‘सैराट’वाली रिंकू प्रेमरंगात ( R...

‘सैराट’वाली रिंकू प्रेमरंगात ( ‘Sairaat’ Fame Rinku In New Love Story)

आपल्या पदार्पणातच रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलेली सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू आता प्रेमाचा आठवा रंग दाखवणार आहे. रिंकूच्या आगामी ‘आठवा रंग प्रेमाचा’ या चित्रपटाचे शीर्षक नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे.
‘आठवा रंग प्रेमाचा’ मध्ये रोमांसमधील थ्रिलर पाहावयास मिळणार आहे. या चित्रपटातील रिंकूची भूमिका ही वेगळी आणि आव्हानात्मक असणार आहे. चित्रपटात रिंकू सोबत मकरंद देशपांडे आणि विशाल आनंदही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. विशालचा हा पहिलाच चित्रपट आहे.

रिंकू सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून, ती चाहत्यांशी संवाद साधत असते. सोशल मीडियावर ‘आठवा रंग प्रेमाचा’ या चित्रपटाचं शीर्षक लाँच झाल्यानंतर तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाबद्दल सांगताना,
खरा जबाबदार
तितकाच खबरदार
आठवा रंग प्रेमाचा
देखणा-रुबाबदार!
या ओळी लिहिल्या आहेत.

आदिनाथ पिक्चर्स, राकेश राऊत प्रॉडक्शन्स आणि टॉप अँगल प्रॉडक्शननं ‘आठवा रंग प्रेमाचा’ या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. तर एए फिल्म्स हा चित्रपट वितरित करणार आहे. समीर कर्णिक, राकेश राऊत आणि आशिष भालेराव या चित्रपटाचे निर्माते आहेत, तर दिग्दर्शन खुशबू सिन्हा यांचे असून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.
रिंकूचा सैराट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. या चित्रपटामुळे तिचे फॉलोअर्सही वाढले असून ते तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहेत. लवकरच त्यांची ही प्रतिक्षा संपणार आहे. रिंकूचा आठवा रंग प्रेमाचा लवकरच प्रदर्शित होईल. याशिवाय नागरज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटाद्वारे रिंकू लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे