सलमानचा बॉडी डबल सागर पांडेचा हार्ट अटॅकने मृत्...

सलमानचा बॉडी डबल सागर पांडेचा हार्ट अटॅकने मृत्यू, अभिनेत्याने भावनिक नोट लिहून मानले आभार (Salman Khan gets emotional on the death of body double Sagar Pandey, says ‘Thank you from heart’)

अनेक कलाकारांच्या करीअरमध्ये बॉडी डबल्स महत्त्वाची भूमिका बजावतात. अनेक अभिनेत्यांचे सीन, स्टंट आणि अॅक्शन सीन त्यांच्या बॉडी डबलकडून केले जातात. सागर पांडे हा सलमान खानचा बॉडी डबल होता. पण याच सागर पांडेचे निधन झाले आहे. शुक्रवारी दुपारी जीममध्ये कार्डिओ करत असताना तो बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे म्हटले जाते. सागर पांडेचे वय ४५ ते ५० दरम्यान होते.

सागरने अनेक चित्रपटांमध्ये सलमानसाठी बॉडी डबल म्हणून काम केले होते.त्याला सलमानचा डुप्लिकेटही म्हटले जायचे. सागर पांडेच्या मृत्यूने सलमान खानलाही धक्का बसला असून त्याने आता सोशल मीडियावर आपल्या बॉडी डबलच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

सोशल मीडियावर सलमान खानने सागर पांडेसोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यावर RIP लिहिले आहे. यासोबतच सलमानने कॅप्शनमध्ये एक भावनिक नोट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने लिहिले आहे- ‘माझ्यासोबत राहण्यासाठी मनापासून धन्यवाद. सागर तुझ्या आत्म्याला शांती लाभो. धन्यवाद #RIP #सागरपांडे.’

सागर पांडे हा मूळचा उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यात राहणार होता. अभिनेता होण्यासाठी तो मुंबईत आला, पण जेव्हा त्याला अभिनयात संधी मिळाली नाही तेव्हा त्याने बॉडी डबल होण्याचा निर्णय घेतला. ‘कुछ कुछ होता है’मध्ये सागरने पहिल्यांदाच सलमान खानची बॉडी डबल म्हणून काम केले होते. यानंतर त्याने ‘बजरंगी भाई जान’, ‘ट्यूबलाइट’, ‘दबंग’, ‘दबंग 2’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये सलमानच्या बॉडी डबलचे काम केले होते.