सई मांजरेकरला वडिल महेश मांजरेकरांमुळे करावे ला...

सई मांजरेकरला वडिल महेश मांजरेकरांमुळे करावे लागते अधिकचे काम (Sai Manjrekar Has To Do Extra Work Because Of Father)

मोठा पडदा गाजवणाऱ्या अनेक कलाकारांची मूलं आता इंडस्ट्रीत पदार्पण करत आहे. अभिनेत्री सारा अली खान, अनन्या पांडे, जान्हवी कपूर यांच्या पंगतीत आता मराठमोळे अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची लेक सई मांजरेकर देखील आली आहे. सई सध्या बॉलिवूडपासून ते साऊथ इंडस्ट्रीपर्यंत नाव कमावण्याचा अतोनात प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. एरवी कोणताही स्टार किड असल्यावर सहज बोलले जाते की, याला याच्या पालकांच्या वशील्यामुळे काम मिळाले किंवा याचे आई-वडील इंडस्ट्रीमधले मोठे आसामी आहेत त्यामुळे यांना सहज काम मिळते. पण सईच्या मते तसे नाही, ती एक स्टार किड असल्यामुळे तिला जास्त काम करावे लागत आहे.

सध्या फिल्म इंडस्ट्रीत अनेक स्टार किडस् काम करत आहे. त्यातील काही हिट झाले तर काही फ्लॉप. सई मांजरेकरबद्दल बोलायचे झाल्यास तिचे करियर अजून फारच छोटे आहे. त्यात तिला इंडस्ट्रीत स्पर्धा तगडी असल्यामुळे भरपूर मेहनत करावी लागणार असे दिसते. एका मुलाखतीत सईने सांगितले होते की, तिच्यावर स्टार कीड असल्याचा कोणत्याही प्रकारे दबाव नाही,  पण त्याचा फायदाही नाही. ती स्वत:ला सिद्ध करण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. त्यासाठी ती अधिकचे कामही करत आहे.

प्रत्येक मुलाचे स्वप्न असते की, त्यांनी केलेले काम पाहून त्यांच्या आईवडीलांना अभिमान वाटावा. अगदी तसेच तिने केलेल्या कामामुळे इंडस्ट्रीत तिच्या वडीलांचे नाव आणखी मोठे व्हावे असे सईचे स्वप्न आहे. महेश मांजरेकर यांनी मराठी इंडस्ट्रीसोबतच बॉलिवूडमध्ये पण अनेक चित्रपट बनवले. त्या चित्रपपटांतून अनेक कलाकार मोठे स्टार झाले आहेत. पण त्यांच्या मूलीला मात्र तिच्या मेहनतीवर मोठं होऊन वडिलांना गर्व वाटावा असे काम करुन दाखवायचे आहे.

सई तिच्या करियरसोबतच तिच्या लव्ह लाइफसाठीसुद्धा चर्चेत असते. मिळालेल्या माहितीनुसार ती सध्या चित्रपट निर्माते साजिद नाडियाडवाला यांच्या मुलाला म्हणजेच सुभान नाडियाडवालाला डेट करत आहे. अनेकदा दोघांना एकत्र लन्च आणि डिनर डेटवर पाहिले गेले आहेत. पण ते मीडियापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे सध्या तरी त्यांना त्यांच्या नात्याबद्दल काही उघड करायचे नाही असे दिसून येते.