करीना कपूर – सैफ अली खानच्या मुलाचे नाव प...

करीना कपूर – सैफ अली खानच्या मुलाचे नाव परीक्षेत विचारले : पालक झाले नाराज (School Asks Students To Name Kareena Kapoor & Saif Ali Khan’s Son In A Test, Parents React)

मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील एका खासगी शाळेचे एक अजब प्रकरण समोर आले असून, ते आता वादात सापडले आहे. या शाळेत सहावीच्या सामान्य ज्ञानाच्या परीक्षेदरम्यान मुलांना करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांच्या मुलाचे पूर्ण नाव लिहिण्यास सांगितले होते. तैमूरशी संबंधित या बेताल प्रश्नावर मुलांच्या पालकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. परीक्षेत प्रश्न विचारला जावा एवढा तो महान माणूस आहे का?, असे पालकांचे म्हणणे आहे.

Kareena Kapoor

खंडवा येथील अॅकॅडमिक हाईट्स पब्लिक स्कूलमधील हे प्रकरण आहे. येथे शाळेने घेतलेल्या परीक्षेत एक भन्नाट प्रश्न विचारल्याचे समोर आले. हे पाहून मुलांसोबत, पालकही चांगलेच संतापले. हे प्रकरण मीडियात आल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली होती. यावर पालक संघाने तीव्र प्रतिक्रिया दिली असून, एखाद्या महापुरुषांबाबत प्रश्न उपस्थित केला असता तर चालले असते, असे पालकांचे म्हणणे आहे, मात्र हा प्रश्न अत्यंत हास्यास्पद आहे. पालक संघाने याबाबतची तक्रार शिक्षण विभागाकडे केली आहे. त्यानंतर शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याचे कळते.

Kareena Kapoor

यावर पालक संघाचे संरक्षक डॉ. अनिश अरझरे म्हणाले की, “जर शाळेला प्रश्न विचारायचाच होता तर हुतात्मा किंवा महापुरुषांच्या बलिदानाबद्दल किंवा त्यांच्या नावाबद्दल प्रश्न विचारायचा होता. आता चित्रपटातील स्टार मंडळींच्या मुलांची नावंही मुलांनी लक्षात ठेवायची का?” या संपूर्ण प्रकरणावर आणि वादावर जिल्हा शिक्षणाधिकारी संजीवकुमार भालेराव म्हणाले आहेत की, ”पालक आणि शिक्षक संघटनेच्या तक्रारीनंतर शाळेला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली असून, समाधानकारक उत्तर न मिळाल्यास पुढील कठोर कारवाई केली जाईल.” ‘मुलांना राष्ट्रहिताशी निगडित गोष्टी शाळेत शिकवल्या, सांगितल्या गेल्या पाहिजेत,’ असेही भालेराव म्हणाले.