भांडणात यांना बनवा आपले गुरू (Se...

नवरा-बायकोच्या भांडणात यांना बनवा आपले गुरू (Seek The Help Of These Middle Man In The Differences Of Husband-Wife)

असं म्हणतात की, नवरा-बायकोच्या भांडणात न पडलेलंच बरं. भांडतील भांडतील आणि पुन्हा एकत्र येतील. हे खरं असलं तरी काही वेळा ही भांडणं क्षुल्लक कारणांवरून सुरू होऊन विकोपाला जातात. यात नवरा-बायकोंचं नातं तुटण्याची वेळ येते. अशा वेळी एखाद्या मध्यस्थाची नक्कीच गरज पडते, ज्याच्या प्रयत्नाने तुटणारं नातं वाचवता येऊ शकतं. अशा व्यक्ती खरं तर आपल्या आजूबाजूलाच असतात अन् तुमचं वैवाहिक जीवन अधिक चांगल्या पद्धतीने व्यवस्थापित करण्यात तुम्हाला मदतही करू शकतात. या व्यक्तींना तुम्ही आपले गुरू बनवून आपलं नातं वाचवू शकता. जाणून घेऊया हे गुरू कोण?

आई
आईचं प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील स्थान काय असतं हे सांगण्याची गरज नाही. आई ही आपली पहिली गुरु असतेच शिवाय आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ती आपल्याला मदत करत असते. त्यामुळे जेव्हा कधी तुम्हा नवरा-बायकोमधील नातं बिघडतंय असं तुम्हाला वाटेल, तेव्हा तुम्ही तुमच्या आईचा सल्ला घेऊ शकता. वर्षानुवर्षे कुटुंब आणि प्रत्येक नातं सांभाळून घेणारी तुमची आई तुमच्या वैवाहिक जीवनाशी संबंधित समस्या दूर करू शकते. आपली आई ही आपल्याला चांगलीच ओळखत असते, शिवाय तिने आपल्यापेक्षा बरेच ऊनपावसाळे पाहिलेले असतात. तेव्हा नात्यात कटुता आणि दुरावा वाढत आहे असे जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुमच्या समस्या आईला सांगा. तसंच आईच्या जीवनावर एकदा नजर टाका. तिचा त्याग आणि कुटुंबाप्रति असलेलं नि:स्वार्थ प्रेम तुम्हाला खूप काही शिकवेल आणि तुम्ही मनापासून या नव्या जीवनात स्वतःला घडवण्याचा प्रयत्न कराल.

बहीण
कधी कधी आपल्यासोबत असं काही घडतं की, जे आपण आपल्या आई-वडिलांना सांगू शकत नाही, पण तीच अतिशय खासगी गोष्ट आपण आपल्या बहिणीला सांगू शकतो. बहिणी एकमेकांशी कितीही भांडल्या तरी त्यांच्यात प्रेमही तितकंच असतं. आईच्या पाठोपाठ तुमची बहीण तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजत असते. त्यामुळे ती तुम्हाला योग्य ती मदत करू शकते. रसिका म्हणते, ङ्गआम्ही नवरा-बायको वरचेवर भांडायचो. त्यामुळे आमच्या नात्यात दुरावा आला होता. पण याबद्दल आईला सांगायचं तर तिला वाईट वाटलं असतं. परंतु माझ्या मनातील ही गोष्ट कोणाशी बोलता येत नसल्यामुळे मलाही आतून गुदमरल्यासारखं होत होतं. एके दिवशी माझी बहीण घरी आली आणि माझ्या चेहर्‍याकडे पाहता क्षणीच, माझं काहीतरी बिनसलं असल्याचं तिच्या लक्षात आलं. तिने काय झालं विचारल्यानंतर मी तिला सर्व काही सांगितलं. तिच्याशी बोलल्यानंतर माझं मन तर हलकं झालंच शिवाय तिने दिलेल्या सल्ल्यामुळे आमच्या नात्यातील दुरावा कमी होण्यास मदत झाली.फफ रागाच्या भरात आपण नेहमी समोरच्या व्यक्तीचा दोष पाहतो. हे सत्य जेव्हा कोणी आपल्या समोर आणतं, तेव्हा आपल्या लक्षात येतं की टाळी एका हाताने वाजत नाही. वैवाहिक नात्यातील दुरावा आणि वादाला नवरा-बायको दोघंही जबाबदार असतात, पण ते मान्य करत नाहीत.

विवाहित मित्र /मैत्रीण
ज्यांचं वैवाहिक जीवन सुरळीत सुरू आहे, अशा वैवाहिक मित्र-मैत्रिणीकडे तुम्ही तुमच्या खासगी गोष्टी बोलू शकता. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की, तुम्हा नवरा-बायकोच्या नातेसंबंधात काहीच ठीक नाहीये, तेव्हा तुम्ही या मित्र वा मैत्रिणीला मार्ग विचारू शकता. वैवाहिक नात्याच्या यशस्वितेसाठी काय महत्त्वाचे आहे आणि काय नाही? हे तुमचा मित्र/मैत्रीण तुम्हाला खूप छान सांगू शकतात. काव्या म्हणते, “मी माझ्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी, त्यामुळे आईच्या घरी माझे खूप लाड झाले. पण सासरी मात्र परिस्थिती अगदी उलट होती. मी घरातली मोठी सून होती, त्यामुळे घरातल्या सगळ्यांची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. सगळ्यांचं करता करता माझी चिडचिड व्हायची. सासरी मला कोणी विशेष वागणूक देत नाही, मग मी सगळ्यांचा विचार का करू? यावरून अनेकदा माझं नवर्‍याशी भांडण व्हायचं. अशा परिस्थितीत माझ्या एका मैत्रिणीनं मला समजावून सांगितलं की, आपण सासरी आणि माहेरी सारख्याच प्रेमाची आणि वागणुकीची अपेक्षा करू शकत नाही. सासरी आल्यावर प्रत्येक मुलीच्या जबाबदार्‍या वाढतात. अशा वेळी रागावण्याऐवजी किंवा नाराज होण्याऐवजी त्या जबाबदार्‍या स्वीकारल्यानं सासरच्या लोकांमध्ये तुमचा आदर वाढतो आणि नात्यात प्रेमही टिकून राहतं.”

अविवाहित मित्र-मैत्रीण
केवळ विवाहित मित्रच तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकतील असे नाही. कधी कधी अविवाहित मित्राचा सल्ला आणि अनुभवही तुम्हाला उपयोगी पडू शकतो. जरी तो/ती अद्याप सेटल झाले नसले तरी, त्याचा/तिचा भूतकाळ असेल, एखाद्याशी ब्रेकअप झाला असेल, अशा वेळी त्याच्या अनुभवातून बोध घेऊन तुमच्या मित्राने केलेल्या चुका तुम्ही टाळू शकता. अनिल म्हणतो, “माझा मित्र हर्ष याने मला जीवनात जोडीदार मिळणं किती महत्त्वाचं आहे याची जाणीव करून दिली. त्यानं मला समजावून सांगितलं की, काही वेळा आपल्याकडे सर्वकाही असतानाही आपण एकटे पडतो, कारण आपल्याला आपलं सुख, दु:ख आणि वैयक्तिक गोष्टी सांगण्यासाठी जोडीदार नसतो. वयाच्या या टप्प्यावर त्याला जोडीदाराची खूप आठवण येते. तो म्हणतो की मी खूप भाग्यवान आहे, कारण मला एक जीवनसाथी आहे.”

घटस्फोटित मित्र
तुम्ही विचार करत असाल की जो स्वतःचे नाते टिकवू शकला नाही, तो आपल्याला काय सल्ला देणार? पण तसं नाहीये. हा मित्र तुम्हाला फक्त सल्लाच देईल असे नाही, तर तुम्ही त्याच्या तुटलेल्या नात्यातून धडा देखील घेऊ शकता, जसे की – जोडीदाराला गृहीत धरू नका, नात्याशी प्रामाणिक राहा, पैशासाठी भांडू नका, एकमेकांना वेळ द्या, एकमेकांवर विश्वास ठेवा इत्यादी. जिथे या सगळ्या गोष्टी होत नाहीत तिथे लवकरच नात्याला तडा जाऊ लागतो. रमेशने सांगितलं की, “एके दिवशी त्याचं त्याच्या बायकोशी खूप भांडण झालं आणि रागाच्या भरात तो त्याच्या घटस्फोटित मित्राच्या घरी गेला. रमेशने मित्राला सर्व काही सांगितलं. त्याचं बोलणं ऐकून मित्र म्हणाला, “नवरा-बायकोचं भांडण होणं ही काही मोठी गोष्ट नाही, पण छोट्या छोट्या गोष्टींना कधीच महत्त्व देऊ नये. तुमच्या नात्यामध्ये अहंकार कधीही येऊ देऊ नका, अन्यथा हा क्षणिक राग आणि अहंकार तुम्हाला आयुष्यभर काट्यासारखा बोचत राहील आणि सर्वकाही संपल्यानंतर तुम्हाला पश्चात्ताप होईल!” त्यावेळी मी नमतं घेतलं असतं, तर आज माझ्या घराचं असं विघटन झालं नसतं. मी जी चूक केली तीच चूक तुम्ही करू नका. नातं जपण्यासाठी पती-पत्नी दोघांनीही आपापला स्वार्थ आणि अहंकार बाजूला ठेवायला हवा. तसेच रागाच्या भरात आणि घाईने कोणताही निर्णय घेऊ नये.”

सहकारी (स्त्री/पुरुष)
ऑफिसमध्ये कामाच्या संदर्भात एखादी समस्या येते तेव्हा तुम्ही तुमच्या जवळच्या, विश्वासातल्या स्त्री/पुरुष सहकार्‍याकडून मदत मागता. याच सहकार्‍यासोबत तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनाबद्दलही चर्चा नक्कीच करू शकता. कदाचित त्यांच्याकडे तुमच्या समस्येचे समाधान असेल. बरेचदा नोकरी करणार्‍या जोडप्यांच्या समस्या सारख्याच असतात.

पल्लवी म्हणते, “घरी आणि ऑफिसमध्ये दुहेरी जबाबदारी पार पाडताना माझ्यावर इतका ताण आला होता की, जगातील सर्व त्रास फक्त माझ्याच आयुष्यात आहे असे वाटू लागले होते. अशा परिस्थितीत माझी सहकारी नेहाने माझा हा दृष्टिकोन बदलला. प्रत्येकाच्या जीवनात समस्या येतात आणि त्या टाळता येत नाहीत. मग त्यांना हसतमुखानं का सामोरे जाऊ नये, हे तिने मला पटवून दिलं.” नेहाने स्वतःबद्दल सांगितलं की, “सासरच्या सर्वांची काळजी घेऊनही तिला सतत सासरच्या लोकांचे टोमणे ऐकून घ्यावे लागत होते, कारण तिने प्रेमविवाह केला होता. असे असूनही ती कुटुंबाप्रति तिचे कर्तव्य पार पाडत आहे. अन् त्याचा त्रासही तिच्या चेहर्‍यावर कधीच दिसत नाही. तिच्या या गुणामुळेच तिचा नवरा तिचा खूप आदर करतो.”