माहीत असावं अस शरीरसुखाचं गुपित (Secrets Of Sex...

माहीत असावं अस शरीरसुखाचं गुपित (Secrets Of Sexual Pleasure)

आपल्याकडील बव्हंशी जोडप्यांकडे कामक्रीडेसंबंधी ज्ञानाचा अभाव असतो. या अभावामुळे सेक्स संबंध आणि त्यातून मिळवण्याचं सुख याबद्दल दोघांच्याही मनात गोंधळ असतो. हा गोंधळ होऊ नये नि आपलं कामजीवन निरामय व्हावं, म्हणून स्त्री आणि पुरुषांनीही जाणून घ्याव्यात अशा या काही गोष्टी.
दोन जिवांचं सहजीवन सुखी राहतं ते नातेसंबंधातील सुसंवादानं. अन् सेक्स संबंधातील समाधानानं. हे समाधान कामक्रीडेच्या सरावानं मिळतं. अन् कामक्रीडा यशस्वी होते, ती ज्ञान असण्यानं. पण आपल्याकडील बव्हंशी जोडप्यांकडे ज्ञानाचा अभाव असतो. या अभावामुळे सेक्स संबंध आणि त्यातून मिळवण्याचं सुख याबद्दल दोघांच्याही मनात गोंधळ असतो. मग पदरी पडलं नि पवित्र झालं, या भावनेनं गोंधळ शांत केला जातो. हा एक प्रकारे मनाचा, विषयवासनेचा कोंडमारा म्हणता येईल. हा कोंडमारा होऊ नये नि आपलं कामजीवन निरामय व्हावं, म्हणून स्त्री आणि पुरुषांनी जाणून घ्याव्यात अशा या काही गोष्टी.

परस्परांतील भावनिक संबंध उत्तम राखा
आता हे तर जगजाहीर आहे की, शरीराचं मीलन छान होणं, हे दोघांच्याही ‘मूड’वरच अवलंबून असतं. हा ‘मूड’ असण्याची आणि नसण्याची अनेक कारणं असू शकतात. नसण्याच्या कारणांचा विचार करायचा तर त्यापैकी एक कारण भांडणांचं असू शकतं. पती-पत्नीमध्ये वाद झाला, भांडण लागलं की, हा ‘मूड’ नसणारच. सेक्स संबंधासाठी नाही; पण दोघांचे भावनिक संबंधही बिघडू नयेत म्हणून, परस्परांमधील सुसंवाद महत्त्वाचा असतो. तेव्हा भांडण असो की, वाद किंवा मतभेद, त्यावर रुसून बसण्यापेक्षा परस्परांशी संवाद साधा. त्या संघर्षाची उकल करा. मनं मोकळी झाली म्हणजे नाती घट्ट होतात. कटकटी कमी होतात. अन् घरातलं वातावरण प्रसन्न राहतं. प्रसन्न वातावरणानं ‘मूड’ चांगला राहतो किंवा छान ‘मूड’ येतो. अन् सेक्स संबंध करण्याची मौज वाढते.

स्त्रियांनीही इच्छा व्यक्त करायला हव्यात
सहसा असं घडतं की, पुरुष हा निसर्गतः आक्रमक स्वभावाचा असल्यामुळे तो सेक्स संबंधात वर्चस्व गाजवतो. त्याला पाहिजे त्या पद्धतीनं तो हे सुख भोगतो. आपल्या जोडीदाराच्या आवडीनिवडीचा विचार करताना दिसत नाही. हीच गोष्ट महिलांनी केली पाहिजे. आपल्यालाही आवडनिवड आहे, त्याचं स्वातंत्र्य आहे, असा विचार करून मोकळीक घेतली पाहिजे. नेमकं सांगायचं तर, जोडीदाराच्या कोणत्या क्रियेनं आपण उत्तेजित होतो, हे स्त्रियांना कळत नाही. त्याचा आधी शोध घ्या. म्हणजे जोडीदाराला ते सांगून आपल्या रुचीनुसार लैंगिक सुख उपभोगता येईल. आपल्या सामाजिक जडणघडणीनुसार या विषयावर जोडीदाराशी बोलणं म्हणजे मोठं पाप आहे, या पूर्वापार समजुतीवर चिकटून राहू नये. काही स्त्रियांना आपलं उत्तेजित होण्याचं कारण ठाऊक असतं; पण त्याविषयी जोडीदाराशी चर्चा करणं नकोसं वाटतं. ही भीड बाळगू नका. तो आपला जोडीदार आहे, त्याच्याशी कशाला संकोच करायचा, असा विचार करून मनातल्या इच्छा त्याच्याकडे व्यक्त करा. म्हणजे, कामक्रीडा करण्याची खुमारी वाढेल. या क्रीडेत निव्वळ स्वतःचा विचार नको. जोडीदाराला काय आवडेल, त्याचा विचार करून त्यानुसार प्रतिसाद दिला पाहिजे. अन् हा नियम दोघांनीही पाळला पाहिजे.

आपल्या सोयी व मर्जीनुसार शरीरसुख घ्या
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात पती-पत्नी दोघंही करिअरशी प्रामाणिक असतात. त्यामुळे त्यांना खूप कष्ट करावे लागतात. कामाच्या धबडग्यात मन आणि शरीर थकून जातं. साहजिकच रात्री उशिरानं घरी परतल्यावर सेक्स करण्यात उत्साह उरत नाही. मनातील इच्छा उचल घेते; पण दमलेलं शरीर साथ देत नाही. पण म्हणून उदास होण्याचं काही कारण नाही. दमलेल्या शरीर आणि मनास झोपेने विश्रांती द्या. अन् आपला कार्यभाग सकाळी उरका. शरीरसुख हे रात्रीच घेतलं पाहिजे, असं काही शास्त्र नाही. ते आपल्या सोयीनुसार आणि मर्जीनुसार घेतलं पाहिजे. सकाळच्या वेळी तर आपण फ्रेश असतो. या अवस्थेत शरीरसुख चांगल्या प्रकारे घेता येईल.

आरोग्य जपा
लैंगिक सुख हा अतिशय आनंददायी अनुभव आहे. हा आनंद मिळवण्यासाठी आरोग्य चांगलं असलं पाहिजे. आरोग्य राखण्यासाठी संतुलित आहार, थोडाफार व्यायाम, किमान आठ तासांची झोप आणि प्राणायाम केला पाहिजे. वेळ मिळत असेल आणि झेपत असेल, तर व्यायाम भरपूर प्रमाणात केला तरी चालेल. चहा, कॉफी, फसफसणारी शीत पेयं, सिगरेट आणि मद्य यांचं सेवन अति प्रमाणात करू नये. सिगरेट तर नकोच. त्यामुळे जोम नाहीसा होतो आणि कॅन्सरला निमंत्रण होतं.

कामसुखात नवनवे प्रयोग करा
संसार सुरळीत चालला असतो. जीवनात चढउतार नसतात. दैनंदिन कामकाजास दोघंही जुंपले गेलेले असतात. लग्नाला बरीच वर्षं झाली असतात. अशा संथ आणि नीरस जीवनामुळे कामजीवनही प्रभावित होतं. त्यातही यांत्रिकपणा, नीरसता
येते. अशा बोअरिंग जीवनास इंटरेस्टिंग केलं पाहिजे.
कामसुखात नवनवे प्रयोग केले पाहिजेत. वेगवेगळी आसनं करून पाहायला हरकत नाही. वात्स्यायनाच्या कामसूत्रांचा इथे आधार घेता येईल. म्हणजे, कामसुखातील औत्सुक्य कायम राहील. वाढत्या वयामुळेही कामजीवन नीरस होतं. मूलबाळ झाल्यानंतर महिलांमध्ये ही नीरसता जास्त प्रमाणात दिसून येते. त्यावर मात करून कामसुखाची गोडी कायम ठेवली पाहिजे. त्यासाठी प्रत्यक्ष संभोगाआधी प्रणयचेष्टांचा (फोरप्ले) कालावधी वाढवा. निसर्गरम्य वातावरणात जा. शहराच्या प्रदूषित हवेपेक्षा थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या शुद्ध हवेचा आस्वाद घेत कामसुख अनुभवा. तुमच्या वागणुकीत फरक
पडलेला आढळेल.