भारतरत्न स्वरसाम्राज्ञी लता मंगेशकर यांचे महानि...

भारतरत्न स्वरसाम्राज्ञी लता मंगेशकर यांचे महानिर्वाण (Sad News : Swar Kokila Lata Mangeshkar Passes Away)

रेडिओ, टेलिव्हिजन अथवा संगीताच्या अन्य माध्यमातून अहोरात्र ज्यांचा स्वर ऐकला जातो, ज्यांचा स्वर्गीय स्वर म्हणजे प्रत्येक भारतीयांचा श्वास आहे, अशा गानसाम्राज्ञी, भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांचे आज महानिर्वाण झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांना करोनाचा संसर्ग झाल्यामुळे हॉस्पिटलात त्यांच्यावर उपचार चालू होते. अखेरीस आज त्यांची प्राणज्योत मालवली.

लहान वयातच लताबाईंचे पिताजी संगीत गायक – नट मा. दीनानाथ मंगेशकर यांचे निधन झाले. अन सर्व भावंडांची जबाबदारी त्यांच्यावर पडली. ती आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलून लतादीदींनी आपल्या बहिणी व लहान भावाचा सांभाळ केला. आणि त्यांना देखील संगीत क्षेत्रात आणले.

लतादीदींचा जन्म इंदूर येथे झाला असला तरी त्यांचे मूळ घराणे, गोव्यातील श्री मंगेशीचे आहे. १९४८ साली त्यांनी चित्रपटातील गायनाचा आरंभ केला आणि वर्षनुवर्षे एकामागून एक सरस, गोड गाणी गात त्या भारतातीलच नव्हे, तर जगभरातील गायकांमध्ये अग्रणी ठरल्या.

आपल्या देशातील जवळपास प्रत्येक भाषेतून लतादीदींनी हजारोंच्या संख्येने गाणी गायली. अन प्रत्येकाच्या गळ्यातील ताईत बनल्या. देशातील सर्वोच्च बहुमान भारतरत्न त्यांना देण्यात आला होता.
या अदभूत, स्वर्गीय कंठ लाभलेल्या, गानकोकिळा, स्वरसाम्राज्ञीला आमची भावपूर्ण श्रद्धांजली !