सलमान खान करणार मराठी बिग बॉस मध्ये धमाकेदार एन...

सलमान खान करणार मराठी बिग बॉस मध्ये धमाकेदार एन्ट्री (Salman Khan To Appear In Marathi Big Boss With A Bang)

‘बिग बॉस मराठी ३’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. कार्यक्रमाबरोबरच शनिवारी आणि रविवारी रंगणाऱ्या चावडीची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. येत्या शनिवारी रंगणाऱ्या बिग बॉसच्या चावडीवर प्रेक्षकांबरोबरच घरातील स्पर्धकांना एक मोठं सप्राईज मिळणार आहे. कारण आपल्या सगळ्यांचा लाडका, यारो का यार बॉलीवूडचा भाईजान आणि हिंदी बिग बॉसचा सूत्रसंचालक सलमान खान बिग बॉस मराठीच्या मंचावर येणार आहे… बिग बॉस मराठीच्या सेटवर सलमान खानची धम्माकेदार एन्ट्री होणार आहे…

बिग बॉस मराठी कार्यक्रमाच्या आतापर्यंत झालेल्या दोन्ही पर्वामध्ये सलमानने हजेरी लावली होती. त्यामुळे यंदाच्या पर्वातही तो नक्की येणार अशी प्रेक्षकांना खात्री होती. त्यामुळे सलमान कधी बिग बॉस मराठी ३ च्या चावडीवर येतो याची घरातील स्पर्धक आणि प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. आता येत्या आठवड्या अखेरीस प्रसारित होणाऱ्या भागात सलमान खान सहभागी होणार आहे. म्हणजेच त्याच्या उपस्थितीत या आठवड्याची बिग बॉसची चावडी रंगणार आहे.

कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी सलमान सहभागी झालेल्या चावडीचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच शिगेला पोहोचली. या प्रोमोमध्ये सलमान अस्खलित मराठीतून बोलताना दिसत आहे. याचा अर्थ सलमान खान चावडीवर देखील स्पर्धकांसोबत मराठीतून संवाद साधणार आहे.

प्रोमोमध्ये महेश मांजरेकर सांगतात की, ‘आपल्या चावडीवर येणार आहे एक खास पाहुणा.’ त्यानंतर सलमानची एण्ट्री होते. एण्ट्री केल्यानंतर सलमान म्हणतो की, ‘मी येतोय बिग बॉस मराठीच्या चावडीवर’. तो पुढे म्हणतो की, ‘ओ भाऊ जरा चावडीवर या.’

दरम्यान, गेल्याच आठवड्यामध्ये बिग बॉस हिंदीच्या विकेंड का वारमध्ये महेश मांजरेकर यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी बिग बॉसच्या घरातील काही स्पर्धकांची चांगलीच झाडाझडती घेतली होती. आता सलमान खान मराठी बिग बॉस कार्यक्रमात सहभागी होणार आहे. तो बिग बॉसच्या चावडीवर येऊन घरातील कोणत्या स्पर्धकाची हजेरी घेणार, याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे.

सलमान खान आणि महेश मांजरेकर हे दोघे बिग बॉस सारख्या अतिशय लोकप्रिय शोचे सूत्रसंचालक असले तरी ते एकमेकांचे चांगले मित्रही आहेत. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट नुकताच प्रदर्शित झालेला आहे, ज्यामध्ये सलमान खान नायक आहे. चित्रपटात सलमान खान सरदार असून एका पोलिसाच्या भूमिकेत आहे.