राखी सावंतला अपमानास्पद वर्तणूक दिल्यावरून सलमा...
राखी सावंतला अपमानास्पद वर्तणूक दिल्यावरून सलमान खान, रितेशवर जाम भडकला (Salman Khan Got Angry With Ritesh For Misbehaving With Rakhi Sawant)

ग्लॅमर इंडस्ट्रीमधील ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) पती रितेशसोबत सध्या बिग बॉस १५ (Big Boss 15) या शोमध्ये दिसत आहे. या दोघांच्या येण्याने शोचा टीआरपी वाढेल, या जोडप्याच्या केमिस्ट्रीची खूप चर्चा होईल असे वाटले होते परंतु, प्रत्यक्षात त्यांच्यामध्ये अजिबात ट्युनिंग दिसत नाही. राखीने रितेशबद्दल ओढ आणि आपुलकी दाखवली असली तरी रितेश तिच्याशी गैरवर्तन करताना दिसत आहे. रितेशच्या अशा असभ्य वर्तणूकीमुळे सलमान त्याच्यावर जाम भडकला असून त्याने रितेशला चांगलेच खडसावले आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी राखी सावंत दिसताना जरी बिनधास्त आणि दिलखुलास वाटली तरी तिचं वैवाहिक जीवन फारस सुखाचं नाही. त्यामुळे आतून ती दुःखी असल्याचे जाणवते. बिग बॉसच्या घरामध्ये तिचा पती तिच्या सोबत असूनही राखीच्या चेहऱ्यावरील दुःख, उदासपणा स्पष्टपणे दिसतोय. याच शोमध्ये रितेशने आपल्याशी बोलावे यासाठी राखी त्याची मनधरणी करताना आपण पाहिले परंतु रितेशने तिला जराही भाव दिला नाही. याउलट सतत सगळ्यांदेखत तो तिचा अपमान करतानाच दिसला आहे. त्याची तिच्यासोबतची वर्तणूक पाहता सगळ्यांनाच असा प्रश्न पडलाय की राखीसारखी बिनधास्त मुलगी अशा माणसाला का सहन करतेय?

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
दरम्यान वीकेंड का वार च्या आगामी एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे, ज्यात सलमान खान राखीसोबत असभ्य वर्तणूक करणाऱ्या तिच्या पतीला चांगलाच फटकारताना दिसत आहे. सलमानने रितेशची कानउघडणी करताना म्हटलंय की, मोठ-मोठे लोकही आपल्या पत्नीसह अशाप्रकारे बोलत नाहीत ज्या पद्धतीने तू बोलत आहेस. हा सभ्यपणा आहे का? तू कोण आहेस? राखीमुळे तू या शोमध्ये आला आहेस. तुला आधी कोण ओळखत होतं? संपूर्ण देश तुला फक्त राखीमुळे ओळखतो. असं दरडावत यापूढे तू राखीशी असभ्यपणे बोललेलं खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा त्याने रितेशला दिला आहे.
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
इतकेच नाही तर सलमान खान राखीलाही, तुला हे सर्व सहन करण्याची गरज नाही, तू हे का सहन करतेस, तू राखी सावंत आहेस, असे कडक शब्दांत सुनावतो. यावर राखीने सलमान खानला म्हणते की, मी असे करत नाही कारण तो पुन्हा मला सोडून कायमचा निघून जाईल. यावर सलमान खान लगेच हो, मग जाऊ दे, असे म्हणतो.

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम
याआधी कलर्सने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यात राखी तिच्या पतीला रितेशला असं म्हणतेय की, तू मला झिडकारतोस, माझ्याकडे दुर्लक्ष करतोस तरी मी तुझ्यासाठी पझेसिव्ह आहे. मला पाहायचंय तू माझ्यापासून किती काळ दूर राहतोस. राखीचे हे बोलणे ऐकून रितेश तिला, तू माझी डोकेदुखी बनू नकोस… तुझ्या जवळ बसणे व्यर्थ आहे, असे म्हणतो. यानंतर राखी तेजस्वीला तिची व्यथा सांगते आणि म्हणते की, असा पती असण्यापेक्षा माणसानं एकट्यानेच जगलेलं बरं.

मागील आठवड्यात फराह खानने देखील राखीला पतीचा छळ सहन करू नकोस असं बजावलं होतं. परंतु, तिच्या वागण्यात काहीच बदल झाला नाही. राखी पती म्हणून त्याच्या सर्व करतुदी सहन करत राहिली. आता सलमानने तिच्या पतीलाच दम मारला आहे. पाहुया सलमानच्या रागाचा रितेशवर कितपत परिणाम होतोय ते.