संजय दत्तने व्यक्त केली आपल्यावर उपचार करणाऱ्या...

संजय दत्तने व्यक्त केली आपल्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांविषयी कृतज्ञता (Sanjay Dutt Expressed His Gratitude Towards The Doctor Who Treated Him For Cancer)

संजय दत्तचे कॅन्सरशी जवळचे नाते ठरले आहे. त्याची आई, एकेकाळची लोकप्रिय अभिनेत्री व खासदार नर्गिस दत्त आणि त्याची आधीची पत्नी रिचा शर्मा या दोघींचा कॅन्सरने मृत्यू झाला होता. त्यामुळे संजूबाबाला २०२० मध्ये कॅन्सरचे निदान झाले, तेव्हा तो खूपच खचून गेला होता. त्याला फुप्फुसाचा कॅन्सर झाला होता. मात्र या जीवघेण्या रोगाशी लढा देऊन, त्याने त्यावर मात केली. आपल्या रोगावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांविषयी संजय दत्तने प्रथमच जाहिररित्या कृतज्ञता व्यक्त केली आहे.

सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलने कार्किनॉस हेल्थकेअर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्लोबल टाऊन हॉलचे आयोजन केले होते. या समारंभात संजय दत्त आपली बहीण व माजी खासदार प्रियंका दत्त हिच्यासह हजर झाला होता. सदर हॉस्पिटलच्या डायरेक्टर, प्रेसिजन ऑन्कॉलॉजी डॉ. सेवंती लिमये यांनी संजयच्या कॅन्सरवर उपचार केले होते.

त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना संजूबाबा म्हणाला, “मी रील लाईफ हिरो आहे, (पडद्यावरचा नायक) पण डॉ. सेवंती लिमये या माझ्या खऱ्या आयुष्यातील हिरो आहेत. त्या मुन्नाभाई एमबीबीएस सारख्या आहेत. कॅन्सरशी लढायला मदत करणाऱ्या, त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांसाठी मी सेवंतीजी आणि त्यांच्या टीमचे आभार मानू तितके कमी आहेत.”

देशातील पहिला प्रेसिजीन नेव्हीगेशन प्रोग्राम सुरू केल्याबद्दल सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलचे सी.ई.ओ. डॉ. तरंग ग्यानचंदानी म्हणाल्या , “या प्रेसीजीन संकल्पनेसाठी आम्ही कटीबद्ध आहोत. देशातील कर्करोग उपचार आणि संशोधनाचा स्तर उंचावेल, अशी आम्हाला आशा आहे.”