हा भुलवणारा फुलांचा सोहळा (Season Of Blossoming...

हा भुलवणारा फुलांचा सोहळा (Season Of Blossoming Flowers)

आपण सारे काही बदल अनुभवतो आहोत. महामारीच्या संसर्गात झालेला बदल जाणवतो आहे. रुग्णसंख्या कमी होत आहे. हा मोठाच दिलासा देणारा बदल आहे. जीवनामध्ये बदल हा प्रत्येकाला हवा असतो. जीवनशैलीत बदल, खाण्यापिण्यात – कपडेलत्त्यात बदल हवा असतो. मुख्य म्हणजे वातावरणातला बदल अगदी आवश्यक असतो. त्यानुसार आपण ऋतूबदल अनुभवतो आहोत. हवेतला किंचित गारवा तनामनाला सुखावतो आहे. वातावरण आल्हादक झाल्याची जाणीव होत आहे. अन् मनाला खूप बरे वाटते आहे. अजूनही कायमची न गेलेली महामारीची साथ आर्थिक व मानसिक झळा देते आहे, पण वातावरणात झालेल्या बदलाने त्यांचा दाह कमी वाटतो आहे.
या ऋतूबदलाने झाडरोपांना बहर आला आहे. खासगी आणि सार्वजनिक बागांमध्ये फुलांचे ताटवे फुलले आहेत. नानाविध रंग आणि रचनांची फुले डंवरली आहेत. त्यांचा सुवास दरवळतो आहे. फुलांचे सजलेले ताटवे पाहून मनास मोहर फुटला आहे. फुलांच्या दर्शनाने आणि ते अंगाखांद्यावर खेळवणार्‍या हिरव्याकंच वनश्रीने मन प्रसन्न होत आहे. प्रफुल्लित मनाने उभारी घेतली आहे.
निसर्गाचा अद्भुत आविष्कार असलेल्या, झाडाझुडपांची अनमोल देणगी असलेल्या या फुलांचा महिमाच मुळी अगाध आहे. देवाच्या मस्तकी, गळ्यात, चरणी भक्तीने मिरवणारी फुले, स्त्रियांच्या केशसंभाराची शोभा वाढवतात. आणि प्रेतेही शृंगारतात. त्यामुळे मनुष्यप्राणाच्या जीवनात फुलांचे स्थान अढळ आहे. फुलांच्या संवर्धनासाठी मोठमोठे बगीचे, उद्याने आपण यासाठीच उभारली आहेत. देशात आणि परदेशात फुलांची उद्याने अर्थात् फ्लॉवर पार्क्स उभारून आपण निसर्गाचे मोठ्या प्रमाणात संवर्धन केले आहे.


मुंबईचे हँगिंग गार्डन, नॅशनल पार्क, राणीचा बाग, हैदराबादची रामोजी सिटी, नाशिकचे फ्लॉवर पार्क आणि नंदनवन असलेले काश्मीर, अशा असंख्य जागी फुलांचे साम्राज्य आहे. आपल्या महाराष्ट्रात तर नाशिक, कास पठार, महाबळेश्‍वर, माथेरान, मावळ प्रांत अशा अनेक ठिकाणी असलेले फुलांचे ताटवे पाहून धरतीवर स्वर्ग निर्माण झाल्याचा भास होतो. परदेशात स्वित्झर्लंड, नेदरलँण्ड जपान आणि रखरखीत वाळवंटातील दुबईमध्ये फुलांचे जे नैसर्गिक व मानवनिर्मित पार्क आहेत, ते पाहून डोळ्याचे पारणे फिटते. या फुलांचे सौंदर्य आणि सुगंध यांचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते.


या फुलांना फुलणे, मोहरणे, निसर्गचक्र चालविणे आणि माणसांना आनंद देणे एवढेच माहीत असते. मग ती उद्यानातील असो वा रस्त्याच्या कडेची असो किंवा रेल्वे मार्गाच्या आजूबाजूची. अशा आडमार्गाला फुलणार्‍या ताटव्यांची कोणी मुद्दाम निगा राखत नाही. तरी पण ते फुलण्याचा आपला धर्म सोडत नाहीत.


हाच धर्म, हेच तत्त्व माणसांनी सदैव आचरणात आणलं तर अवघं जीवन प्रसन्न, मोहरलेलं राहील… आयुष्याची सकाळ फुलांसारखी बहरलेली राहील…