लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ साकारणार अयोध्येती...

लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ साकारणार अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती (Scene of Ram temple in Ayodhya in Ganeshotsav Mandal of Lalbaugcha Raja)

मुंबईसह देशविदेशातील गणेश भक्तांचे श्रध्दास्थान आणि नवसाला पावणारा गणपती अशी लालबागच्या राजाची ख्याती आहे. लालबागच्या राजाची प्रसन्न मूर्ती हे नेहमीच सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरते. यंदाचे लालबागच्या राजाचे हे ८९ वे वर्ष आहे. यंदा लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती (Ram Temple in Ayodhya) साकारली आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Chandrakant Desai) यांनी ही कलाकृती साकारली आहे.

भक्तांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन मोजक्या दिवसांवर येऊन ठेपले आहे. 31 ऑगस्ट रोजी श्री गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) आहे. दरवर्षी गणेशभक्तांमध्ये गणेशोत्सवाचा एक वेगळाच आनंद असतो. त्यानुसार भक्तांकडून जोरदार तयारी सुरू आहे. अशातच मुंबईतील प्रसिद्ध मंडळापैकी एक असलेल्या लालबागच्या राजाचे (Lalbaugcha Raja) विशेष महत्त्व आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागची ओळख असून कोट्यावधी भाविकांची राजावर श्रद्धा आहे. श्रध्देसह या ठिकाणाचा देखावा बघण्यासाठी दरवर्षी भाविकांची मोठी गर्दी होते. त्यानुसार लालबागच्या राजाच्या आगमनाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे.

यंदा लालबागचा राजा मंडळाने अयोध्येतील राम मंदिराच्या थीमवर आधारीत देखावा साकारला आहे. मंडळाच्या प्रवेशद्वारावरच राममंदीराची प्रतिकृती आणि प्रभु श्रीरामाची प्रतिमा आहे. तर मुख्य मूर्ती स्थापनेच्या ठिकाणी राम मंदिराच्या घुमटाची प्रतिकृती आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्याकडून ही कलाकृती साकारण्यात आली आहे. यामुळे ही कलाकृती भव्य आणि आकर्षक असणार यात शंका नाही.

दोन वर्षानंतर लालबागचे होणार जवळून दर्शन

कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षापासून सर्व सणांवर निर्बंध होते. त्यामुळे कोरोना काळात गणेश भक्तांना ऑनलाईन दर्शनाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली होती. मात्र यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व सण व उत्सव धुमधडाक्यात साजरे करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे तब्बल दोन वर्षानंतर भक्तांना लालबागच्या राजाचे लालबाग येथे जाऊन दर्शन घेता येणार आहे. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी होत असते. ही बाब लक्षात घेता सुविधा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने दरवर्षी विशेष उपाययोजना करण्यात येतात. दर्शनासाठी भाविक तासन्‌तास रांगेत उभं राहून दर्शन घेतात.