भारताच्या सरगम कौशलने २१ वर्षांनंतर ‘मिसेस वर्ल...

भारताच्या सरगम कौशलने २१ वर्षांनंतर ‘मिसेस वर्ल्ड २०२२’चा किताब जिंकून इतिहास घडवला (Sargam Kaushal Won Mrs World Title Post 21 Years India Once Again Bring Home Crown)

भारताच्या सरगम ​​कौशलने अमेरिकेत आयोजित मिसेस वर्ल्ड २०२२ चे विजेतेपद जिंकून इतिहास रचला आहे. सरगमने २१ वर्षांनंतर हा मुकुट भारतात आणला आहे. त्यामुळे सरगमवर खूप सारं प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

२१ वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतीय तरुणी सरगम कौशलने मिसेस वर्ल्ड विजेतेपद पटकावले आहे. २००१ मध्ये, अभिनेत्री-मॉडेल आदिती गोवित्रीकरने हे विजेतेपद पटकावले होते. मिसेस वर्ल्ड २०२२ कार्यक्रम शनिवारी वेस्टगेट लास वेगास रिसॉर्ट आणि कॅसिनो येथे आयोजित करण्यात आला होता. अमेरिकेच्या मिसेस वर्ल्ड शायलिन फोर्ड यांच्या हस्ते सरगम ​​कौशलचा मुकुट घातला गेला. तेव्हा सरगम कौशल मंचावर भावूक झाली होती. सोशल मीडियावर सरगमचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

या स्पर्धेच्या अंतिम फेरीत बॉलिवूडमधल्या मोठमोठ्या कलाकारांनीही हजेरी लावली होती. मिसेस वर्ल्ड २०२२चं मुकूट परिधान केल्यावर सरगमला सेलिब्रिटींकडून शुभेच्छा मिळू लागल्या. अदिती गोवित्रीकर, सोहा अली खान, विवेक ओबेरॉय आणि मोहम्मद अजहरुद्दीन यांनी सरगमचं कौतुक केलं.

‘या प्रवासाचा एक भाग बनल्याबद्दल मी खूप आनंदी आहे. २१ वर्षांनंतर भारतात हा किताब परतला. तुला मनापासून शुभेच्छा’, असं अदिती गोवित्रीकरने लिहिलं. २००१ मध्ये अदिती गोवित्रीकरने मिसेस वर्ल्डचा किताब जिंकत भारताची मान उंचावली होती.

मिसेस वर्ल्डचा किताब जिंकून जगभरात भारताची मान उंचावणारी सरगम कौशल ही मूळची जम्मू-काश्मीरची आहे. ती शिक्षिका आणि मॉडेल आहे. २०१८ मध्ये सरगमचं लग्न झालं. लग्नानंतर तिला सौंदर्यस्पर्धेत भाग घेण्याची फार इच्छा होती.

आत्मविश्वास आणि सौंदर्याच्या जोरावर अमेरिकेच्या लाग वेगासमध्ये पोहोचलेली सरगम ही मिसेस वर्ल्डचा किताब जिंकूनच भारतात परतली. सरगमने याआधी मिसेस इंडिया २०२२ चा किताबही आपल्या नावे केला होता.