इंडियाज बेस्ट डान्सर स्पर्धेची विजेता ठरली सौम्...

इंडियाज बेस्ट डान्सर स्पर्धेची विजेता ठरली सौम्या कांबळे : मिळाले १५ लाख रुपये आणि कार (Saumya Kamble Wins India’s Best Dancer Season 2)

सोनीवर ‘इंडियाज बेस्ट डान्सर सिझन २’ चा अंतिम सोहळा नुकताच पार पडला. या शोला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण पाच स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले होते आणि त्यांच्यामधून एकाची इंडियाज बेस्ट डान्सर म्हणून निवड करण्यात आली. मराठमोळ्या सौम्या कांबळेनं ‘इंडियाज बेस्ट डान्सर’चा किताब पटकावला आहे. सौम्या कांबळे, जमृद, रोजा राना, रिक्तम ठाकुरिया आणि गौरव सरवन हे पाच जण अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते. त्यांच्यामध्ये ट्रॉफी मिळवण्यासाठी तीव्र चुरस रंगली होती. अंतिम सोहळ्यात या पाचही स्पर्धकांनी एकापेक्षा एक धमाकेदार परफॉर्मन्स सादर केले. या शोचे परीक्षक मलायका अरोरा, टेरेन्स लुईस आणि गीता कपूर हे होते.

सौम्याला बक्षिस म्हणून १५ लाख रुपयांचा धनादेश आणि एक आलिशान कार मिळाली. या सिझनमध्ये सौम्याला प्रशिक्षण देणारी कोरिओग्राफर वर्तिका झा हिलादेखील सन्मानित करण्यात आलं होतं. वर्तिकाला ५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. पहिल्या सिझनमध्ये वर्तिकानं टायगर पॉपला प्रशिक्षण दिलं होतं. त्यानंसुद्धा ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं. त्यामुळे कोरिओग्राफर म्हणून वर्तिकाचा हा सलग दुसरा विजय आहे. जयपूरचा गौरव सरवन उपविजेता ठरला तर ओडिशाची रोजा राणा तिसऱ्या क्रमांकावर होती. अंतिम फेरीत पोहोचलेल्या सर्व स्पर्धकांना १ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

सौम्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता कारण तिच्या वडिलांची इच्छा होती की तिने डॉक्टर व्हावे आणि ते तिच्या डान्स करण्याच्या विरोधात होते. पण आपल्या मुलीची आवड आणि प्रतिभा पाहून शेवटी त्यांनी तिला पाठिंबा द्यायला सुरुवात केली आणि सौम्यासाठी आता त्यांनी डान्स स्टुडिओ देखील उघडला आहे. सौम्यानेही आपल्या वडिलांना निराश केले नाही आणि हे विजेतेपद मिळवून त्यांची मान अभिमानाने उंचावली आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम /सोनी टी. व्ही.