हंसल मेहता बनवणार प्रसिद्ध शेफ संजीव कपूरवर ...

हंसल मेहता बनवणार प्रसिद्ध शेफ संजीव कपूरवर ‘बायोपिक’ (Sanjeev Kapoor Famous Chef Now Scam 1992 Director Hansal Mehta Made On Biopic)

हर्षद मेहतावर आधारित वेबसीरिजची निर्मिती करणारे हंसल मेहता (Hansal Mehta) आता प्रसिद्ध शेफ संजीव कपूर (Sanjeev Kapoor)  यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. मुंबईमधील एका कार्यक्रमामध्ये हंसल मेहता यांनी या बायोपिकची घोषणा केली.  संजीव कपूर हे टीव्ही मनोरंजनाच्या दुनियेत नेहमीच लोकप्रिय राहिले आहे. त्यांच्या खाना खजाना नावाच्या मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. ९०च्या दशकांत फुड रेसिपीविषयीच्या कार्यक्रमांना मोठं ग्लॅमर मिळवून देण्याचे काम त्यांनी केले होते.

२०१३ मध्ये आलेल्या त्यांच्या खाना खजाना या शो ने तुफान लोकप्रियता मिळवली होती. महिला वर्गामध्ये देखील त्याचे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले होते. त्यामुळे जवळपास प्रत्येकाला संजीव कपूर यांचे नाव माहिती आहे. आता त्यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक निर्मिती केली जाणार असल्याचे कळताच चाहत्यांमध्ये आनंद आहे.

हंसल मेहता यांनी या बायोपिकची घोषणा केल्यानंतर संजीव कपूर म्हणाले, खरं तर मी बायोपिकसाठी तयार नव्हतो. अजुन मला खूप काही करायचे आहे. त्याच्या अगोदरच बायोपिक ही जरा वेगळी गोष्ट वाटते.

प्रेक्षकांकडून मिळालेले प्रेम आणि त्यांचा प्रतिसाद या जोरावर पाककलेला मोठी प्रसिद्धी मिळाली. त्याचे श्रेय हे प्रेक्षकांनाच जाते. आता बायोपिकच्या माध्यमातून एक वेगळा प्रवास आपल्यासमोर येईल. त्यालाही तुमचा मोठा प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. माझ्या बायोपिकची निर्मिती हंसल मेहता करणार आहे. त्यांच्याविषयी एक गोष्ट मला सांगायची आहे. ती म्हणजे फार पूर्वीपासून ते मला बायोपिक करण्याविषयी सांगत आहे. हंसल मेहता हे पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी माझ्या आयुष्यावर बायोपिकची निर्मिती होऊ शकते असे मला सांगितले. त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास असून मी देखील माझ्या बायोपिकसाठी उत्सुक आहे.

फार पूर्वी जेव्हा संजीव कपूर हे त्यांच्या खाना खजाना नावाच्या शो मधून समोर आले तेव्हा त्या शो चे दिग्दर्शन देखील हंसल मेहता यांनीच केले होते. अद्याप त्यांची भूमिका कोण करणार याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.