तुमची मुलगी काय करते मधून संजय मोने खूप वर्षांन...

तुमची मुलगी काय करते मधून संजय मोने खूप वर्षांनी छोट्या पडद्यावर (Sanjay Mone To Appear On Small Screen After A Long Break)

सासू-सून मालिकांची परंपरागत चौकट मोडत वेगळा विषय ‘तुमची मुलगी काय करते’ या मालिकेतून हाताळण्यात आला आहे. त्यामुळे ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. सध्या ही मालिका अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत श्रद्धा आणि अभय मिरजकर यांची मुलगी सावनी अनेक दिवसांपासून बेपत्ता झालेली आहे. हरएक प्रकारे श्रद्धा तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु तिला अद्याप यश आलेलं नाही. आता या मालिकेत अभिनेते संजय मोने यांची एंट्री होणार आहे. त्यामुळे मालिकेचं कथानक आणखी वेगळ्या वळणावर जाणार आहे.

मालिकेत व्यवसायानं शिक्षिका असलेली श्रद्धा मिरजकर हिची मुलगी सावनी मिरजकर अनेक दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. आपल्या लेकीचा शोध घेण्याचा कसोशीनं प्रयत्न श्रद्धा करत आहे. सावनीचा शोध घेत असताना श्रद्धा ड्रग रॅकेट चालवणाऱ्या ताईच्या संपर्कात येतं. ही ताई श्रद्धाला तिची मुलगी शोधून देण्याचं आश्वासन देते परंतु त्या बदल्यात ड्रग्जच्या धंद्यात तिला मदत करायला ती सांगते. परंतु श्रद्धा युक्ती करत ताईला पोलिसांच्या हवाली करते. श्रद्धानं गद्दारी केल्याचं ताईच्या लक्षात येतं. त्यामुळे ही ताई आता श्रद्धाच्या जीवावर उठली आहे. या ताईपासून श्रद्धाला वाचवण्यासाठी व्यकंट सावंत या पात्राचा मालिकेत प्रवेश होणार आहे.

व्यकंट सावंत हे श्रद्धाचे वडील आहेत. परंतु ते गुन्हेगारी वृत्तीचे असल्यानं श्रद्धा त्यांचा तिरस्कार करत असते. आता तेच तिच्या मदतीला येणार आहेत. श्रद्धा त्यांची मदत घेणार की नाकारणार, सावनीचा शोध घेण्यात व्यकंट सावंत श्रद्धाला मदत करणार का हे मालिकेच्या आगामी भागांतून प्रेक्षकांना कळणार आहे.

‘तुमची मुलगी काय करते’ या मालिकेत व्यंकट सावंत ही भूमिका संजय मोने साकारणार आहेत. या मालिकेतून संजय मोने प्रदीर्घ काळानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही मोनेंना पाहण्याची उत्सुकता आहे.