संजय नार्वेकरचे मालिकेत पदा...

संजय नार्वेकरचे मालिकेत पदार्पण (Sanjay Narvekar Excels In T.V. Serial)

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत नाटक आणि चित्रपटांतून विविधांगी भूमिका साकारणारा अभिनेता संजय नार्वेकर बऱ्याच काळानंतर छोट्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालाय. ‘वास्तव’ या हिंदी चित्रपटातील ‘देढ फुट्या’ या पात्राने संजयला बरीच लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर त्याने अनेक हिंदी – मराठी चित्रपटांतून काम केले आहे. संजयचे मराठीतील अगं बाई अरेच्चा, खबरदार, जबरदस्त, चेकमेट असे अनेक चित्रपट यशस्वी ठरले आहेत. नाटक हे संजयचं पहिलं प्रेम आहे. ‘ऑल दि बेस्ट’ हे नाटक संजयसाठी टर्निंग पॉइंट ठरले. त्यानंतर सिनेमा असो वा नाटक आपल्या भारदस्त अभिनयाने संजय नार्वेकरने मराठी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आणि आता बऱ्याच वर्षांनंतर संजय मालिका विश्वात पदार्पण करणार आहे.

संजय नार्वेकर आता ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ या मालिकेत इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. स्टार प्रवाहवरील ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली असतानाच लवकरच या मालिकेत इन्सपेक्टर गौतम साळवी यांच्या रुपात सुप्रसिद्ध अभिनेते संजय नार्वेकर यांची एण्ट्री होणार आहे.

या मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना संजय नार्वेकर म्हणाले, ‘नाटक आणि सिनेमामध्ये प्रेक्षकांनी मला पाहिलं आहे. मालिकेसाठी बराच वेळ द्यावा लागतो. सिनेमा आणि नाटक सुरु असल्यामुळे मला तो वेळ मालिकेसाठी देता आला नाही. मात्र आता सुवर्णयोग जुळून आलाय. व्यक्तिरेखा खूप छान आहे आणि वेळेचं गणितही जमून आलं आहे. कोणतंही पात्र साकारताना त्याला वेळ आणि योग्य न्याय देता आला पाहिजे असं मला वाटतं. इन्सपेक्टर गौतम साळवी हा एक डॅशिंग, जबाबदार आणि प्रामाणिक पोलिस अधिकारी आहे. पोलीस डिपार्टमेंटमध्ये त्याची जबरदस्त चर्चा आहे. मिश्किल आणि जिंदादील स्वभावाचा असा हा प्रामाणिक पोलिस अधिकारी. प्रत्येक गोष्टीचा ते बारकाईने आणि खोलात जाऊन अभ्यास करतात. पंचतंत्राच्या गोष्टींचा दाखला देत ते बोलतात. कितीही गंभीर केस असली तरी गौतमच्या सहवासात त्यांचं ओझं जाणवत नाही. माझ्या पद्धतीने मी या पात्रात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न करतो आहे अशी भावना संजय नार्वेकर यांनी व्यक्त केली.’

गौतम साळवीच्या येण्याने मालिकेत नेमका काय धमाका होतो याची गोष्ट मालिकेतूनच उलगडेल.