सलमानने कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर मध्ये केली ...

सलमानने कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर मध्ये केली समेट : कपिल शर्मा शोमध्ये सुनील परत येणार (Salman Khan Resolves Differences Between Kapil Sharma And Sunil Grover, Sunil To Make A Comeback On The Show)

प्रसिद्ध कॉमेडियन सुनील ग्रोवरच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. ‘द कपिल शर्मा शो’ च्या आगामी सिझनमध्ये सुनीलचा पुन्हा प्रवेश होणार आहे. असं म्हणतात की, सलमान खानने सुनील ग्रोवर आणि कपिल शर्मा यांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करून, त्यास पुन्हा या शोमध्ये येण्यासाठी तयार केले आहे.

सलमान खान या शोचे निर्माते- दिग्दर्शक आहेत हे खूप कमी जणांना माहीत आहे. सलमान स्वतः सुनीलच्या कॉमेडी स्टाइलचे फॅन असून शोमध्ये सुनीलच्या असण्याने शोला नक्की यश मिळणार अशी त्यांना खात्री आहे. म्हणूनच आपल्या आवडत्या सुनीलने शोमध्ये परत यावे अशी सलमान यांची इच्छा आहे.

मीडियाच्या अहवालानुसार सलमान खानने याबाबत सुनील ग्रोवर यांच्याशी बातचितही केली आहे. एवढंच नाही तर त्यांनी या दोघांशी बोलून त्यांच्यात समेट घडवून सुनीलला शोमध्ये परत येण्यास तयारही केले आहे. काही दिवसांपूर्वी कपिल शर्मांचे मेकअप आर्टिस्ट यांनी सुनील ग्रोवरसोबत फेसबुकवर फोटो शेअर केला होता, तो पाहून सुनील ग्रोवर परत येत असल्याचे अंदाज लावले गेले होते.

द कपिल शर्मा शोच्या मेकर्सना देखील या शोच्या तिसऱ्या सीझनमध्ये सुनीलची उपस्थिती हवी आहे आणि सुनीलशी बोलून त्यांना शोमध्ये परत आणण्याच्या प्रयत्नात असतानाच सलमानने त्यांचे काम सोपे केले आहे. तरीही अजूनपर्यंत सुनील ग्रोवर यांच्याकडून मी परत या शोमध्ये येत आहे, अशी पुष्टी आलेली नाही. तसेच मेकर्सनीदेखील अशाप्रकारची घोषणा केलेली नाही. परंतु या शोचे चाहते मात्र कपिल आणि सुनील यांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

अलिकडेच ‘द कपिल शर्मा’ शो काही महिने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला होता. कारण या शोचे सुत्रधार कपिल शर्मा यांनी पॅटरनिटी ब्रेक घेतला आहे. १ फेब्रुवारीला त्यांची पत्नी गिन्नीने एका मुलाला जन्म दिला आहे आणि त्यामुळे कपिल सध्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. आता तीन महिन्यानंतरच मेकर्स हा शो नव्या अंदाजात व नव्या जोमाने सादर करणार असल्याचे समजते. त्यात सुनील ग्रोवर यांची उपस्थिती असली तर मग मनोरंजनाचा डबल धमाका असणार हे निश्चित.

काही वर्षांपुर्वी कपिलसोबत झालेल्या भांडणानंतर सुनीलने हा शो सोडला होता. कपिलची टीम ऑस्टेलियाहून एक शो करून भारतात परतत होती. त्यावेळेस सुनील आणि कपिल यांच्यामध्ये फ्लाइटमध्येच खाण्यावरून भांडण सुरू झाले. हे भांडण इतके वाढले की शिव्यांवर आले आणि मग कपिलने सुनीलला चप्पल फेकून मारले. असं म्हणतात की त्यावेळेस कपिल नशेमध्ये होता. नशेमध्ये कपिलने सुनीलची कॉलर पकडली आणि सगळ्यांचं करिअर संपवून टाकेन, सगळ्यांना शोमधून काढून टाकेन, अशी धमकीही दिली. या भांडणामुळे सुनील ग्रोवर, चंदन प्रभाकर,अली असगरसह अनेक कलाकारांनी स्वतःहून हा शो सोडला होता. नंतर कपिलने सुनीलची माफी मागितली, परंतु सुनीलने या शोपासून दूर राहणेच पसंत केले.

कपिल आणि सुनील या जोडगोळीने अलग व्हावे हे त्यांच्या प्रशंसकांना तेव्हाही फारसे पटले नव्हते. शोमधील सुनीलची कॉमेडी त्यांनी नेहमी मिस केली. परंतु आता दोघांमध्ये समेट झाली आहे आणि कपिल शर्मा शोच्या तिसऱ्या सीझनमध्ये दोघे मिळून लोकांना हसवणार आहेत.